दाजीसाहेब पटवर्धनांचे कार्य समाजासाठी सतत प्रेरणादायी
-  पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती, दि. 28 : शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. तपोवन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेली रुग्णसेवा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे  प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले.
डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या डाक तिकीट अनावरणाचा समारंभ तपोवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी अध्यक्षस्थानी होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिष अगरवाल,  नागपूर विभागाच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती मरियम्मा तोमस, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष गवई, झुबीन दोटीवाला, डॉ. नितीन धांडे व विवेक मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
            श्री. पोटे- पाटील म्हणाले की, दाजीसाहेबांचे कणखर व नि:स्पृह व्यक्तिमत्व पुरस्कारांच्या पलीकडे जाणारे होते. त्यांची कार्यावरील निष्ठा अविचल होती. त्यांच्या या त्यागातून विदर्भ महारोगी सेवा मंडळ- तपोवनसारखी भव्य सेवाभावी संस्था उभी राहिली. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना स्फूर्ती देत राहील.
श्री. अडसूळ म्हणाले की, चांगल्या कार्याची समाज सतत नोंद घेत असतो. कालांतराने सरकारलाही ही नोंद घ्यावी लागते. आज दाजीसाहेबांच्या जीवनकार्याचे डाक तिकीट अनावरण ही आनंददायी घटना आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या आग्रहास्तव दाजीसाहेबांनी पद्मश्री स्वीकारली खरे; पण तपोवनातील एक मुलगी दत्तक घेण्याची अटही त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींना घातली. त्यांची ध्येयनिष्ठा त्यातून दिसून येते.
डॉ. बोंडे, श्री. राणा, श्री. अगरवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.  यावेळी अनेक मान्यवरांनी  डॉ. पटवर्धनांच्या जिवनावर प्रकाश टाकला. डॉ. गवई यांनी प्रास्ताविकातून दाजीसाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अब्दुल रशीद यांनी सूत्रसंचालन केले. वसंत बुटके यांनी आभार मानले.
                                                                        00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती