जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीएचडीप्राप्त अनिकेत देशमुखचा सत्कार
पीएचडी प्राप्त करणारा पहिला अनाथ
अमरावती, दि. 30 (जिमाका) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये पीएचडी प्राप्त करणारा अनिकेत वीरेंद्र देशमुख यांचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे श्री. देशमुख हे अमरावती जिल्ह्यातून डॉक्टरेट प्राप्त करणारे पहिले अनाथ विद्यार्थी ठरले आहेत.
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचे अनिकेत वीरेंद्र देशमुख यांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट पूर्ण केली आहे. त्यांनी 'कलम 35 ए रद्द करणे : कारणे आणि परिणाम' या विषयावर पीएचडीचा शोध प्रबंध सादर केला आहे. विद्यापीठाने 20 डिसेंबर रोजी अधिसूचना काढून त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे
00000
सहकार व्यवस्थापक पदविका प्रवेश सुरु
अमरावती, दि. 30 (जिमाका) : महाराष्ट्र शासन सहकार विभाग यांच्या वतीने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार सहकारी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकारी व्यवस्थापन पदविका (डि.सी.एम.) अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरस्थ शिक्षण पध्दतीने पूर्ण करता यावा तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये सदर पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरु केला आहे.
या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या, पुणे अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र ,अमरावती येथे दिनांक 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत प्रवेश सुरु राहील. त्यासाठी प्राचार्य भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र येथे संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9881047668 असे प्राचार्य भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, यांनी कळविले आहे.
00000
अडगाव येथील अन्न विषबाधा त्वरित आटोक्यात
आरोग्य विभागाची कार्यवाही
अमरावती, दि. 30 (जिमाका) : अडगाव ता. मोर्शी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 ते 4 इयत्तेची मुले शिकत आहेत. एकूण पटावर 80 बालके असून शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी एकूण 70 बालके शाळेमध्ये उपस्थित होती. शाळेमध्ये बालकांना माध्यान्य भोजनामध्ये वाटाणा खिचडी व मोट देण्यात आली. शनिवारी रात्री 8.30 वाजेनंतर काही बालकांना उलटी व पातळ संडास होण्यास सुरुवात झाली. एकुण 18 बालकांना उलटी, संडास हे लक्षणे घेऊन उपचाराला करिता आणण्यात आले. सर्वांचे वयोगट व लक्षणे सारखे असल्यामुळे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित उपचार सुरु करण्यात आले.
याबाबत माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी जिल्हास्तरीय शीघ्र प्रतिसादपथक तसेच तालुका आरोग्य अधिकारी, मोर्शी यांना तातडीने गावात भेट दिली. डॉ. आसोले जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. जुबेर अली व इतर सदस्य यांनी तातडीनेअडगाव येथे रिस्थितीचा आढावा घेवून उपाययोजना राबविण्यात आल्या. डॉ. प्रविण पारिसे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयस्वाल, डॉ. झुबेर अली, वैद्यकिय अधिकारी डॉ. बागडे, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी तात्काळ कार्यवाही करीत परिस्थिती आटोक्यात आणली.
अडगाव येथील आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये एकलन कक्ष उघडण्यात आले. दोन वैद्यकिय अधिकारी, चार समुदाय आरोग्य अधिकारी, चार आरोग्य सेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. एकलन कक्षामध्ये सर्व औषधे, बेड, रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आलेली असून कक्ष 24 तास कार्यरत आहे.
उपचारासाठी एकूण 31 बालकांना दाखल करण्यात आले असून 23 बालकांना सलाईन मार्फत उपचार करण्यात आले आहे. यापैकी एकुण 11 बालकांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले आहे. सर्व बालकांची प्रकृती स्थिर आहे. शाळेतील इतर बालकांचा आशा स्वंयसेविकेमार्फत घरोघरी जाऊन तपासणी पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत जिल्हा परिषद शाळेमधील तांदुळ, वाटाणा, मोट, कांदा-लसुण मसाला पॅकेट व पाण्याचा नमुना घेण्यात आला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे सर्व बालकांवर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. आरोग्य विभागाच्या चमुच्या प्रयत्नांचे सर्व गावकरी, लोकप्रतिनिधी यांनी कौतुक केले.
00000
नववर्षानिमित्त शहरातील उड्डाणपुल मार्गावरील वाहतुक मार्गात बदल
अमरावती, दि. 30 (जिमाका) : नववर्ष स्वागतासाठी बहुसंख्येने नागरिक विशेषतः तरुण वर्ग आनंदोत्सव साजरा करतात. अशा वेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दि. 31 डिसेंबर 2024 चे रात्री 10 वाजेपासून ते 1 जानेवारी 2025 चे सकाळी 6 वाजेपर्यंत पर्यंत नमुद कालावधीसाठी गाडगेबाबा समाधी ते शिवाजी शिक्षण संस्था व नेहरु स्टेडियम कडे येणारा उड्डाणपुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन उड्डाणपुल , कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन आवागमन करणारी सर्व प्रकारची वाहनांची नमुद कालावधीत वाहतुक बंद करण्यात येत आहे. जो कोणी वाहनधारक सदर अधिसुचनेचे उल्लघंन करील त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 नुसार कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त कल्पना बारवरकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment