पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने शेतकरी बांधवांना मिळाला न्याय

 


नारायणपूर येथील औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्याने बाधित जमीनी संपादित करणार

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने शेतकरी बांधवांना मिळाला न्याय

उद्योग उभारणी व रोजगारनिर्मितीला चालना मिळेल

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 11 : औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्याने बाधित नारायणपूर येथील जमिनीचा प्रश्न पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने निकाली निघाला असून, तेथील शेतकरी बांधवांना न्याय मिळाला आहे. नारायणपूर येथील 47.89 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यास राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने मंजूरी दिली असून, याठिकाणी उद्योग निर्माण होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

अमरावती शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्रातील टेक्स्टाईल झोनमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या पाण्यामुळे शेतक-यांच्या जमीनी नापिक व विहीरी पूर्णपणे प्रदूषित झाल्या. या जमिनी महामंडळाने संपादित करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात आली. त्याची तत्काळ दखल घेत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी शासन स्तरावर ही मागणी पोहोचवली, तसेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिका-यांसमवेत स्वतंत्र बैठका घेऊन पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने मौजे नारायणपूर येथील खासगी 47.89 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यास मंजुरी दिली आहे.

नारायणपूर येथील या क्षेत्राची भूनिवड समितीने पाहणी केली असून,  जमीन समतल व औद्योगिक नियोजनाच्या दृष्टीने योग्य असल्याचे दिसून आले. अमरावती औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध वीज उपकेंद्रातून याठिकाणी वीजपुरवठा होऊ शकेल. त्याचप्रमाणे, पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करता येणार आहे. या क्षेत्रालगत महामंडळाने 2 हजार 809.78 हेक्टर अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र विकसित केले आहे. अनेक उद्योग तिथे सुरू झाले आहेत. प्रस्तावित जागाही संपादित होत असल्याने औद्योगिक वाढीला वाव मिळणार आहे. त्याअनुषंगाने स्थानिक बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही होऊ शकेल. जिल्ह्यात नवनवे उद्योग यावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

                                    00000 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती