तिवसा नगरपंचायतीला ३ कोटी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

 


तिवसा येथे साकारणार भव्य सांस्कृतिकभवन

वैशिष्ट्यपूर्ण कामे योजनेत

तिवसा नगरपंचायतीला ३ कोटी

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

 

अमरावती, दि. २६ : शहरात वैशिष्ट्यपूर्ण कामे राबविण्यासाठी नगर परिषदांना विशेष अनुदान योजनेअंतर्गत शासनाकडून निधी वितरीत करण्यात येतो. त्यानुसार तिवसा नगरपंचायतीसाठी ३ कोटी रुपये निधी नगरविकास विभागाकडून वितरित करण्यात आला असून, तिथे अद्ययावत व भव्य सांस्कृतिकभवन साकारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

तिवसा येथे भव्य सांस्कृतिक भवनाची निर्मिती होऊन तेथील नगरपंचायतीला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होण्याच्या दृष्टीने शासनाने नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी अनुदान योजनेत निधी द्यावा, या मागणीचा पाठपुरावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी शासन स्तरावर केला. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष चर्चेद्वारे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, तिवसा येथे सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे.

जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधांची निर्मिती होण्यासाठी नवनवीन कामांना चालना देण्यात येत आहे. आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी दिली.या योजनेत तिवसा येथे खुल्या जागेवर भव्य सांस्कृतिकभवन साकारणार असून, नागरिकांसाठी शहरात एक उत्तम व दर्जेदार सुविधा निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे, या भवनामुळे  नगरपंचायतीला उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे.

या प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा असून, कार्यान्वयन यंत्रणा नगरपंचायत राहणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आवश्यक प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती