वातावरणीय बदलांवर विचारमंथनासाठी मुंबईत राष्ट्रीय पर्यावरण परिषद
पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न
- पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 2 : देशातील वातावरणीय बदलांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय वातावरणीय बदल कृती आराखडा निर्माण करण्यात आला आहे. त्यावर विचारमंथन करण्यासाठी मुंबईत आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत उद्या (दि. 3) होणा-या महत्वपूर्ण सत्रात पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील सहभागी होणार आहेत.
परिषदेत उद्या दुपारी 12 वाजता होणा-या सत्रात राज्यातील वातावरणीय बदल व शासनाकडून पर्यावरण संवर्धनाबाबत केल्या जाणा-या प्रयत्नांची माहिती देण्यात येईल, असे पर्यावरण राज्यमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, उद्या होणा-या या सत्रात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सर्वोच्च न्यायालयाच न्यायाधीश अरुण मिश्रा, राष्ट्रीय हरित आयोगाचे प्रमुख न्या. स्वतंतेर कुमार, तज्ज्ञ सदस्य बी. एस. सजवान आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक व मानवनिर्मित घडामोडींमुळे वातावरणातील तापमानात वाढ झाल्याने वातावरणात बदल होत आहे. त्यानुसार कृती आराखड्यात सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी परिषदेत चर्चा करण्यात येईल. स्वतंत्र जल वायू परिवर्तन समन्वयन कक्षाची स्थापना केली जाणार आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने राज्यातील धुळे, बुलडाणा, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम, गडचिरोली हे जिल्हे संवेदनशील मानले जातात. त्यानुसार वातावरणीय बदल कमी करण्याच्या अनुषंगाने धोरण ठरविणे, उपाय आखणे, क्षमतावृद्धी व संशोधन- तंत्रज्ञान विकसित करणे हे समन्वयन कक्षाचे काम असेल.
 00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती