माझा एक दिवस बळीराजासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

 















माझा एक दिवस बळीराजासाठी

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

 

अमरावती, दि. ७ : कृषी विभागाच्या माझा एक दिवस बळीराजा या उपक्रमात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी देवरा येथे शेतकरी बांधवाच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी आज संवाद साधला. देवरा येथील शेतकरी बांधवांच्या अडचणी  जाणून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याबाबत निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उपक्रमात अशोकराव कडू यांच्या घरी भेट देऊन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी त्यांच्याशी कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना येणा-या अडचणी जाणून घेतल्या, तसेच, पीकपद्धती, उत्पन्न, पशुधन आदी बाबींची माहिती घेतली. शेतकरी बांधवांना येणा-या अडचणींचा तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या वनराई बंधा-याचे जलपूजन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाले. तसेच बीजप्रक्रियेबाबत शेतकरी बांधवांना माहिती देण्यासाठी यंत्राद्वारे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

 गावाच्या सरपंच मनीषाताई वरघट, उपसरपंच गजाननराव देशमुख, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जोशी,  जिल्हा कृषी विकास अधिकारी गोपाळराव देशमुख, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी विज्ञान केंद्राचे श्री. कळसकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गावातील सभागृहात जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी शेतकरी बांधवांशी बोलताना श्रीमती कौर म्हणाल्या की, शेतमालाची साठवणूक करण्यासाठी गावात गोदाम निर्माण करण्याची मागणी होत आहे. देवरा हे गाव पोकरा योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. गावानजिक पेढी नदीचे आवश्यक तिथे खोलीकरण करण्याच्या कामालाही गती देण्यात येईल, तसेच कायमस्वरूपी बंधाराही निर्माण करण्यात येईल. अवजार बँकेसारखे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. गावक-यांच्या मागणीनुसार रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खारपाणपट्ट्यातील तूर व हरभरा डाळ वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याचे ब्रँडिंग करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न होत आहेत. विविध योजनांद्वारे गावात कृषी प्रक्रिया उद्योग सुरू होण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. खर्चान यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके यांनी प्रास्ताविक केले. तंत्र व्यवस्थापक रूपाली चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती