सोयाबीन बियाणे जतन करून ठेवण्याबाबत शेतक-यांना आवाहन

 


सोयाबीन बियाणे जतन करून ठेवण्याबाबत शेतक-यांना आवाहन

अमरावती, दि. २५ : खरीप हंगाम २०२२ साठी जिल्ह्यात सोयाबीन पिकाखालील संभाव्य क्षेत्र २ लाख ६८ हजार १४९ हेक्टर आहे. सोयाबीन बियाणे व नवीन वाणाची पेरणी केलेल्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाणे पुढील वर्षासाठी जतन करून ठेवावे, तसेच पुढील वर्षातील पेरणीचे क्षेत्र, राखून ठेवलेले बियाणे आदी माहिती कृषी सहायकांकडे द्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

            गेल्या वर्षी जिल्ह्यात जास्त पाऊस असल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. बियाण्याची उपलब्धता कमी होती व दरही जास्त होते. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे आहेत, त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे. त्यासाठी काही आवश्यक सूचना जिल्हा कृषी अधिक्षक अधिका-यांनी केल्या आहेत.

विलगीकरण अंतर : बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पिक वाणापासून ३ मीटर अंतरावर असावे.

सोयाबीन बियाण्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव परागीकरण अवस्थेपासून तसेच शेंगाच्या कडांमधून होऊन बियाण्याच्या पृष्ठभागावर त्याचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे बियाण्याचा क्षेत्रीय ऱ्हास होतो. हे टाळण्यासाठी बीजोत्पादन करताना फुलोरा अवस्था किंवा दाणे पक्व झाल्यावर मेन्कोझेब (0.2टक्के ) किंवा कार्बेन्डाझिम (0.1 टक्के) फवारणी केल्यास सोयाबीन बियाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे सोयाबीन बिजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी  शेवटच्या पेरणीमध्ये वरील बुरशीनाशकाचा वापर अवश्य करावा. त्यामुळे बियाण्याचा  क्षेत्रीय ऱ्हास होणार नाही व बियाण्याची गुणवत्ता चांगली राखता येईल.

भेसळ काढणे : उच्च प्रतीचे बियाणे तयार करण्यासाठी बीजात्पादन क्षेत्रात आढळून येणारी भेसळ वेळच्या वेळी काढणे आवश्यक आहे. बीजोत्पादन घेतलेल्या जातीच्या गुणधर्मांव्यतिरिक्त या पिकाच्या इतर गुणधर्मांची झाडांपासून भेसळ होते. सोयाबीन हे स्वपरागीभवन पीक असल्याने शेतातील भेसळीची झाडे पीक काढण्यापूर्वी काढली तरी चालतात. पण भेसळीची झाडे ही ज्या वेळी दृष्टीस पडतील त्या वेळेस काढून टाकणे इष्ट असते. भेसळीव्यतिरिक्त बियाण्यामार्फत होणारे रोग व तणांचा प्रसार टाळण्यासाठी काही आक्षेपार्ह रोग व तणाचे प्रमाण ठरविण्यात आलेले आहे. अशी झाडे व तण वेळच्या वेळी काढून टाकावीत.

ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2021 मध्ये प्रमाणित सोयाबीन बियाणे व नवीन वाणाची पेरणी केली, त्यांनी बियाणे जतन करून ठेवावे, तसेच पुढील वर्षात पेरणी करणारे क्षेत्र, यावर्षी राखुन ठेवलेले बियाणे बाबतची माहिती कृषी सहाय्यकांकडे द्यावी व नावे नोंदवावीत. तसेच प्रगतीशील शेतकरी यांनी आपल्याकडील जास्तीचे राखून ठेवलेले सोयाबीन बियाणे आपल्याच गावातील शेतकऱ्यांना उगवणक्षमता तपासणी करून विक्री करावी. अधिक माहितीसाठी कृषी अधिका-यांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन श्री. चवाळे यांनी केले.

 

                        000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती