दर्यापूर विधानसभा क्षेत्रात
खर्चाची तिसरी तपासणी
अमरावती,
दि. 19 (जिमाका) : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची
तिसरी तपासणी शनिवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी नविन तहसिल इमारत दर्यापूर येथील सभागृहात
पार पडली.
उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून डॉ. उमा माहेश्वरी
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेख्यांच्या तपासणीवेळी एकूण 16 उमेदवारांपैकी सर्व
16 उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर खर्च तपासणीचे वेळी उपस्थित सर्व
16 उमेदवार, प्रतिनिधी यांनी त्यांच्या खर्च नोंदवहीत नोंदविलेला खर्च व खर्च सनियंत्रणन
पथकाव्दारे नोंदिण्यात आलेला खर्च यात असलेली तफावत उमेदवारांनी मान्य करून तिसऱ्या
व अंतिम तपासणीत सदर सोळाही उमेदवारांचे खर्च लेख्याच्या ताळमेळ घेण्यात आला. सदरहू
उमेदवारांना आपला खर्च दि. 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे.
उमेदवारांच्या खर्च लेख्याचे अंतिम तपासणी माहे डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे.
0000
अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीन ॲड्रेस
*जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची उपस्थित
अमरावती, दि. 19 (जिमाका): नव्याने सुरु झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. महाविद्यालयातील प्रवेशीत
99 विद्यार्थ्यांसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी डीन ॲड्रेस कार्याक्रम घेण्यात
आला.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. अविनाश
सावजी, डॉ.आशिष सातव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. विद्यार्थ्यांनी
निश्चित केलेले ध्येय अथक मेहनत व परिश्रमामुळे मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. सदर ध्येयप्राप्ती ही फक्त सुरुवात असून भविष्यात
आपले ध्येय निश्चित करुन प्रगती करावी, विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक सत्र प्राथमिकतेने
पूर्ण करावे. इतर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे,
तसेच इतर विषयाचे पुस्तके व ग्रंथ याचे वाचन करुन सर्व विषयातील माहिती घेण्याबाबत
विद्यार्थ्यांना सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी सर्व विभागांनी,
डॉ. अनिल बत्रा, डॉ. किशोर इंगोले व कर्मचारी यांचे कौतुक केले. डॉ.अविनाश सावजी व
डॉ.आशिष सातव यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेबद्दल माहिती दिली. वैद्यकीय व्यवसायातून
सामाजिक कार्य करावे असे आवाहन केले. डॉ. किशोर इंगोले यांनी विद्यार्थ्यांच्या भेटी
घेत मागदर्शन केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ.नितीन अंभोरे यांनी प्रास्ताविक
केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाकरीता नियुक्त कंत्राटदार श्री. देशमुख
यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलिप सौंदळे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे
वैद्यकीय अधिक्षक डॉ.अमोल नरोटे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद
पवार, प्रशासकीय अधिकारी संजय मैदानकर, शिवम घारड, जयश्री घाडगे, पियूष सरोदे उपस्थित
होते.
0000
शनिवारी मतमोजणीला शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल
*पर्यायी मार्गांचा वापराचे पोलीस विभागाचे आवाहन
अमरावती, दि.19 (जिमाका) : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी विद्यापीठ रस्त्यावरील लोकशाही भवनात होणार आहे. यानिमित्ताने शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्ग वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकशाही भवनात सकाळी 8 वाजेपासून बडनेरा व अमरावती विधानसभा क्षेत्राची मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रीया सुरू असताना लोकशाही भवन परिसरात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकशाही भवन असलेल्या बियाणी चौक ते विद्यापीठ चौक या मार्गाचे कॉक्रीटीकरणाचे काम अपूर्ण आहे. मतमोजणी प्रक्रीया दरम्यान येणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर वाहतुकींची कोंडी, अपघातासारखी अप्रिय घटना घडुन सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबी लक्षात घेता शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी कळविली आहे.
बियाणी चौक ते तपोवन गेट दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी 6 वाजता ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद राहील.
नागरिकांसाठी पर्यायी मार्ग मार्डी मार्गे तसेच तपोवन गेट परिसरातील निवासी वसाहतील वाहन चालकांना अमरावती शहरात येण्यासाठी पर्यायी मार्ग-विद्यापीठ चौक, रचना सृष्टी, विक्रांत लॉन, दंत महाविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, अंधविद्यालय, चपराशीपूरा. बियाणी चौकाकडून मार्डी रोडकडे तसेच तपोवन परिसरातील निवासी वसाहतील वाहन चालकांनी पर्यायी मार्ग-चपराशीपूरा, अंधविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, दंत विद्यालय, विक्रांत लॉन, रचना सृष्टी, विद्यापीठ चौक. बियाणी चौक ते विद्यापीठ चौक मार्गावरील नागरी वस्ती चिलम छावणी, व्यंकय्यापूरा, जिजाऊ नगर, ओम कॉलनी येथील वाहन चालकांना मुख्य मार्गावर प्रवेश बंद राहणार असल्याने त्यांनी परिसरातील उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
अमरावती जिल्हा मिशन - 75
जिल्ह्यातील सर्व मतदारांना लोकशाहीच्या उत्सवाचे निमंत्रण
मतदानासाठी जिल्हाधिकारी यांचे आवाहन
अमरावती, दि. 19 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ची घोषणा केलेली असून उद्या, बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघांत मतदान होणार आहे. यादिवशी आपण आपल्या कुटुंबीयांसह मतदात करण्यास अवश्य यावे, असे जाहीर निमंत्रण जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नागरिकांना दिले आहे.
आपल्या कुटुंबातील सदस्य ज्यांची अमरावती जिल्ह्याच्या 8 मतदारसंघाच्या मतदार यादीत नावे आहेत, तथापि शिक्षण व नोकरी निमित्ताने अन्य ठिकाणी राहत असतील, तर ते जिथे काम करत असतील तेथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे. उद्या बुधवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी खास मतदानासाठी सुटी आहे.
लोकशाहीच्या मतदानाला येतांना निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, वाहन चालक परवाना, फोटो असलेले बँक पासबुक, मनरेगा जॉब कार्ड इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणावे. मतदार ओळख चिट्ठी आपणास घरोघरी पाठविली आहे. त्याव्यतिरीक्त मतदार ओळख चिट्ठी (Voter Slip) निवडणूक आयोगाच्या electoralsearch.ac.gov.in या संकेतस्थळावरुन काढता येईल.
मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आपली गैरसोय होणार नाही. आपल्या कुटुंबात दिव्यांग बांधव अथवा ज्येष्ठ नागरीक असल्यास त्यांचेसाठी Saksham App वर देखील नोंदणी करणे शक्य आहे. त्यांचेसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
प्रत्येक मतदान केंद्रावर सावली, प्राथमिक औषधोपचार, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. मतदानाचा हक्क बजावून आपला सेल्फी फोटो स्वतःच्या मोबाईल Whats App वर Status ठेवावा. मतदानाविषयी आपणांस काही अडचण असल्यास आमच्याशी 1950 वा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. मिशन 75 अभियानांतर्गत मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे .
000000
No comments:
Post a Comment