Monday, December 23, 2024

DIO NEWS AMRAVATI 23.12.2024 - 1





जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करीना थापाचा सत्कार

* प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड

* गुरूवारी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत गौरव

 

अमरावती, दि. 23 : अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीमध्ये सिलींडरचा स्फोट होण्यापासून रोखणाऱ्या आणि 70 कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या करीना थापाचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सत्कार केला. यावेळी करिना थापाला शिक्षण आणि खेळासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले. तसेच तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. कटियार यांनी करिना आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. श्री. कटियार यांनी थापा कुटुंबियांची माहिती घेतली. करीना हिची शैक्षणिक माहिती तसेच खेळातील अभिरूचीबाबत माहिती घेतली. बॉक्सींग खेळात तिचे प्राविण्य असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तिला योग्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. करीनाने शिक्षण आणि खेळामध्ये मेहनत करावी, खेळामध्ये सुरवातीच्या काळात मदत मिळणे कठिण असते, त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे तिला पूर्ण मदत करण्यात येईल, असे सांगितले.

 

यावेळी जिल्हाधिकारी यांनी करिना हिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच भेटवस्तूही दिल्या. करीनाच्या धाडसाची दखल घेत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी करीनाची निवड केली आहे. तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात गुरूवार, दि. 26 डिसेंबर रोजी समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

00000





   

जिल्हा नियोजनमधील मागणी तात्काळ नोंदवावी

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 23 : जिल्हा नियोजनमधील वितरीत करण्यात आलेला निधी तातडीने खर्च करावा, तसेच आवश्यक असलेल्या निधीची मागणी तातडीने नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के आदी उपस्थित होते. श्री. कटियार यांनी, निवडणुकीपूर्वी मान्यता घेऊन सुरू करण्यात आलेली कामे चालू ठेवावीत. परंतू ज्या कामांच्या निविदा झालेल्या नाहीत, अशा कामांची आवश्यकता तपासून कामे सुरू करावीत. प्रामुख्याने शाळा दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. रस्ते, आरोग्य विभागाच्या कामांचे दायित्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे खर्च होऊ शकतील, अशाच कामांचे दायित्व सादर करावेत. तसेच मागील दायित्व पूर्ण करून नवीन कामे घेण्यात यावीत.

 

यावर्षीचा निधी खर्च करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी. प्रशासकीय मान्यता घेतली नसल्यास निधी इतर विभागाकडे वळता करण्यात येतील. मान्यता दिलेली कामे निविदा प्रक्रिया करून सुरू झाली असल्यास अशी कामे पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यामुळे जिल्हा नियोजनचे चित्र चांगले दिसण्यास मदत होईल.

सुशासन सप्ताह प्रभावीपणे राबवावा.

 

केंद्र शासनातर्फे सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. हा सप्ताह प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. नागरिकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ई-ऑफीसचा अवलंब करावा, असे आवाहन केले. कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या चांगल्या कामांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असे निर्देश दिले.

 

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...