अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित - खासदार डॉ. अनिल बोंडे

 







अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित

- खासदार डॉ. अनिल बोंडे

 

अमरावती, दि. 18  : ग्रंथदिंडी, कवी, लेखक, रसिक, वाचकांची मांदियाळी, वाङमय चर्चा, परिसंवाद, कवीसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आज झाला. अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी पवनीत कौर  यांच्या उपस्थितीत झाला. ग्रंथोत्सवानिमित्त शहरातून उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, तहसीलदार संतोष काकडे तसेच ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक यावेळी उपस्थित होते.  खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी,  ‘ग्रंथोत्सव’ घेतला जातो. लेखक, वाचक आणि प्रकाशक या त्रिवेणी संगमातून संस्कारक्षम विचार करणारी पिढी तयार होते. ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित असल्याचे खासदार डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, वाचन संस्कृतीच्या माध्यमातून माणूस घडत असतो.

वाचनाची गोडी लहानपणापासून लागल्यास त्या व्यक्तीतील वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून तर तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून आयुष्याचे सार समजावून सांगितले आहे. संत एकनाथ महाराजांनी ‘भारुड’ तर अन्य संतांनीही ओवी तसेच ग्रंथांच्या माध्यमातून जगण्याची मूल्ये सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली आहेत. वेदकाळापासून ग्रंथांचे महत्त्व अबाधित आहे. संतांची शिकवण आज आपल्याला ग्रंथांच्या माध्यमातून मिळते. यावरुन आपल्या पूर्वजांना असणारे ग्रंथांचे महत्त्व जाणवते.  आज वाचनाची माध्यमे बदलत आहे. ऑडिओ बुकच्या माध्यमातून पुस्तके ऐकता येतात. ई-बुक्स एका क्लिकवर उपलब्ध आहेत. परंतु पुस्तक हातात धरुन केलेल्या वाचनाची अनुभूती हा वेगळा आनंद आहे.

            श्रीमती पवनीत कौर यांनी ग्रंथालयाची पाहणी करून स्पर्धा परीक्षा तसेच महिला कक्षातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. याप्रसंगी प्रकाशक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर बजाज, विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर आदी उपस्थित होते.

ग्रंथोत्सवातील ग्रंथ प्रदर्शन व विक्री उद्या शनिवार दि. 19 नोव्हेंबर 2022 पर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती