जिल्ह्यातील विकासकामांबाबत
विभागीय आयुक्तांकडून आढावा अपूर्ण कामांना गती द्यावी
          - विभागीय आयुक्त पीयुष सिंह
अमरावती, दि. 4 : जिल्ह्यातील विकासकामांबाबत वस्तुनिष्ठ माहिती सादर करावी, तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी विविध विभागांच्या अधिका-यांना दिले.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला होता. या बैठकीतील निर्देशांवर झालेली कार्यवाही आढावा व मुख्यमंत्र्यांसमोर करावयाचे सादरीकरण याबाबत विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 मागील कामांचा आढावा घेतानाच गत वर्षातील प्रश्न, निर्णय व अंमलबजावणीचा आढावा यावेळी घेण्यात आला. राष्ट्रीयकृत बँकांनी केलेल्या खरीप कर्जवाटपाच्या तुलनेत यंदा जिल्हा सहकारी बँकेचे कर्जवाटपाचे प्रमाण अधिक आहे.  रब्बी कर्जवाटपाच्या कामांनाही  गती द्यावी. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत गतवर्षी व यंदाच्या उद्दिष्टानुसार किती काम झाले, याचा तपशीलवार गोषवारा सादर करण्याचे निर्देश श्री. सिंह यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, गावठाण विस्ताराच्या कामाला गती द्यावी. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी यासंबंधी एकत्रित बसून नियोजन करावे.
 स्वच्छ भारत अभियानात 50 हजार कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित विशेषत: धारणी तालुक्यातील कामे तत्काळ पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.
समृद्धी महामार्गासाठी येत्या आठवडाभरात 40 टक्के भूसंपादनाचे नियोजन आहे. दि. 31 डिसेंबरपर्यंत हे काम 55 टक्क्यांपर्यंत जाईल, अशी माहिती श्री. बांगर यांनी दिली. मेक इन महाराष्ट्रांतर्गत सामंजस्य करार करण्यात आलेल्या उद्योगांपैकी 8 उद्योग सुरु झाले आहेत. 9 उद्योगांचे बांधकाम सुरु आहे. बसक्या पुलांचे उंच पुलात रुपांतर करण्याची 36 कामे सार्वजनिक  बांधकाम विभागाने केली आहेत. आदिवासी जिल्हा उपयोजनेत 28 पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती अधिका-यांनी दिली. 
    कर्जमाफीची अंमलबजावणी, स्वच्छ भारत योजना, पं. दीनदयाळ उपाध्याय भूखंड खरेदी योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, पीक विमा, धामक येथील पुनर्वसन आदी विविध कामांविषयी यावेळी चर्चा झाली.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती