Friday, November 21, 2025

DIO NEWS AMRAVATI 21-11-2025





                                             जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार

अमरावती, दि. 21 (जिमाका) : ढाका (बांगलादेश) येथे झालेल्या एशियन आर्चरी चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडू यशदीप भोगे याने वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. यानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचा सत्कार केला.

यावेळी आमदार सुलभा खोडके, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, विनोद पिदुरकर, उपअभियंता एन. प्रकाश रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, पोलिस निरीक्षक आनंद पिदूरकर, गटशिक्षणाधिकारी श्री. मोहने, आदी उपस्थित होते.

यशदीप भोगे याने आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये क्वालिफिकेशन राऊंडमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर एकचा कोरियाच्या खेळाडूसोबत क्वॉलिफिकेशन राऊंड खेळून वैयक्तिक प्रकारात 720 पैकी 687 गुण प्राप्त करून वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपकरिता निवड झाली आहे. जिल्हाधिकारी श्री. येरेकर आणि आमदार श्रीमती खोडके यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडूंकरीता अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा साहित्य त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्यात. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडू तयार करण्यावर भर द्यावा. इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी या खेळाडूंचा सार्वजनिक कार्यक्रमात सत्कार करण्यात यावा, अशी सूचना केली.

यावेळी क्रीडा संकुलात उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाचा आढावा घेण्यात आला. बांधकामासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी प्रयत्न करण्यात यावे. यामुळे 40 मुला-मुलींच्या राहण्याची सोय होणार आहे. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून यानंतर स्केटींगच्या मैदानासाठी निधी मागणी करावी. संपूर्ण क्रीडा संकुलामधील विजेसाठी सोलार यंत्रणा बसविण्यात यावी. तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न असून चांगले व्यवस्थापन व्हावे, यासाठी उपाययोजना करण्यात यावी. क्रीडा संकुलातील नव्या समितीमध्ये खेळाडूंचा समावेश करावा. यात प्रामुख्याने धर्नुविद्या खेळातील खेळाडूचा समावेश झाल्यास त्याच्या ज्ञानाचा लाभ होण्यास मदत होणार आहे. तसेच शालेय आणि शासकीय क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुलात होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही श्री. येरेकर यांनी दिल्या.

00000

बँकेच्या मेळाव्यात व्यावसायिकांना 48 कोटींचे कर्जवाटप

अमरावती, दि. 21 (जिमाका) : सेंट्रल बैंक ऑफ इंडियातर्फे व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आज व्यावसायिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात 48 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाद्वारे दस्तूरनगर येथील एमआयडीसी असोशिएशन हॉल MSME क्रेडिट आउटरीच कॅम्‍पचे आयोजन करण्यात आले. एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस पुणेचे सहायक महाप्रबंधक नयनकुमार सिन्हा, अभिनंदन बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिाकरी शिवाजी देठे, सेंट्रल बँक अमरावतीचे क्षेत्रिय प्रमुख सुनील पाण्डेय उपस्थित होते.

श्री. पातूरकर यांनी बँकेने व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कर्ज मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य आहे. मेळाव्यात देण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती मिळाल्याने व्यावसायिकांच्या शंकाचे समाधान झाले आहे. येत्या काळात व्यावसायिक बँकेचे कर्ज घेण्यास समोर येतील. बँकेच्या सहकार्याने उद्योगास चालना मिळणार असल्याने बँकेने उद्योजकांप्रती सकारात्मकता बाळगावी, असे आवाहन केले.

उपस्थितांना नयनकुमार सिन्हा, शिवाजी देठे आणि अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी मार्गदर्शन केले. मुख्य प्रबंधक दीपक दाभोले यांनी सेंट्रल बँकेच्या विविध योजनांचे सादरीकरण केले. सुनील पाण्डेय यांनी प्रास्ताविक केले. निलेश मुंढेकर यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय वैष्णव यांनी आभार मानले.

00000




शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

            अमरावती, दि. 21 (जिमाका):  भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी बांधव कष्टाने व प्रामाणिकपणे शेती करीत असताना बरेचदा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. अशावेळी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शिराळा येथे व्यक्त केला.

            स्व. विनायकराव दादा देशमुख कृषी व शोध प्रतिष्ठान तर्फे शिराळा येथे कृषी मेळावा व उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार -2025 वितरण कार्यक्रम कस्तुराबाई जैन विद्यालय प्रांगण, शिराळा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कृषी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार -2025 चे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

            आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेती करीत असताना नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. कृषी मेळाव्यामध्ये विविध कीडनाशके, फवारणी, अवजारे यांची माहिती देण्यात येत होती.

             शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. वातावरण बदलामुळे बरेचदा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. शासन सक्षमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.  30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमरावती जिल्ह्याला 518 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. लवकरच पात्र शेतकऱ्यांना सर्व लाभ मिळवून देण्यात येतील. शेतकरी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनीही जास्तीत -जास्त शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री श्री. भरणे यांनी यावेळी केले.

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले .यावेळी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

0000000






पायाभूत सुविधांचे युनिक आयडी तयार करावेत

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*पुरस्कारप्राप्त गणेशोत्सव मंडळांचा सत्कार

अमरावती, दि. 21 (जिमाका) : एकाच प्रकल्पावर दोन निधी उपलब्ध होऊ नयेत, यासाठी पायाभूत सुविधांचे युनिक आयडी तयार करण्यात येत आहे. यावर्षी हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावरील असला तरी पुढील वर्षीपासून याचा उपयोग करणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे बांधकाम आणि कार्य करणाऱ्या कार्यालयांनी पायाभूत सुविधांचे युनिक आयडी तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., निता कट्टे, आदर्श रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते.

बैठकीत यावर्षीच्या स्पीलचा निधीबाबत आढावा घेण्यात आला. स्पीलच्या निधी मागणी बाबत तातडीने आढावा घेण्यात यावा. काम करणाऱ्या यंत्रणांकडून स्पीलच्या निधीची मागणी घेऊन कार्यान्वयन यंत्रणांनी नियोजनकडे तात्काळ सादर करावी. यामुळे गेल्या दोन वर्षांपासूनची कामे पूर्ण होण्यास मदत होईल. अद्यापही प्रशासकीय मान्यता घेतलेली नसलेल्या विभागांनी येत्या आठ दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव निधी मागणीसह सादर करावा. येत्या काळात निवडणूक असल्याने प्रशासकीय मान्यता देण्यास अडचण येणार आहे. त्यामुळे प्रशासकीय मान्यता तातडीने घेण्यात याव्यात.

लोकप्रतिनिधींनी कार्यालयाला दिलेल्या पत्रावर तातडीने कार्यवाही करावी. पत्रावर केलेली कार्यवाही तातडीने संबंधित लोकप्रतिनिधींना कळवावी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संवाद कक्षातर्फे कळविण्यात आलेल्या पत्रावर तातडीने कार्यवाही करून कळवावे. येत्या वर्षापासून पायाभूत सुविधांचा युनिक आयडी तयार करावा लागणार आहे. त्यामुळे लॉगीन आयडी तयार याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

यावेळी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाबद्दल एकविरा गणेशोत्सव मंडळ, अमरावती, द्वितीय क्रमांक बद्दल बाल गणेशोत्सव मंडळ, साऊर, ता. भातकुली, तृतीय क्रमांक बद्दल राजे वीर संभाजी मंडळ, चांदुर रेल्वे, तालुकास्तरीय प्रथम क्रमांक बद्दल लोकमान्य उत्सव समिती, शिंदी बु., ता. अचलपूर गणेशोत्सव मंडळांचा सत्कार करण्यात आला. तसेच युनिक आयडी तयार करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले.

00000



पाथरगाव उपसा सिंचन योजनेच्या पाणी वापर संस्थांना एकदिवसीय प्रशिक्षण;

2025 च्या रब्बीपासून पाणी मिळणार

अमरावती, दि. 21 (जिमाका): मोर्शी तालुक्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत पाथरगाव उपसा सिंचन योजनेचे बांधकाम पूर्ण झाले असून, सन 2025 च्या रब्बी हंगामापासून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थांमार्फत (पा.वा.सं.) करावयाचे असल्याने, त्यांना सक्षम करण्यासाठी नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळ, अधीक्षक अभियंता मनीष राजभोज, सेवानिवृत्त प्राध्यापक बाळासाहेब शेटे, सेवानिवृत्त जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता किशोर वरंभे उपस्थित होते.  कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी प्रास्ताविक केले.

श्री. राजभोज यांनी 'महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन 2005' या कायद्यानुसार स्थापन झालेल्या 6 पाणी वापर संस्थांना पाण्याचा इष्टतम वापर, पीक पद्धती निवडणे, घनमापन पद्धतीने पाणी वापर करणे आणि पाणीपट्टी वसुलीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करून गावाचा विकास करण्याचे आवाहन केले. श्री. शेटे आणि श्री. वरंभे यांनी सिंचन कायदे, पा.वा.सं. चा उद्देश, कार्यप्रणाली आणि गट शेती या विषयांवर मार्गदर्शन केले. संत सेवालाल महाराज (जळका), संत पांडुरंग महा. (जळका), एकनाथ महा. (आमला), विश्वेश्वर पा.क.रते. (आमला), परिवर्तन (टेंभुर्णी), आणि समृद्धी (टेंभूर्णी) या सहा संस्थांचे अध्यक्ष, सदस्य प्रशिक्षणात सहभागी झाले होते. त्यांना हस्तांतरण प्रमाणपत्र व उपस्थिती प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

000000

 

 

जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावती, दि. 21 (जिमाका): जवाहर नवोदय वि‌द्यालय, अमरावतीचे  शैक्षणिक सत्र 2026-27 इयता सहावीच्या  प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र www.navodaya.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून  देण्यात आलेली आहेत. प्रवेश परीक्षा शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी  एकूण 61 केंद्रावर आयोजित करण्याचे निर्धारित केले आहे. परीक्षार्थी प्रवेश पत्र  www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावरून नि:शुल्क डाउनलोड करून घेऊ शकतात. अधिक  माहितीसाठी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा.

0000

बांधकाम कामगार नोंदणी नि:शुल्क, मध्यस्थींना पैसे देऊ नका

अमरावती, दि. 21 (जिमाका): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत अमरावती जिल्ह्यातील 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम निरंतर सुरू आहे. कामगार उप आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, ही संपूर्ण प्रक्रिया mahabocw.in या संकेतस्थळाद्वारे नि:शुल्क ऑनलाईन पद्धतीने केली जाते.

मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या व्यक्ती नोंदणीसाठी पात्र आहेत. अस्थायी स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांसाठी ग्रामसेवक किंवा महानगरपालिका, नगरपरिषदेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून 10 दिवसांचे प्रमाणपत्र मिळू शकते.

नोंदणी व लाभासाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांकडून मध्यस्थीमार्फत पैशांची मागणी केली जात आहे. यावर विभागाने स्पष्ट केले आहे की, कार्यालयाचा कुठल्याही बाहेरील मध्यस्थींशी संबंध नाही आणि कुठलेही अतिरिक्त रक्कम आकारली जात नाही.

जिल्ह्यातील कुठल्याही व्यक्तीने किंवा अधिकारी, कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्यास, कामगारांनी त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा लाच लुचपत प्रतिबंधक विभागास रितसर तक्रार नोंदवावी. यामुळे कामगारांची फसवणूक होणार नाही.

सर्व कामगारांनी  www.mahabocw.in  र नोंदणी, नूतनीकरण करावे आणि मालक, ठेकेदारांनी देखील 'आपले सरकार' पोर्टलवर नोंदणी करून कामगारांना नियोक्ता प्रमाणपत्र द्यावे, असे आवाहन कामगार उप आयुक्त, अमरावती यांनी केले आहे. 

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...