Monday, December 2, 2024

DIO NEWS AMRAVATI 02.12.2024

 नामांकित शिक्षण संस्थेतील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ

            अमरावती, दि. 02 (जिमाका) : देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. पात्र इच्छुकांकडून सन 2024-25 या वर्षासाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            शैक्षणिक संस्थामधील सन 2024-25 मधील प्रवेश प्रक्रीया अद्याप पूर्ण झाली नाही. परिपूर्ण अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह दि. 31 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्ट किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावे लागणार आहे. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000

फलोत्पादन अभियानात शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

        अमरावती, दि. 02 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. यासाठी मोहिम स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहे.

मंजूर कार्यक्रमाच्या तुलनेत खर्च आणि प्राप्त अर्जाचे प्रमाण कमी असल्याने दि. 5 डिसेंबर 2024 पर्यंत क्षेत्रियस्तरावरून शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर उपलब्ध असणाऱ्या सुविधा, त्यावर अर्ज करण्याची कर्यपद्धतीबाबत विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. अनूसुचित जातीच्या शेतकऱ्यांनी क्षेत्रविस्तार घटाकांतर्गत फुलशेती, मिरची लागवड, नियंत्रित शेती घटकांतर्गत शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, प्लॉस्टिक मलचिंग, काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत पॅक हाऊस, कांदाचाळ यांत्रिकीकरण घटाकांतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलरसाठी घटकनिहाय महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपूते यांनी केले आहे.

0000

प्रति थेंब पीक योजनेच्या अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

        अमरावती, दि. 02 (जिमाका) : राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ठिंबक व तुषार संच खरेदीसाठी अनुदान दिले जाते. यासाठी अनुसूचित जाती, जमातीतील पात्र इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदान देय आहे. सदर अनुदान हे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजना, बिरसा मुंडा योजना या योजनांमधून दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत ठिंबक व तुषार सिंचन संचाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्याकडे मालकी हक्काचा सातबारा व आठ अ आवश्यक आहे. तसेच ओलीताची सोय असणे आवश्यक आहे. या योजनोचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेचा अनूसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपूते यांनी केले आहे.

00000
















जिल्हास्तरीय युवा महोत्सवला उत्स्फूर्त प्रतिसाद

        अमरावती, दि. 02 (जिमाका): नेहरू युवा केंद्रातर्फे मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा उत्साव घेण्यात आला. या महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यात विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना गौरविण्यात आले.

महोत्सवाचे उद्घाटन मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, क्रीडा अधिकारी राज वडते, त्रिवेणी बानते, राष्ट्रीय सेवा योजना सेवा योजना जिल्हा समन्वय डॉ. विशाल मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना कार्याक्रम अधिकारी प्रा. मंदा नांदुरकर, पर्यवेक्षिका प्रा. ममता म्हस्की यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

            महोत्सवातील पहिल्या टप्प्यात स्मार्टफोन फोटोग्राफी, चित्रकला, कविता लेखन, कथा लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. यात चित्रकला स्पर्धेत मुकेश अढाऊ - प्रथम, जयंत गीड - द्वितीय, मेघना नांदगवळी - तृतीय, कविता लेखन स्पर्धेत सिया परिहार - प्रथम, जुही वानखडे - द्वितीय, पुजा गुंजरकर - तृतीय, वक्तृत्व स्पर्धेत सौरभ गुडदे - प्रथम, श्रावणी शेटे - द्वितीय, मुक्तिका कुबडे - तृतीय, कथा लेखन स्पर्धेत शेजल गडदे - प्रथम, वेंकटेश नेरकर - द्वितीय, अवंतिका मिलखे - तृतीय यांनी क्रमांक पटकाविला.

युवा महोत्सवाच्या दुसऱ्या टप्पात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत स्पर्धा मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह आणि समूह आणि वैयक्तिक गटातील विज्ञान मेळावा शिवाजी विज्ञान महाविद्यालयात दि. 4 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

0000

समाजकल्याण विभागातर्फे आज दिव्यांग जनजागृती रॅली

अमरावती, दि. 02 (जिमाक) : जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे मंगळवार, दि. 3 डिसेंबर रोजी दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद येथून सकाळी 10.30 वाजता रॅलीची सुरुवात होणार आहे.

शहरातील दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कार्यशाळेच्या वतीन शहरात दिव्यांग जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. जनजागृती रॅली ही जिल्हाधिकारी कार्यालय चौक येथून सुरू होऊन गर्ल्स हायस्कूल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इर्विन चौक ते सांस्कृतिक भवन असा राहणार आहे.

रॅलीत अमरावती येथील अंध प्रवर्गाच्या 2 शाळा, मुकबधिरांच्या 3 शाळा, मतिमंदांच्या 6 शाळा, अस्थिव्यंगाच्या 2 कर्मशाळा अशा 13 शाळा, कर्मशाळेतील दिव्यांग विद्यार्थी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. दिव्यांगाविषयी जनजागृतीचा संदेश, विविध प्रकारच्या वेशभूषा, ब्रिदवाक्य, बॅनर्स आदींचा रॅलीत समावेश राहणार आहे, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड यांनी कळविले आहे.

000000

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 16 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 02 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी गुरूवार, दि. 16 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना hmas.mahait.org  वर उपलब्ध आहे.

परिपूर्ण कागदपत्रासह महाविद्यालयातील समानसंधी केंद्रामार्फत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये दि. 16 डिसेंबर 2024 पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती, तसेच speldswo_amt@rediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

अमरावती, दि. 02 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 3 डिसेंबर ते  दि. 17 डिसेंबर 2024च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...