राजस्थानचे राज्यपाल
हरिभाऊ बागडे यांची अडसड कुटुंबियांना भेट
अमरावती, दि. 25 (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ
बागडे यांनी आज अरुणभाऊ अडसड यांच्या कुटुंबियांना सदिच्छा भेट दिली.
राज्यपाल श्री. बागडे यांनी गनेडीवाल ले-आउट येथील अडसड
यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री. अडसड यांच्या प्रकृतीची विचारपूस
केली. अडसड कुटुंबियांच्या वतीने श्री. बागडे यांचे औक्षवण करण्यात आले. तसेच शाल व
श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या भेटीनंतर ते नागपूरकडे रवाना झाले.
0000
बालकांचे बँकखाते आधार सिडिंग करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : महिला व बाल विकास विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपण योजना राबविण्यात येते. या येाजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी बालकांचे बँकखाते आधार सिडिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ प्राप्त होत असलेल्या दहा वर्षाच्या आत असलेल्या बालकांचे पालकांसोबत संयुक्त खाते उघडून सदर खात्याशी बालकाचा आधार क्रमांक सिडिंग करावा. तसेच बालकांचे वय दहा वर्षापेक्षा अधिक असल्यास स्वतंत्र बँक खाते उघडून आधार क्रमांक सिडिंग करावा. बालकाचा आधार क्रमांक बँक खात्याशी सिडिंग नसल्यास सदर योजनेचा लाभ जमा होणार नाही, याची लाभार्थ्यांच्या पालकांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास भवन, राणी दुर्गावती चौक, गर्ल्स हायस्कुलजवळ, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे यांनी केले आहे.
00000
पशूपालकांनी पशूगणनेस सहकार्य करावे
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
*राज्यात 21व्या पशूगणनेस सुरवात
*माहिती पुस्तिकेचे विमोचन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : आजपासून राज्यातील पशूगणनेला सुरवात झाली आहे. सांख्यिकी माहितीसाठी ही पशूगणना अचूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे पशूगणनेसाठी पशूपालक, गौशाळाचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय कावरे, महानगरपालिका उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, परिवहन विभागाचे सिद्धार्थ ठोके यांच्यासह अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, पशूची सांख्यिकी माहिती व्हावी, यासाठी दर पाच वर्षांनी पशूगणना होते. यासाठी प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी पशूपालकांनी सहकार्य करावे, तसेच जिल्ह्यात जनावरांचे 100 टक्के रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. तसेच अशासकीय सदस्यांना कामकाजासाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बँक खातेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे समितीचे कामकाज करणे सुलभ होणार आहे.
पोलिस विभागातर्फे गेल्या कालावधीत पकडलेल्या जनावरांची माहिती सादर करण्यात आली. यात 586 जनावरे जप्त करण्यात आली असून 65 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेली जनावरे नोंदणीकृत असलेल्या गौशाळेत देण्यात यावी. यामुळे त्यांचे पोषण योग्यप्रकारे होण्यास मदत मिळेल. नोंदणी केलेल्या गौशाळांना 20 लाख रूपये अनुदान आणि प्रती जनावरामागे प्रतिदिन 50 रूपये अनुदान मिळणार आहे. पोलिसांनी गौवंश वाहतूक केलेली वाहने जप्त करून परिवहन विभागाच्या मदतीने वाहनाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसेच वन विभानानेही त्यांच्याकडील पकडलेली जनावरे नोंदणीकृत गौशाळेला देण्याची कार्यवाही करावी, असे सांगितले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment