Thursday, December 5, 2024

DIO NEWS AMRAVATI 05.12.2024

 

निम्न पेढी प्रकल्पाच्या पूनर्वसनाला गती द्यावी

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 5 (जिमाका) : निम्न पेढी प्रकल्प राज्याचा प्राधान्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पात बाधीत गावांचे तातडीने पूनर्वसन करण्यासाठी पावले उचलण्यात यावी. तसेच पूनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या गावातील शासकीय सेवा पूनर्वसीत गावात स्थलांतरीत करून सुरू कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात निम्नपेढी प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी अमर राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.

श्री. कटियार यांनी, प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी बाधीत गावातील नागरिकांचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. पूनर्वसित गावात सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची सोय प्राधान्याने करण्यात यावी. नागरिकांनी स्थलांतरीत होण्यासाठी यंत्रणांनी लक्ष केंद्रीत करावे. तसेच याठिकाणी असलेल्या सार्वजनिक सेवा स्थलांतरीत करून नवीन गावात सुरू कराव्यात.

प्रकल्पाला गती येण्यासाठी तातडीने नोटीस प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच नवीन गावात ग्रामसभा घेण्यासाठी सूचना देण्यात याव्यात. स्थलांतरणासाठी मार्चपर्यंतची मुदत देण्यात यावी. दोन गावांच्या पूनर्वसनासाठी खासगी जागेचे भूसंपादन करणे आवश्यक आहे. यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यात जागेची निश्चित होऊन ग्रामसभेत ठराव घेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

000000

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

*31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत

            अमरावती, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी डेसी (डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्सटेंशन सर्व्हीसेस फॉर इनपूट डिलर्स) हा एक वर्ष कालावधीच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांना दि. 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सदर प्रशिक्षण प्राचार्य, प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, रामेती, अमरावतीमार्फत चालविण्यात येणार आहे. प्रवेशासाठी पात्रता कमीतकमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुकांना दहावी किंवा बारावी पासचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, आधार कार्ड, चार पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे, कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना असल्यास परवान्याची छायांकित प्रत आदी कागदपत्रे प्रवेशासाठी आवश्यक आहेत. प्रशिक्षण वर्गासाठी नव्याने परवाना काढू इच्छिणाऱ्या प्रवेश पात्र उमेदवारासाठी प्रवेश शुल्क 20 हजार रुपये आहे. तसेच कृषी निविष्ठा परवाना असलेल्या प्रवेश पात्र विक्रेत्यांसाठी प्रवेश शुल्क 10 हजार रूपये राहणार आहे. प्रवेश अर्जासाठी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती येथे संपर्क करावा. उमेदवारांनी दोन प्रतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रवेश अर्ज www.manage.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

नव्याने कृषी निविष्ठा परवाना काढु इच्छिणाऱ्या प्रवेश पात्र उमेदवार, तसेच परवाना असलेले पात्र उमेदवारांनी दि. 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

00000

मत्स्यव्यवसायीकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 05 (जिमाका) : नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक, मत्स्यव्यवसाय संबंधित व्यक्ती, मासेमार सहकारी संस्था, फर्म नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत्स्य व्यावसायिकांनी नोंदणी केल्यास सरकारी योजना आणि इतर मत्स्य व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहे, यामुळे मच्छीमार आणि मत्स्यपालक शेतकरी, मत्स्य व्यवसायातील पारंपारिक मासेमारांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

            एनएफडीपीवर नोंदणी केल्याने मत्स्यपालन विकासासाठी सरकारी योजना आणि अनुदाने मिळणे सोयीस्कर होईल. सरकारी योजनेमध्ये सहभाग घेता येईल. नोंदणीकृत वापरकर्त्यांना सर्वोत्तम पद्धतीने आणि नवीन मत्स्य व्यवसाय तंत्रज्ञानाबद्दल अद्ययावत माहिती आणि इशारा प्राप्त होईल. नोंदणीकृत वापर करते देशभरातील व्यावसायिक आणि इतर मच्छीमारांच्या नेटवर्कशी जुळू शकतील. पोर्टलवर मच्छिमार, मत्स्य पालक आणि इतर भागधारकांची डिजिटल नोंदणी तयार होईल, ज्यामुळे सेवा आणि आर्थिक लाभ मिळणे सोपे होईल.

माशांचे उत्पादन, संसाधनाची उपलब्धता, बाजारपेठेतील कल आणि इतर महत्त्वाच्या माहितीवरील वास्तविक डेटा वेळेत संकलित होऊन त्या अनुषंगाने योजनेची आखणी करता येऊ शकेल. मत्स्यव्यवसाय संबंधित घटकासाठी नवीन विकासाची उभारणी करण्यास मदत होईल. एका क्षेत्राखाली म्हणून जिल्ह्यातील सर्व मत्स्यकास्तकार, मत्स्य शेतकरी, मत्स्य विक्रेते, मत्स्यफर्म, मत्स्य कंपनी, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था तसेच त्यांचे सर्व सभासदांनी एनफडीपी पोर्टलवर नाव नोंदणी वैयक्तिक किंवा संस्थेतर्फे करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसायचे सहायक आयुक्त एम. एम. मेश्राम यांनी केले आहे.

0000

 

दहावी, बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहिर

अमरावती, दि. 05 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फै दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहिर केले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम, तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी, 2025 ते दि. 18 मार्च 2025, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्याक्रम प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार, दि. 24 जानेवारी 2025 ते सोमवार, दि. 10 फेब्रुवारी 2025, माध्यमिक शालन्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी, 2025 ते सोमवार, दि. 17 मार्च, 2025, प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोमवार, दि. 3 फेब्रुवारी, 2025 ते गुरूवार, दि. 20 फेब्रुवारी, 2025 या कालावधीमध्ये आयोजित केली आहे.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहणार आहे. सदर छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखाची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी कळविले आहे.

0000

सोमवारपासून राष्ट्रीय शालेय कब्बडी स्पर्धा

अमरावती, दि. 5 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे 14 वर्षाखालील मुला-मुलींची 68वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोमवार, दि. 9 ते दि. 12 डिसेंबरपर्यंत या क्रीडास्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये चालणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

000000

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा उत्साहात समारोप

अमरावती, दि. 5 (जिमाका): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना व श्री शिवाजी शिक्षण संस्था यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृहात उत्साहात पार पडला.

क्रीडा उपसंचालक विजय संतान अध्यक्षस्थानी होते. पंडीतजी पंडागडे, प्रा. पंकज नागपूरे, प्राचार्य गजानन कोरपे, प्रमोद गावंडे, जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

            युवा महोत्सवांतर्गत ‘विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना’ स्पर्धेचे उद्घाटन उद्यान विज्ञान महाविद्यालयातील सायन्स सेंटर येथे झाले. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक संकेत कोरडे, द्वितीय क्रमांक आभा बंड, तृतीय क्रमांक अर्पिता जिचकार आणि विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना स्पर्धेमध्ये सामुहिक गटात प्रथम क्रमांक वैभवी जगताप, नचिकेत यावले, द्वितीय क्रमांक गायत्री सरदार आणि वैष्णवी ठाकरे, तृतीय क्रमांक सिद्धी ठाकूर आणि तनिषा तायडे यांनी पटकविला. स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ. स्वप्नील अरसड, डॉ. श्रीकांत वडाळ, डॉ. सौरभ पवनीकर यांनी काम पाहले. मंजित मेश्राम, शिशीर मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल बासुतकर यांनी आभार मानले.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...