संवर्धनाबरोबरच पर्यटनवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन विकास - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




                 प्राचीन वैभवाच्या जतन- संवर्धनासाठी तरतूद

                  संवर्धनाबरोबरच पर्यटनवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन विकास

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 28 : प्राचीन व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शासनाने भरीव तरतूद केली आहे. त्याअंतर्गत लासूर येथील शिवमंदिर या प्राचीन वैभवाचे जतन व संवर्धन केले जाणार असून, पर्यटन विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन या प्राचीन स्थळाचा विकास केला जाईल. या सर्व कामांसाठी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी प्रक्रिया व इतर बाबींची पूर्तता करून घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.  

             पर्यटन व विविध विकास आराखड्यांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार योगेश देशमुख,  पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संवर्धन सहायक हेमंत हुकरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पौराणिक महत्ता लाभलेल्या स्थळाचा वारसा जपणे आवश्यक आहे. लासूर येथील शिवमंदिराचे जतन, देखभाल आणि विकासासाठी नियोजन करण्यात आले आहे. मंदिराचे प्राचीन रूप व पावित्र्य जपताना पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सोयी-सुविधा उभाराव्यात. लासूर येथे पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. पौराणिक वारश्याच्या जपणुकीसह नागरी सुविधा निर्माण केल्याने रोजगार वाढून सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

या सर्व विकासकामांसाठी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी प्रक्रिया व इतर बाबींची पूर्तता करून घ्यावी. त्यासाठी प्रशासनाकडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील कौंडण्यपूर, मोझरी, वलगाव येथील विकास आराखड्यातही विविध कामे अपेक्षित असून, त्यासाठी निधीही देण्यात येईल. ही कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती