‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर








 ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा

 

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

       अमरावती, दि. 17 : ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करावे. जिल्हा, तालुका तसेच सर्व ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनाने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव ‘बालविवाहमुक्त गाव’ म्हणून घोषित व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हा महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा आढावा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

            बालविवाहमुक्त जिल्हा अभियान राबविण्यासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावरील प्रशासकीय यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये शिक्षण विभाग, महिला बाल विकास विभाग, पोलीस विभाग, ग्राम विकास विभाग तसेच आरोग्य विभाग या विभागांना प्रशिक्षण देण्यात येईल. गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविकायांनी गावात होणारे बालविवाह टाळण्यासाठी गावकऱ्यांना समुपदेशन करावे. ‘आमच्या गावात एकही बालविवाह होणार नाही’, असा ठराव ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मंजूर करुन घेण्यात यावा, जेणेकरुन कोणत्याही गावात बालविवाह होणार असल्यास त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला कळेल आणि प्रशासन यावर कारवाई करु शकेल, अशी माहिती श्रीमती कौर यांनी यावेळी दिली.

            टास्क फोर्स बैठकींतर्गत कोविड काळामध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सद्य:स्थितीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. कोविडमध्ये एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 477, तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 19 आहे. या 19 पैकी 15 बालकांना केंद्र शासनामार्फत 10 लक्ष रुपये तर राज्य शासनामार्फत 5 लक्ष रुपये अशी एकूण 15 लक्ष रुपयांची मदत करण्यात आलेली आहे. या मुलांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती अजय डबले यांनी यावेळी दिली.

            बालकांच्या संरक्षणासाठी 1098 या हेल्पलाईन क्रमांकाला सर्वत्र प्रसिद्धी देण्यात यावी. पोलीस विभागांच्या गाड्यांवर हा हेल्पलाईन क्रमांक लावण्यात यावा तसेच प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात या क्रमांकाची प्रसिद्धी करण्यात यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना गरजेच्यावेळी हा क्रमांक लक्षात राहील.

            बाल कल्याण समितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. अल्पवयीन अविवाहित गरोदर मुलींचा निवाऱ्याचा प्रश्न उपस्थित होतो, अशावेळी या मुलींना प्रसुती होईपर्यंत वन स्टॉप सेंटरला ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.

            जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत दि. 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दत्तक विधान सप्ताह राबविण्यात येत आहे. यासाठी www.cara.nic.in (टोल फ्रि क्रमांक 1800111311) या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छुक पालक कायदेशीररित्या मुल दत्तक घेऊ शकतात. अवैध पद्धतीने मुल दत्तक घेतल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबतच्या भित्तीपत्रकाचे यावेळी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती