Tuesday, November 18, 2025

DIO NEWS AMRAVATI 18-11-2025

 आदिवासी उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

अमरावती, दि. 18 (जिमाका): आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती येथे विविध शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी आदिवासी उमेदवारांना विनामूल्य पूर्व-प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सत्राचा प्रशिक्षण कालावधी १ डिसेंबर 2025 ते 15 मार्च 2026 असा साडेतीन महिन्यांचा आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा हजार रुपये विद्यावेतनही देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात गणित, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचे मार्गदर्शन केले जाईल. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य दिला जाईल. तसेच, प्रशिक्षणस्थळी मोफत अभ्यासिका आणि आवश्यक पुस्तके उपलब्ध आहेत.

उमेदवार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा. वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे. किमान एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणीकृत असावे.

इच्छुक व पात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत 'आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, परतवाडा' या कार्यालयात सादर करावेत. उमेदवारांच्या निवडीसाठी  सोमवार, दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी 07223-221205 किंवा 7709432024  या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त

तिवसा येथे 'युनिटी पदयात्रा' संपन्न

अमरावती, दि. 18 (जिमाका): भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून 'मेरा युवा भारत' (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत देशभर 'सरदार@150 अभियान' अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करण्यात येत आहेत. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान चालणाऱ्या या अभियानाचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यात या. द. व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तिवसा येथे आज 'युनिटी पदयात्रा' (सरदार@150 पदयात्रा) आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन तिवसा येथील गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, नायब तहसिलदार आशिष नागरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत देशमुख, मेरा युवा भारतच्या स्नेहल बासुतकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  त्यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेचा शुभारंभ केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. ही पदयात्रा या. द. व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तिवसा येथून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पेट्रोल पंप, शहीद स्मारक मार्गे पुन्हा महाविद्यालयात येवून पदयात्रेचा  समारोप करण्यात आला. या 'सरदार@150 पदयात्रे'त मेरा युवा भारत अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, विविध शाळा-महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

000000

कुष्ठरुग्ण शोध अभियान:

जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न

अमरावती, दि. 18 (जिमाका): राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर  तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती.

सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार यांनी यावेळी जिल्ह्याच्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सद्यस्थिती आणि अभियानाचे नियोजन सादर केले. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी कुष्ठरुग्णांचा लवकर शोध घेण्यासाठी सर्व उपस्थित अधिकारी आणि जनतेने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

 समाजात कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.  व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी जेणेकरून कुष्ठरोग संसर्गाची साखळी समाजातून खंडित होईल.  सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार हे ध्येय जिल्हास्तरावर साध्य करता येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

000000

 

 जिल्हास्तरीय कुष्ठरोग शोध अभियानाचे

 प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथे उद्धाटन

 

अमरावती, दि. 18 (जिमाका):  जिल्हास्तरीय कुष्ठरोग शोध अभियानाचे प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथे  नुकतेच उद्धाटन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. पूनम मोहोकार, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.कें. शिराळा डॉ. हर्षा गोहत्रे, डॉ. श्रवण कडू उपस्थित होते.

            लवकरात लवकर सर्वच संशयित शोधून निदान निश्चिती करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असोलेयांनी आवाहन केले आहे. कुष्ठरोगाची लक्षणे, औषधोपचार निदान निश्चिती, सहवासितांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून द्यावयाची मात्रा यावर सहायक संचालक डॉ. मोहोकार  यांनी मार्गदर्शन केले.

कुष्ठरोग आजाराप्रती समाजामध्ये असलेली भीती, गैरसमज, अंधश्रद्धा दूर होऊन सर्वसामान्य आजारांप्रमाणे या आजारास सुद्धा जनतेने सामान्य आजार समजून त्वरित औषधोपचार घेण्यास पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. पारिसे यांनी केले.

            जिल्हास्तरीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग ,प्राथमिक आरोग्यातील आरोग्य कर्मचारी, गावकरी, नागरिक यावेळी उपस्थित होते.

000000

 

मेस्को कार्यालयात माजी सैनिकांसाठी नोकरीची संधी

लिपिक टंकलेखक पदांसाठी अर्ज सुरू

अमरावती, दि. 18 (जिमाका): संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी मेस्को (MESCO) क्षेत्रीय कार्यालय, अमरावती येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, अमरावती येथील क्षेत्रीय कार्यालयाकरिता  लिपिक टंकलेखक  या पदासाठी एकूण दोन जागा भरण्यात येत आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला मासिक ठोक मानधन 30 हजार रुपये इतके दिले जाईल.

उमेदवार हा सशस्त्र सेना दलातील निवृत्त जेसीओ , ओआर आणि त्यांच्या विधवा,परित्यक्ता असावेत. अर्जदाराचे वय 57 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराकडे मराठी भाषेचे (बोलणे, लिहिणे, वाचणे) ज्ञान असणे आवश्यक आहे. यासोबतच अकाउंटिंग, एम एस - ऑफिस आणि मराठी, इंग्रजी टायपिंगचे मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित असून, यासंबंधीचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात नेमणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

कार्यालयीन अधीक्षक,  मुख्य लिपिक स्तरावरील लिपिकांना प्राधान्य राहील. तसेच सशस्त्र सेना दलातून लिपिक पदावरून निवृत्त झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.शक्यतो मेडिकल कॅटेगरी SHAPE-1 किंवा SHAPE-2 असावी.

पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खालील ई-मेल पत्त्यावर किंवा पोस्टाने पाठवावे. ई-मेल पत्ता: ro-amravati@mescoltd.co.in, कार्यालयीन पत्ता: क्षेत्रिय कार्यालय अमरावती, सेनिकी मुलांचे वसतिगृह, नावसरी अमरावती 444604 हा आहे. इतर अटी व शर्ती लागू राहतील. अधिक माहितीसाठी 07212952040 किंवा मोबाइल क्रमांक 9373164962/7495097958 वर संपर्क साधावा.

0000000



जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 अमरावती, दि. 18 (जिमाका): जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आज मार्गदर्शन कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश-1 तथा प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे होते.

या कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी उपेक्षिततेच्या समस्यांबाबत मार्गदर्शन’ जिल्हा न्यायाधीश यशवंत गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा सरकारी वकिल परिक्षित गणोरकर ज्येष्ठ नागरिक संघाचे पुरुषोत्तम गावडे, यांनीही मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे संचालन अॅंड श्रीमती प्राजक्ता वरुडकर यांनी तर आभार अॅंड अमित सहारकर यांनी मानले. यावेळी  जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व कामगार नेता डॉ दामोदर पवार, अमरावत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायिक अधिकारी, तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...