Tuesday, December 26, 2017

‘मागेल त्याला शेततळे’चे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करावे
-       जिल्हाधिकारी अभिजित बांगर
अमरावती, दि. 26 : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत भरीव कामे होण्यासाठी कृषी सहायकांना उद्दिष्ट निश्चित करुन दिलेली आहेत. तथापि, काही तालुक्यांत पुरेशी कामे नाहीत. निश्चित उद्दिष्ट  पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी आज येथे सांगितले.
शेततळे व गटशेती योजनेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. बांगर म्हणाले की, खारपाणपट्ट्यातील तालुक्यांत भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक कृषी सहायकामागे 50, तर इतर तालुक्यात 20 शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. कृषी अधिका-यांसह उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनाही या कामाबाबत निर्देश देण्यात आले आहेत. काही तालुक्यांमध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले; पण प्रत्यक्षात कामे सुरु झाली किंवा कसे, याची माहिती द्यावी व कामे तत्काळ पूर्ण करावी. 
गटशेतीचे प्रस्ताव परिपूर्ण असावेत
शेतकरी गट कंपन्यांच्या प्रकल्प विकास आराखड्यात क्षेत्र, नकाशे, खर्च, त्याची सामुदायिक व वैयक्तिक विभागणी असा सुस्पष्ट उल्लेख असावा. शेती क्षेत्र शक्यतो सलग असावे.  नकाशावर शेतीचे क्षेत्र सर्वे क्रमांकासह स्पष्ट असावे. आराखडा मंजूर झाल्यानंतरच काम सुरु करावे. अनुदानाच्या मर्यादेत सहली आ‍दी अतिरिक्त खर्च करावा. प्रशिक्षणही उत्पादनवाढ, विपणन आदींसाठी उपयुक्त असले पाहिजे.
या बैठकीला जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उदय काथोडे, आत्माचे प्रकल्प संचालक ए.के. मिसाळ व अनेक तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...