Friday, November 25, 2022

संविधानदिन ते महापरिनिर्वाणदिनादरम्यान साजरे होणार ‘समता पर्व’ समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

संविधानदिन ते महापरिनिर्वाणदिनादरम्यान साजरे होणार ‘समता पर्व’

समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती दि. 25: जिल्ह्यात संविधानदिन (दि. 26 नोव्हेंबर) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (दि. 6 डिसेंबर) दरम्यान समता पर्व साजरे करण्यात येणार असून, त्यात समाजकल्याण कार्यालयातर्फे रोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

संविधानदिनी दि. 26 नोव्हेंबरला सामाजिक न्यायभवनात, तसेच सर्व कार्यालये, शाळा-महाविद्यालयात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. त्या म्हणाल्या की, संविधानदिनी प्रभात फेरीही काढण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करुन प्रभात फेरी इर्विन चौक ते पंचवटी येथे जाऊन डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकास अभिवादन करुन सामाजिक न्याय भवनापर्यंत जाईल.

 त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, तसेच डॉ. राजेश मिरगे यांचे संविधान जागृती या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने दीडशे व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल.

दुस-या दिवशी अर्थात दि. 27 नोव्हेंबरला महाविद्यालये, शाळा, वसतिगृहे, निवासी शाळा तसेच आश्रमशाळा  येथे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम होतील. दि. 28 नोव्हेंबरला सामाजिक न्याय भवन येथे संविधानविषयक व्याख्यान होईल. दि. 29 नोव्हेंबरला सामाजिक न्याय भवन येथे (सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा) या विषयावर पत्रकार  कार्यशाळा होईल. दि. 30 नोव्हेंबरला अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा या विषयावर भित्तीपत्रक, पोस्टर्स, बॅनर, चित्रकला स्पर्धा होईल. तसेच सामाजिक कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांच्यासाठी कार्यशाळा होईल. दि. 1 डिसेंबरला जिल्हा स्तरावर युवा गटांची कार्यशाळा होईल.

उपक्रमात दि. 2 डिसेंबरला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीला भेटी देण्याचा कार्यक्रम होईल. दि. 3 डिसेंबरला जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर, तसेच सर्व तालुकास्तरावर योजना माहिती कार्यशाळा होईल. दि. 4 डिसेंबरला ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी व वृद्धांसाठी माहिती कार्यशाळा होईल. दि. 5 डिसेंबरला संविधान जागृती सांस्कृतिक कार्यक्रम होईल. महापरिनिर्वाण दिनी दि. 6 डिसेंबरला समारोप कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप, बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होतील. या पर्वात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीमती केदार यांनी केले.

 ०००

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...