खेळातून व्यक्तिमत्व घडवा
                                        -शिक्षण मंत्री विनोद तावडे
          अमरावती, दि. 27 : खेळामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक विकास अधिक प्रभावीपणे होतो. हे लक्षात घेऊन शासनाने खेळांना प्रोत्साहनपर अनेक उपक्रम सुरु केले आहेत, असे सांगतानाच, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळांसाठीही पुरेसा वेळ द्यावा. खेळांतून व्यक्तिमत्व घडवा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज विद्यार्थ्यांना केले.
येथील अंबिकानगर शाळेच्या प्रांगणात शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार सर्वश्री अनिल बोंडे, रवि राणा, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, उपमहापौर संध्याताई ठाकरे, मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी आदी उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर श्री. तावडे यांनी व्यासपीठावरुन भाषण न करता थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. विद्यार्थी कुठले खेळ खेळतात, याची प्रत्येकाकडे विचारपूस त्यांनी केली. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी क्रिकेटसह खो-खो, कबड्डी, कुस्ती असे पारंपरिक खेळही खेळावे.  स्वत:त ‘स्पोर्टस् स्पिरीट’ निर्माण करावे. व्हिडीओ गेम, मोबाईलपेक्षा मैदानी खेळांसाठी वेळ काढावा. त्यामुळे शरीराचा व्यायाम होऊन चैतन्य निर्माण होते.व बौद्धिक क्षमताही वाढते.
खेळाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा म्हणून शिक्षण विभागाकडून खेळाडूंना वार्षिक परीक्षेत अतिरिक्त गुणांची तरतूद, तसेच उत्कृष्ट खेळाडूंना नोकरीसाठी आरक्षण दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.  क्रीडा स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. खेळामध्ये नैपुण्य मिळवणा-या संजय तिरथकर, निखील सारवान ( कुस्ती ), विजय भुयार (विदर्भ स्तरीय शरीरसौष्ठव), गोकुल येवले (धावपटू) आदी प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्‍ह देऊन गौरव यावेळी करण्यात आला.
समारंभात भरतनाट्यम नृत्य सादर करणा-या मनपा शाळा क्र.17 चे विद्यार्थी, लेझीम नृत्य सादर करणा-या मनपा शाळा क्र. 14, तसेच सायकल मल्लखांब प्रात्यक्षिक सादर करणा-या एकलव्य गुरुकुल शाळेच्या (नांदगाव खंडेश्वरच्या विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी अभिनंदन केले.
महानगरपालिका शालेय क्रीडा महोत्सव हा 27 व 28 डिसेंबर दोन दिवस चालणार आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या 80 टक्के शाळा डिजीटल झाल्या आहेत. स्काऊट गाईडद्वारा मनपा शाळेतील विद्यार्थी अमेरिकेत प्रात्यक्षिके सादर करणार आहेत, अशी माहिती शिक्षण सभापती चेतन गावंडे यांनी प्रास्ताविकातून यावेळी दिली.
00000





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती