Thursday, November 27, 2025

DIO NEWS AMRAVATI 27-11-2025

 हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागमाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

अमरावती, दि. 27 (जिमाका) : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. नागपूर येथे 7 डिसेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी चित्ररथाचे जिल्ह्यात आगमन झाले. या चित्ररथाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, नानकराम अहुजा, ॲड. वासुदेव नवलानी, अमरज्योतसिंग जग्गी, रविंद्रसिंग सलुजा, डॉ. निख्खू खालसा, राजेंद्रसिंग सलुजा, राज छाबडा, दिनेश सचदेव, राजू मोंगा, सरनपालसिंग अरोरा, हरबक्श उपवेजा, सजिंदरसिंग उपवेजा, कुलदेवसिंग अरोरा, भजनसिंग सुलजा, विक्की अरोरा यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आज सकाळी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागमानिमित्त डिजिटल चित्ररथाचे उत्साहपूर्ण वातावरणात जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चित्ररथाचे आगमन झाल्यानंतर मान्यवरांची यावरील चित्रफितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी या चित्ररथाला हिरवी झेंदी दाखविली. हा चित्ररथ जिल्हाभरात फिरून नागपूर येथील कार्यक्रमाबाबत जनजागृती करणार आहे.

0000000







हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागम

नागपूर येथील कार्यक्रमासाठी सर्वोतोपरी सहकार्य

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 27 (जिमाका): हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे 7 डिसेंबर 2025 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य केल्या जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज नागपूर येथील कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी नानकराम अहुजा, ॲड. वासुदेव नवलानी, अमरज्योतसिंग जग्गी, रविंद्रसिंग सलुजा, डॉ. निख्खू खालसा, राजेंद्रसिंग सलुजा, राज छाबडा, दिनेश सचदेव, राजू मोंगा, सरनपालसिंग अरोरा, हरबक्श उपवेजा, सजिंदरसिंग उपवेजा, कुलदेवसिंग अरोरा, भजनसिंग सुलजा, विक्की अरोरा यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी राज्य शासनाच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यात नागपूरसह नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शहिदी समागमाचे शिख समाजात विशेष महत्व आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना नागरिक मोठ्या प्रमाणावर जातील. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल. इतर जिल्ह्यामधून नागपूर येथे जाताना नागरिकांना वैद्यकीय आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रचारासाठी जिल्ह्यात चित्ररथ फिरविण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात होर्डींग आणि इतर माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने 5 डिसेंबर रोजी 400 नागरिकांचा जत्था येणार आहे. यानिमित्ताने वाहतुकीसाठी कोणतीही अडचण होणार नाही. यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात येणार आहे. त्यामुळे समाजाने यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. येरेकर यांनी केले.

नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

00000

अमरावती कोषागार कार्यालयात 'संकल्पातून पेन्शन मेळावा' उत्साहात संपन्न

               अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती कोषागार कार्यालयामार्फत ‘संकल्पातून पेन्शन मेळावा’ वरीष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार यांचे संकल्पनेतून नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन धारकास डीजी लॉकर वापराबाबत व त्यामध्ये ई-पीपीओ, जीपीओ, सीपीओ ही सर्व कागदपत्रे कशाप्रकारे जमा करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

 तसेच निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन वाहिनीवरील आणि तक्रार निवारण प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्यासंबंधी निवृत्तीवेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी प्रशिक्षण दिले. तसेच मेळाव्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले व हयातीच्या दाखल्याबाबत माहिती देण्यात आली.

या मेळाव्यात उपस्थित झालेल्या 85 वयापेक्षा जास्त निवृत्तीवेतन धारकांचे कोषागार कार्यालयामार्फत शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना माहे नोव्हेंबर 2025 ला द्यावयाचे हयातीचे दाखले सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवृत्तीवेतन धारकांना बँकेत जाऊन आपले नावासमोर स्वाक्षरी करावी अथवा जीवन प्रमाण या केंद्रशासनाच्या साईटवर जाऊन ऑनलाईन जीवन प्रमाण पत्र कसे अपलोड करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

000000

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

              अमरावती, दि. 27 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून  दि. 28 नोव्हेंबर ते  12 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्र. पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  शाम घुगे  यांनी कळविले आहे.

00000

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना

1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती जिल्ह्यात आगामी नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1आणि 2 डिसेंबर 2025 रोजी सुटी राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

निवडणुकीच्या कामासाठी मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाणे व मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडता यावी, यासाठी अमरावती जिल्ह्यातील संबंधित सर्व नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणूक कार्यक्रमानुसार, मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी अध्यक्ष व सदस्य पदाकरिता मतदान होणार आहे. त्यामुळे, मतदान अधिकारी/कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राचा ताबा घेणार असलेल्या सोमवार, दिनांक  1 डिसेंबर 2025 आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर 2025 असे दोन दिवस जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी असेल, असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे.

00000

आंबिया बहार फळपीक विमा मंजूर:  3 हजार 910 शेतकऱ्यांच्या

खात्यात लवकरच जमा होणार नुकसान भरपाई

 अमरावती, दि. 27 (जिमाका): प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 मध्ये अमरावती जिल्ह्यातील 3 हजार 910 शेतकऱ्यांसाठी 18.30 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात या योजनेत  सुमारे 4 हजार  शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता, परंतु हवामान धोके (ट्रिगर) लागू करण्याबाबत शासन निर्णयातील कमाल व किमान तापमानाची स्पष्टता नसल्यामुळे युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीने आक्षेप घेतला होता. जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यानंतर कंपनीने केळी पिकासाठी 12 महसूल मंडळांत, मोसंबीसाठी 10 महसूल मंडळांत आणि संत्रा पिकासाठी 45 महसूल मंडळांत अखेर हवामान धोके मंजूर केले.

यामध्ये, 138 केळी उत्पादकांना 91.39 लक्ष रुपये, 46 मोसंबी उत्पादकांना 11.62 लक्ष रुपये, तर 3 हजार 726 संत्रा उत्पादकांना 17.27 कोटी रुपये असे एकूण 3 हजार 910 शेतकऱ्यांसाठी 18.30 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम लवकरच अर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली असून, प्रलंबित दावे मंजूर झाल्यामुळे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी शेतकऱ्यांना आंबिया बहार 2025-26 मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

0000000

अमरावती तालुक्यात ‘फार्मर कप’साठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न

अमरावती, दि. 27 (जिमाका):  कृषी विभाग, आत्मा आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात  'सत्यमेव जयते फार्मर कप' स्पर्धेसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण नुकतेच पार पडले. या प्रशिक्षणाला तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026' या राज्यव्यापी उपक्रमासाठी सज्ज करणे तसेच पाणी फाउंडेशन व फार्मर कप स्पर्धेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी प्राजक्ता तायडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲपची माहिती देवून शेतकऱ्यांकडून ते डाउनलोड करून नोंदणी करून घेतली. पाणी फाउंडेशन टीममधील प्रशिक्षक जयकुमार सोनुले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.  तर प्रफुल्ल कोल्हे यांनी गट शेती तसेच गटांमधील शेतकऱ्यांनी  घ्यावयाच्या पिकांबद्दल बाबत माहिती दिली.  

प्रशिक्षणात पुढे होणाऱ्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाची माहितीही देण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटी पाणी फाउंडेशन टीमने शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.  प्रशिक्षक रेणुका पोहोकार व प्रशांत देवरे यांनी निवासी प्रशिक्षणाची नोंदणी यावेळी करून घेतली. या प्रशिक्षणास कृषी विभागातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, पोकरा गावातील कृषी ताई तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी  प्रशांत गुल्हाने यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रुपाली चौधरी यांनी तर आभार मंडळ कृषी अधिकारी  नीतिमान व्यवहारे यांनी मानले.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...