जिल्हाधिका-यांकडून जिल्हा नियोजनाचा आढावा







 जिल्हाधिका-यांकडून जिल्हा नियोजनाचा आढावा

 कामे पूर्ण होण्यासाठी प्रस्ताव तत्काळ सादर करा

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 5 : जिल्हा नियोजनानुसार नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी तत्काळ प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

जिल्हा वार्षिक योजनेत खर्च व नियोजित कामांचा आढावा जिल्हाधिका-यांनी नियोजनभवनातील बैठकीत घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह विविध विभागप्रमुख, तसेच इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेत विविध विकासकामांसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद आहे. कोविडकाळ लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्राधान्य देण्यात आले आहे व पहिल्या टप्प्यात त्यासाठी 10 टक्के तरतूद वितरीत करण्यात आली आहे. अशी कामे वेळेत पूर्ण व्हावीत. त्याचप्रमाणे, अपेक्षित कामांसाठी वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

2020-21 मधील तरतुदीनुसार प्राप्त निधी व खर्चाचा आढावा जिल्हाधिका-यांनी यावेळी घेतला. त्यात अखर्चित निधी असेल तर तो तत्काळ समर्पित करण्यात यावा. नियोजित कामांबाबत तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी जेणेकरून निधी प्राप्त होऊन कामांना चालना मिळेल. नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, ऊर्जा, मृदसंधारण, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, पाटबंधारे, रस्ते, पाणीपुरवठा, इमारती, शिक्षण, आरोग्य, क्रीडाविषयक उपक्रम, औद्योगिक प्रशिक्षण, शासकीय तंत्रशाळांचे बांधकाम आदींशी संबंधित विविध विकासकामांसाठी वार्षिक नियोजनात 300 कोटी रूपयांची तरतूद आहे. कोविड उपाययोजना कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण, आरोग्य सुविधांत वाढ, महिला रूग्णालयाचे बांधकाम व विस्तारीकरण, यंत्रसामुग्री खरेदी आदींसाठी 27 कोटी 62 लाख रूपये अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर आहे, अशी माहिती श्रीमती भाकरे यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण, नाविन्यपूर्ण योजना, पुनर्वनरोपण, वनीकरण, मत्स्यसंवर्धन आदी विविध बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती