कुष्ठरोगाबाबत अमरावतीत कार्यशाळा
अमरावती,
दि. 29 (जिमाका): कुष्ठरोगाविषयी समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी मंगळवार, दि. 17 डिसेंबर
2024 रोजी सकाळी 10 वाजता ‘कुष्ठरोग जनजागृती आणि मानवअधिकार’ विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा हॉटेल ग्रेस इन येथे आयोजित
केली आहे. सदर कार्यशाळेचे आयोजन आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्था, पुणे यांच्यामार्फत
करण्यात आले आहे.
00000
स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास रविवारपर्यंत
मुदतवाढ
अमरावती, दि. 29 (जिमाका): शासनाने भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी रविवार, दि. 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी
भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये
थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते.
योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना
hmas.mahait.org वर उपलब्ध आहे.
परिपूर्ण कागदपत्रासह महाविद्यालयातील समानसंधी
केंद्रामार्फत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये दि. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत
विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त,
समाज कल्याण, अमरावती, तसेच speldswo_amt@rediffmail.com व दुरध्वनी क्रमांक
0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर
यांनी केले आहे.
00000
एकलव्य शाळेतील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 29 (जिमाका): , चिखलदरा व धारणी येथील
एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये येत्या शैक्षणिक वर्षात आदिवासी क्षेत्रातील
अनुसूचित जमाती, आदीम जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून
अर्ज मागविण्यात येत आहेत.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात सहावीच्या सीबीएससी
माध्यम, तसेच सातवी ते नववीच्या वर्गातील अनुशेष
भरून काढण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे. शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, सर्व जिल्हा
परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळा तसेच इतर शाळेत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात
पाचवी ते आठवीत प्रवेशित असलेले विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न सहा लक्षापेक्षा
जास्त नसावे.यासाठी परीक्षा दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीत आश्रमशाळेच्या ठिकाणी घेण्यात येईल.
शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रवेश अर्ज प्रकल्प
कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती
येथे स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच प्रवेश अर्ज सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व
एकलव्य रेसिडेंशिल स्कुल, चिखलदरा येथे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प धारणी यांचे दुरध्वनी क्रमांक 07226-224217 तसेच 9370593558 या क्रमांकावर
संपर्क साधावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प धारणीच्या प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे.
00000
सोमवारी जिल्हा लोकशाही दिन
अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात
आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
कार्यालयाचे अधीक्षक यांनी
केले आहे.
00000
ज्येष्ठ साहित्यिक
व कलावंत मानधनासाठी आधार पडताळणी करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 29 (जिमाका): राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेच्या
लाभार्थ्यांना मानधनात डीबीटी द्वारे अदा करण्यात येत आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी आधार
क्रमांकाची पडताळणी दि. 13 डिसेंबर 2024 पुर्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आधार पडताळणी करण्यासाठी mahakalasanman.org/AdharVerification.aspx या लिंकवर आाधार व्हेरिफिकेशन करावे. आधार क्रमांक
पडताळणी केली नसल्यास लाभार्थी मानधनापासून वंचित राहतील. तसेच आधार क्रमांक
अद्यावत करून बँक खात्याशी संलग्न करून व दुरध्वनी क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्याची
खात्री करावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषदचे बालासाहेब
बायस यांनी केले आहे.
00000
पाच लाख बालकांना जंतनाशक गोळी
वितरीत होणार
*बुधवारी जंतनाशक दिन राबविणार
अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत
बुधवार, दि. 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी
1 ते 19 वर्षातील मुलांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 5 लाख 19 हजार
239 लाभार्थ्यांना बुधवारी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन दि. 4 डिसेंबर आणि मॉप अप दिन दि.
10 डिसेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. यात 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलीना
जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा
उंचावण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि अतिरिक्त जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविला
जाणार आहे. या मोहिमेत 1 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना अर्धा गोळीची मात्रा पावडर
करून दिली जाणार आहे, तर 2 ते 19 वर्षे वयोगटातील सर्वांना एक गोळी चावून खावी लागणार
आहे. ही मोहिम सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी, शाळाबाह्य मुलांमध्ये राबविण्यात
येणार आहे.
या गोळीचा फायदा रक्ताशय अॅनिमिया कमी होतो, शाळेतील उपस्थिती नियमित होते, बालक क्रियाशील बनते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शारीरिक व बौद्धीक वाढ सुधारते, आरोग्य चांगले राहते, अल्बेंडेझोलच्या एका डोसमुळे जंताचा नाश होतो. या गोळीचा दुष्परिणाम नाही, ही गोळी प्रत्यक्ष खाऊ घालायची आहे. ती घरी घेऊन जाता येणार नाही. शाळाबाह्य मुलांना आशा स्वयंसेविकेमार्फत गोळीचे वाटप करण्यात येणार आहे. पालक, शिक्षक, संस्थानी मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
0000
क्रीडा क्षेत्राला प्रशासनाची सर्वतोपरी मदत
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 29(जिमाका) : जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जिल्हा प्रशासनातर्फे नेमबाजीचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांतराव चेंडके, सचिव माधुरी चेंडके, शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेचे संचालक सतिश माळोदे, डॉ. एस. एस. कुमार, डॉ. एस. सी. देशपांडे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित होते.
श्री. कटियार यांनी, देशामध्ये आज क्रिडा क्षेत्रात मोजक्या चांगल्या संस्था कार्यरत आहे. यात एचव्हीपीएमचे नाव आहे. संस्थेचा जुना इतिहास आहे. संस्थेने परंपरा आणि आदर्श कायम ठेवली आहे. संस्थेने नेमबाजीसाठी सुविधा निर्माण करून दिली आहे. त्यामुळे प्राविण्यप्राप्त खेळाडू तयार होऊन पदके प्राप्त करीत आहे. प्रशासन खेळाडूंना चांगल्या सुविधा प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करून पदके प्राप्त करून संस्थेला गौरव प्राप्त करून द्यावा, असे आवाहन केले.
श्री. माळोदे यांनी संस्थेने नेमबाजीसाठी कमी वेळेत कायापालट करून खेळाडूंसाठी सुविधा निर्माण केली आहे. संस्थेने मिशन ऑलिंपिकचे उद्दिष्ट ठेवले आहे, यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.
श्रीमती चेंडके यांनी प्रास्ताविकातून सर्वांच्या मदतीने नेमबाजीची सुविधा निर्माण झाली आहे. या खेळासाठी उपलब्ध असलेल्या सुविधेतून खेळाडूंनी नेत्रदिपक यश मिळविले आहे. यानंतरही संस्थेतर्फे खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अत्याधुनिक साहित्य देण्यात आल्याबद्दल आभार मानले.
यावेळी जान्हवी मानतकर यांच्यासह विविध स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आनंद महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
00000
No comments:
Post a Comment