Thursday, December 7, 2017

सामाजिक विकृतींना आळा घालण्याची सर्वांची जबाबदारी
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 7 :   समाजातील विकृतींना आळा घालण्याची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था यंत्रणेइतकीच  आपली सर्वांची आहे. सुदृढ व सुरक्षित समाजासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.
पोलीस आयुक्तालयातर्फे  ‘जागर तरुणाईचा, सामाजिक बांधीलकी व उत्तरदायित्व कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांतील दोन हजारहून अधिक विद्यार्थीनींची उपस्थिती होती. यावेळी उपमहापौर संध्या टिकले, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, राजश्री कौलखेडे, डॉ. मोना चिमोटे, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. स्मिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, कुटुंबात मिळालेल्या स्वातंत्र्याचा पाल्यांकडून दुरुपयोग होऊ नये यासाठी पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे. मुलांमध्ये व्यसनाधीनता येता कामा नये. अद्ययावत तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलेली मोबाईल आदी साधने म्हणजे आधुनिकता नव्हे. ती विचारांत असली पाहिजे. या साधनांमध्ये किती वेळ गुंतून पडायचे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मुली व महिलांनी धीट होऊन गैरवर्तणुकीचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस व शासन कटिबद्ध आहे. श्री. मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. 
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. आभार पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांनी मानले. कायद्यांची माहिती असलेल्या घडिपत्रिकेचे वितरण यावेळी करण्यात आले.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...