पालकमंत्र्यांनी घेतला शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा
गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसवावा
                                    -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती, दि. 7 : शहरात वारंवार गुन्हेकारक घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच ठेचली गेली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित करुन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे दिले.
          पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्थाविषयक बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार आदी उपस्थित होते.
          पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शहरातील गुन्हेगारी घटनांचे प्रमाण पाहता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून काम केले पाहिजे. अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करुन गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा. तरुणांमध्ये शिस्त आणण्यासाठी त्यांना नियमांची जाणीव करुन देण्याची गरज आहे. सुसाटवेगाने दुचाकी चालवणाऱ्या युवकांना समज देऊन त्यांच्या आईवडलांना कल्पना द्या. शहरात शाळा-महाविद्यालय परिसरात साध्या वेशातील पोलीस अधिकारी- कर्मचारी नियुक्त करावेत.  शिस्तीचे पालन न करणा-यांना खाकीची पॉवर कळू द्या.   काही रिक्षाचालक महिलांशी गैरवर्तणुक करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. अशा ठिकाणी साध्या वेशातील कर्मचारी नेमावेत.  

श्री. मंडलिक म्हणाले की,  महिलांच्या सुरक्षेकरिता दामिनी पथक कार्यरत आहे. 195 शाळा-महाविद्यालयांत तक्रार पेटी बसविण्यात आली आहे. शहरातील महिला वसतिगृहांकरिता महिला पोलीस उपनिरीक्षकांकडून नियमित भेट देण्यात येते. तक्रारी असतील तर त्यावर कार्यवाही केली जाते. कायदा व सुव्यवस्थेसाठी  लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने पोलीस मित्र, शांतता समिती, मोहल्ला समिती, सामाजिक सुरक्षा समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे.  
          शहरातील एटीएममधून पैसे चोरी होत असल्याच्या तक्रारींवर सायबर विभागाच्या कामगिरीमुळे सर्व आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.  
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती