Monday, November 24, 2025

DIO NEWS AMRAVATI 24-11-2025

 रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

*रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

अमरावती, दि. 24 (जिमाका) : रस्ते अपघातातील रुग्णांना दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. अपघातग्रस्तांना मदत होण्यासाठी आवश्यक सुविधा असणाऱ्या रुग्णालयांनी या योजनेत अंगीकृत करण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी 'रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना' राबविण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालयांचे अंगिकरण करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहेत. जिल्ह्यामधील 'ॲक्सिडेंट हॉटस्पॉट'च्या यादीनुसार पात्र रुग्णालये शोधून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने यादी अंतिम करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात रस्ते अपघातात मदतीसाठी रुग्णालय अंगीकृत करण्यात येत आहेत. रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी विशेषज्ञ सेवा असणे आवश्यक आहे. रुग्णालयात ट्रामा, पॉली ट्रामा, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, क्रिटिकल केअर ही सुविधा असणे आवश्यक आहे. ही सुविधा असलेल्या रुग्णालयांना या योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक रुग्णालयांनी hem2.0 या प्रणालीवर अर्ज करावा लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी डॉ. अंकिता मटाले, जिल्हा समन्वयक, 8275095802 आणि डॉ.  अविनाश मरकड, 9967134252 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

जिल्ह्यासाठी आधारभूत' खरेदी केंद्रांना मंजुरी

*शेतकऱ्यांना तातडीने नोंदणीचे आवाहन

अमरावती, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत ज्वारी, बाजरी, मका, रागी भरडधान्य खरेदी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत आठ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, धारणी आणि चिखलदरा या आदिवासी बहुल तालुक्यांतील अनुसूचित जनजाती क्षेत्रासाठी विशेषतः 8 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत ही केंद्रे चालवली जातील. यामध्ये धारणी तालुक्यात  बैरागड, सावलीखेडा, साद्रावाडी, चाकर्दा, धारणी, हरिसाल, धारणी तसेच चिखलदरा तालुक्यात चुरणी आणि गौलखेडा बाजार येथील केंद्रांचा समावेश आहे.

हमी भावाने खरेदीसाठी नोंदणी कालावधी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहील. तसेच खरेदी कालावधी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहील. त्यानुसार शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेवून राज्य शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. खरेदी केंद्रावर धान्य आणण्यापूर्वी व्यवस्थितरित्या वाळवून, स्वच्छ करून आणावे. याबाबत अधिक माहितीसाठी महामंडळाचे उप प्रादेशिक कार्यालय, धारणी व चिखलदरा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालय धारणीचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोष आमटे यांनी केले आहे.

00000

तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत

अमरावती, दि. 24 (जिमाका) : तेल काढणी युनिटसाठी शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी इच्छुकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26 मध्ये काढणी पश्चात पायाभूत सुविधा या घटकांतर्गत तेल काढणी युनिट घटकाकरीता शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी आणि सहकारी संस्था यांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये बियाणे संकलन आणि तेल काढण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी 10 टन क्षमतेचा तेल काढणी युनिट आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिटकरीता प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9 लाख 90 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार सीपेट, लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल मिल, ऑईल एक्सपीलिअरची उत्पादकनिहाय तेलघाणा मॉडेलला अनुदान अनुज्ञेय राहिल. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक प्रक्रिया भागीदाराने केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा, बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधीत अर्जदार सदर बाबींच्या लाभास पात्र राहणार आहे.

योजनेच्या माहितीसाठी सहायक कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी सपंर्क साधावा, तसेच इच्छुक अर्जदारांनी दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...