अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार





अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

 

अमरावती, दि. 2 : मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्यांना आधार मिळवून दिला. 

            अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील माळेगाव येथील चार मुलींचे छत्र हरपले. त्यात  विधी प्रवीण राठोड या तीन वर्षाच्या, तसेच तिची बहीण परिंदी या सहा वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे.  त्यांच्याबरोबरच नीलम वानखेडे आणि नयना वानखेडे या अनुक्रमे तेरा आणि पंधरा वर्षांच्या मुलीही अनाथ झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी महिला बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यांची व्यथा ऐकून महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी तत्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून या मुलींच्या शिक्षणाची आणि भविष्यासाठी तरतुदीची सोय केली.

            मात्र, विधी व परिंदी या मुली वयाने लहान असल्याने त्यांना अनाथालयात पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रीमती ठाकूर यांनी त्यांना स्वतःच्या मोझरी येथील शाळेत निवासाची आणि मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. या दोन्ही मुलींना म्हातारी आजी हाच एकमेव आधार आहे. मात्र, आजी थकल्यामुळे मुलींच्या भविष्याबाबत त्यांना चिंता लागून राहिली होती. त्यांची व्यथा जाणून पालकमंत्र्यांनी या दोन्ही चिमुकल्यांना आपल्या शाळेत निवारा मिळवून देण्याचा निर्णय घेतला.

 वयाच्या सहाव्या आणि तिसऱ्या वर्षी दोघींचेही मातापित्यांचे छत्र हरवले. त्यामुळे त्यांचे भविष्य अंधारमय होते. मात्र, मोझरी येथील शाळेत निवासी आणि शिक्षणाची सोय झाली. त्यामुळे त्यांच्या संगोपन व शिक्षणाची सोय झाली, याचे समाधान असल्याची भावना चिमुकल्यांच्या आजींनी व्यक्त केली.

 

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती