Wednesday, December 11, 2024

DIO AMRAVATI NEWS 11.12.2024

 

निवृत्ती वेतनधारकांनी 20 डिसेंबरपर्यंत

ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका) : सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दि. 20 डिसेंबरपर्यंत ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवृत्तीवेतनधारकांना आपले ह्यातीचे प्रमाणपत्र विहित मुदतीत बँकेत जाऊन सादर करावे, विहित कालावधीत ज्या निवृत्तीवेतनधाराकांनी सादर केले नाहीत, त्यांनी ह्यात प्रमाणपत्र तयार करून त्यावर सक्षम अधिकारी यांची स्वाक्षरी घेऊन दि. 20 डिसेंबरपर्यंत अमरावती कोषागार कार्यालयात सादर करावेत, सदर कालावधीत ह्यात प्रमाणपत्राची कार्यवाही केली नसल्यास निवृत्तीवेतनाचे प्रदान होणार नाही, असे आवाहन कोषागार अधिकारी अमोल ईखे यांनी केले आहे.

0000

रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

*सहभागासाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत

अमरावती, दि.11 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव होण्यासाठी पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. रब्बी हंगाम 2024 स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पीकस्पर्धेमध्ये रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस यांचा समावेश केला आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावे जमीन असणे व ती जमीन जो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, ठरवून दिलेल्या प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा 31 डिसेंबर सादर करावा लागणार आहे.

 

पिकस्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस 5 हजार रुपये, दुसरे बक्षिस 3 हजार रुपये आणि तिसरे बक्षिस 2 हजार रुपये असे स्वरुप आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस 7 हजार रुपये व तिसरे बक्षिस 5 हजार रुपये असे स्वरुप आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे बक्षिस 40 हजार रुपये आणि तिसरे बक्षिस 30 हजार रुपये असे स्वरुप आहे.

स्पर्धेसाठी पिकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये, तर आदिवासी गटासाठी 150 रूपये राहणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, तसेच शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

तक्रार निवारण समितीची माहिती सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका) : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (संरक्षण, प्रतिबंध आणि मनाई) अधिनियम 2013 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. याची माहिती ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय, तसेच खासगी दुकाने, आस्थापना, शाळा-महावि‌द्यालये, हॉटेल्स, उद्योग, दवाखाने आदी आस्थापनेवर दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करून याबाबतची माहिती ऑनलाईन करावी लागणार आहे.

समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला अध्यक्ष असावी. महिलांच्या प्रश्नांची संबंधित असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव व काय‌द्याचे ज्ञान आहे अशा कर्मचाऱ्यांमधून किमान दोन सदस्य, तसेच अशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यामधील एक सदस्य असावा. समितीमध्ये किमान 50 टक्के सदस्य महिला राहतील. समितीचा कार्यकाल हा तीन वर्षाचा राहणार आहे.

शासनस्तरावर अंतर्गत तक्रार समितीची माहिती ऑनलाईन अपडेट करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केल्याची माहिती तात्काळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अमरावती, महिला व बालविकास भवन, गर्ल्स हायस्कूल चौक, कॅम्प रोड, अमरावती (dwcdoamravati@gmall.com) येथे सादर करणे आवश्यक आहे. ज्या कार्यालयामध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहे, त्यांनी स्थानिक तक्रार समिती, अमरावती, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे, यांनी केले आहे.

0000

कोठारा लेप्रसी हॉस्पीटलमध्ये 24 शस्त्रक्रिया

अमरावती, दि. 11 (जिमाका) : कोठारा येथील लेप्रसी हॉस्पीटलमध्ये कृष्ठरोगाच्या 24 शस्त्रक्रिया पार करण्यात आल्या. सहायक संचालक, सदर शिबीर आरोग्य सेवा यांच्या सहकार्याने दि. 8 ते 9 डिसेंबर 2024 कालावधीत पार पडले.

शिबीरात कुष्ठरोगामुळे हात, पाय व डोळा यांना आलेल्या विकृतींवर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया अधिक्षक डॉ. मिलींद चव्हाण यांचे मार्गदर्शनात करण्यात आल्या. लेप्रसी मिशनचे कार्यकारी संचालक डॉ. प्रेमलदास व डॉ. विजयकुमार यांनी सदर शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. शिबीरात अमरावती 3, यवतमाळ 8, वाशिम 1 गोंदिया 5, भंडारा 3, वर्धा 2, मध्य प्रदेश 2 असे एकुण 24 व्यक्तींवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शिबीरासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. संदिप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार, डॉ. विनंती नवरे यांनी सहकार्य केले.

00000

कृषीमाल प्रक्रिया उद्योगाची कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

            अमरावती, दि. 11 (जिमाका): जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्मा आणि कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनतर्फे शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषक भवनात कृषीमाल प्रक्रिया उद्योग कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

शेती स्वावलंबन मिशन अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे उपस्थित होते. स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी प्रशांत नाईक, विभागीय कृषी अधिक्षक निलेश ठोंबरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, विभागीय पणन व्यवस्थापक दिनेश डागा उपस्थित होते.

ॲड. हेलोंडे यांनी शेतकरी अन्नधान्य आणि फळे पिकवितो. त्यांनी शेती पिकाचे मूल्यवर्धन करावे, असे आवाहन केले. उद्योग एक संधी समजून तरूणांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यशाळेत अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी विविध परवानग्याबाबत माहिती दिली. श्री. लहाळे यांनी योजनेंतर्गत विभागाची माहिती सादर केली, तांत्रिक मार्गदर्शक सत्रामध्ये विषय विशेषज्ञ राहुल घोगरे यांनी संत्रा प्रक्रिया उत्पादनांची माहिती दिली. विषय विशेषज्ञ डॉ. प्रणिता कडू यांनी भरड धान्याचे महत्त्व सांगितले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्यामकुमार शर्मा यांनी योजनांची माहिती दिली.

आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी प्रास्ताविकातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्ह्यातील 706 प्रस्ताव मंजूर असून यातील 471 प्रस्तावाचे कर्ज विरतण झाले आहे. त्यात 5 कोटी रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले असल्याचे सांगितले. चंदाताई वानखडे यांनी पापड उद्योग, तर बार्शी टाकळी येथील ज्योती महल्ले यांनी तेल घाणी उद्योगाची यशोगाथा सादर केली. गजानन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. निलेश राठोड यांनी आभार मानले.

000000

राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

            अमरावती, दि. 11 (जिमाका) : विभागीय क्रीडा संकुलात आयोजित 68व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेचे मंगळवार, दि. 10 डिसेंबर रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले.

68 वी राष्ट्रीय शालेय कबड्डी 14 वर्ष मुले, मुली वयोगट क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या उपस्थित करण्यात आले. सिव्हील न्यायधीश वरिष्ठस्तर राजेंद्र गोगले, राज्य परिवहन अधिकारी कांचन जाधव, विदर्भ ॲम्युचअर कबड्डी संघटनेचे सचिव जितूभाऊ ठाकुर, एसजीएफआय पर्यवेक्षक तृप्ती अग्रवाल, नविन खंडूजा, स्पोर्ट्स डायरेक्टर तथा सिनेट सदस्य सुभाष गावंडे, श्री. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी नितीन चव्हाळ, एसजीएफआय सदस्य सुरेद्र शर्मा, उपस्थित होते.

श्रीमती महापात्र यांनी, खेळाडुंनी खेळ भावनेने खेळाचा आनंद घेऊन खेळ प्रवृत्तीस प्रोत्साहन द्यावे. सकारात्मक विचार करून व जीवनामध्ये यशस्वी शिखर गाठावे असे मार्गदर्शन केले. नरेंद्र गाडे यांच्या मार्गदर्शनात मल्लखांब खेळाचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी आभार मानले.

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...