परराज्यातील पशूंचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करावी
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 13 (जिमाका) : इतर राज्यातून येणाऱ्या पशूंमुळे लंपीसारख्या आजार संसर्गामुळे झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पशूची तपासणी करून टॅगींग करावे, तसेच संसर्ग टाळण्यासाठी दक्ष राहून उपाययोजना करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पशूसंवर्धन आणि दुग्ध विकासासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पशूसंवर्धनचे उपायुक्त डॉ. कावरे, विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे डॉ. आडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्यातील पशूधनाचे आजारापासून संरक्षण करून पशूधनाचा विकास साधावा, यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी पशू पालकांचा गट तयार करावा. प्रामुख्याने चिखलदरा आणि धारणी भागात लाभार्थी शोधून त्यांनाही योजनांचा लाभ देण्यात यावा. जिल्ह्यात अशा प्रकारचे गट निर्माण झाल्यास त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येतील. यातून जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या वाढण्यास मदत होईल. तंत्रज्ञान, खाद्य, आरोग्याची काळजी घेतल्यास दुध संकलनात वाढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
पशूसंवर्धन विभागातर्फे दुधाळ जनावरांचे वाटप अनुदानावर करण्यात येते. यात चांगले कार्य करण्यासाठी क्षेत्रियस्तरावर कार्यरत यंत्रणांनी मार्गदर्शन करावे. वैरण विकास योजनेत चारा उत्पादन होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच चांगल्या प्रजाती निर्माण होण्यासाठी कृत्रिम रेतनासाठीही प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. चांगल्या पशूधनाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पशूपालक आणि शेतकरी हे एकत्रित असल्याने कृषि विभागानेही यात नियोजन करावे, तसेच पशूविकास आणि दुग्ध व्यवसायातून कृषि उद्योजक तयार करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
00000
अवैध दत्तक प्रक्रियेला आळा घालण्यासाठी
आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्यानिमित्त विविध उपक्रम
अमरावती, दि. 13 (जिमाका): अमरावती जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागामार्फत दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 हा कालावधी आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. दत्तक प्रक्रियेस प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी तसेच कारा (CARA), नवी दिल्ली यांच्या स्तरावरुन कायदेशीर दत्तक प्रक्रियेची जागरूकता आणणे या उद्देशाने जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दत्तक महिना 2025 साजरा करण्यात येत आहे. या महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावरील बालकांसंदर्भात काम करणाऱ्या यंत्रणांमार्फत ठोस दिशादर्शक कार्यप्रणाली तयार करण्यात येत असून विशेष दत्तक संस्थेतील बालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हयात दत्तक विषयासंबंधी काम करणाऱ्या अशासकीय आणि विशेष दत्तक संस्था यांची बालकांची देखरेख व काळजी घेण्याच्या अनुषंगाने विशेष कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रसुतिगृहे, रुग्णालये, महानगर पालिका परिसर आणि शासकीय कार्यालय परिसरात कायदेशीर व सुरक्षित दत्तक प्रक्रिया समर्पण याबाबत माहितीचे फलक दर्शनीय भागात लावण्याचे ठरविण्यात आले आहे. त्या माध्यमातून अवैधरित्या दत्तक प्रक्रियेला आळा घालण्यात येईल, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळ यांनी दिली.
000000

No comments:
Post a Comment