आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर


 





आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा

स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर

 

अमरावती, दि. 19 (विमाका) : अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सवा’त आज ‘स्पर्धेत यश मिळवितांना’ या विषयावर परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त विक्रम साळी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार मदन जाधव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी स्वानुभवातून मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. साळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्वयंप्रेरित असणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करतांना इतरांशी स्वत:ची तुलना करु नका. कालपेक्षा आज आपली काय प्रगती झाली, याबाबत स्वत:शी  संवाद साधा. परीक्षा देतांना आव्हानांचा स्वीकार आनंदाने आणि सकारात्मकतेने करा. वाचन केवळ परीक्षेच्या यशप्राप्तीपुरतेच न ठेवता ही सवय आयुष्यभर अंगिकारा. ज्या पदावर तुमची नियुक्ती झाली आहे, त्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी निरपेक्ष वृत्ती स्वत:मध्ये रुजवा. ध्येय निश्चिती आणि सकारात्मकतेमुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणे कठीण नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय निश्चित करावे. समाज माध्यमांचा अगदी जुजबी वापर करावा. आज सर्वत्र स्पर्धेचे युग असल्यामुळे आपले प्रयत्न इतरांपेक्षा सरस ठरतील, यासाठी अविरत प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे. स्वत:ची टिपणे काढा. बाजारात तयार साहित्यांवर विसंबून राहू नका. अपयशाने खचून न जाता सकारात्मक वृत्ती बाळगा. प्रबळ इच्छाशक्ती, चौफेर वाचन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षा अवघड नाहीत, असे मत श्रीमती वर्षा भाकरे यांनी व्यक्त केले.

आपले इच्छित ध्येय गाठेपर्यंत विश्रांती घेऊ नका. समाजमाध्यमांच्या वापराबाबत स्वत:वर निर्बंध लादा. तुम्हीच तुमचे परीक्षक व्हा. ज्यावेळी तुम्ही स्वत:वर नियंत्रण मिळवू शकाल, त्यावेळी स्पर्धेत यश मिळविणे कठीण नाही. बदलांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा. अवांतर वाचनासह संदर्भग्रंथांचे वाचन वाढवा. दैनंदिन वृत्तपत्रांच्या नोंदी घ्या. अनावश्यक वेळ कुठेही खर्च होणार नाही, यांची दक्षता घ्या. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आनंदाने स्वीकारा. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही रोजची आव्हाने संपत नाही. यासाठी केवळ स्पर्धेपुरतेच नाही तर यशस्वी आयुष्य जगण्यासाठी शरीरासह मनाचीही मशागत करा. अपयश आल्यास खचून जावू नका. तर उपलब्ध दुसऱ्या पर्यायाकडे वळण्याचा संदेश मदन जाधव यांनी दिला.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे यांनी केले. विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी तसेच विद्यार्थी, ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.  

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती