धारणी उप-जिल्हा रुग्णालयात माता आणि बालकांच्या मृत्यूच्या घटनांबाबत
आरोग्य विभागाचा खुलासा
अमरावती, दि. 20 (जिमाका): धारणी उप-जिल्हा रुग्णालयात नुकत्याच घडलेल्या माता आणि बालकांच्या मृत्यूंच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत, आरोग्य विभागाने तात्काळ प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे. या चौकशीद्वारे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आरोग्य सेवा प्रणालीतील त्रुटी आणि सुधारणा आवश्यक असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे उपकेंद्र वारा तांडा अंतर्गंत ग्रामसलाईबर्डी येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय नर्मदा नारायण चिलावे यांना 15 नोव्हेंबर रोजी पोटदुखीमुळे धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासण्या, नियमित व सामान्य होत्या. यावेळी मातेला कळा कमी असल्याने त्यांना दोन तास प्रसूती कक्षात फिरण्यास सांगितले. कळा वाढल्यावर टेबलवर घेऊन सलाईन लावण्यात आले. यावेळी प्रसुतीसाठी जोर देण्यास सांगितल्यावर मातेला अचानक झटके आले, डोळे पांढरे झाले, जीभ बाहेर आली आणि तोंडातून फेस आला. सायंकाळी 6:45 ते 7 वाजता दरम्यान मातेचा मृत्यू झाला. दाखल होताच तिला सलग झटके आल्याने तिची प्रकृती अति गंभीर झाली होती आणि प्रसूतीपूर्वीच तिचा मृत्यू झाला.
प्राथमिक आरोग्य केंद्र सादरावाडी अंतर्गंत उपकेंद्र भोकरवर्डी येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय कविता श्रीराम धोंडे यांची 13 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसूती कळा सुरू झाल्याने त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणले जात असताना, रुग्णालयाच्या आवारात सायंकाळी 6:50 वाजता त्यांची प्रसूती झाली. त्यांना 2.5 किलोग्रॅम व 2.1 किलोग्रॅम वजनाची जुळी बाळे जन्माला आली. जन्मलेल्या दोन्ही बाळांना एस.एन.सी.यु. मध्ये भरती करण्यात आले होते. परंतु, दि. 15 नोव्हेंबर रोजी एका बाळाचा मृत्यू दूध फुफ्फुसात जावून श्वसन थांबल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले.
पहिल्या बाळाच्या मृत्यूनंतर माता व दुसऱ्या बाळाला सुट्टी देण्यात आली. रुग्णवाहिकेने धुळघाटला जात असताना रुग्णवाहिकेतच दुसऱ्या बाळाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना समजले. चौकशी व निष्कर्षानुसार, दुसऱ्या बाळाचा मृत्यू रक्तातील साखर व शरीराचे तापमान कमी झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
000000
नवोदयच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरी
व्हायोलिन वादन तसेच 2-डी आर्ट मध्ये देशात पहिला क्रमांक प्राप्त
अमरावती, दि. 20 (जिमाका): पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती येथील दोन विद्यार्थ्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे नुकत्याच झालेल्या 24 व्या राष्ट्रीय एकता समागम-2025 मध्ये विशेष कामगिरी करून जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले.
विद्यालयातील मास्टर वेदांत अथीलकर याने व्हायोलिन वादनात देशात प्रथम क्रमांक मिळवला, तर मास्टर हर्षल सोनोने याने 2-डी आर्ट मध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला. याशिवाय, समूह वादन (अकेस्ट्रा) या प्रकारात मास्तर दर्शन निकोडे, जीत खवले, अर्णव बोडखे आणि आरुष पाझरे या विद्यार्थ्यांनी उपविजेता क्रमांक पटकाविला.
याप्रसंगी नवोदय विद्यालय समिती, दिल्लीचे आयुक्त राजेश लखानी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केले. नवोदय विद्यालय समितीने संपूर्ण देशातील 661 नवोदय विद्यालयांमधून विभागीय, क्षेत्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर कला, संस्कृती व संगीताशी संबंधित विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. अमरावतीच्या या विद्यार्थ्यांनी सर्व पातळ्या यशस्वीरित्या पार केल्या. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादर नगर हवेली व दमण या 5 राज्यांचा समावेश असलेल्या पुणे संभागमध्ये एकूण 6 प्रथम क्रमांक पटकावले असून, त्यापैकी अमरावती नवोदयने एकट्याने 2 प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुणे विभागाच्या उपायुक्त श्रीमती मेरी मनी, तसेच सह उपायुक्त श्री. प्रेमकुमार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, उपप्राचार्य एस. हिसवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षक विनोद अथीलकर आणि कला शिक्षक एस. एन. मालवीय यांच्या प्रशिक्षणाने तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्यानेच हे यश शक्य झाल्याचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सांगितले.
000000
चांदुरबाजार येथील बोर्डीनाला तलावावर
मच्छिमार सहकारी संस्थांना नोंदणी करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 20 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील बोर्डीनाला मध्यम प्रकल्प (क्षेत्रफळ 152.27 हेक्टर) हा तलाव पाटबंधारे व जलसंधारण विभागाकडून आता मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. हा तलाव 500 हेक्टरखालील असल्याने, यावर मत्स्यव्यवसायासाठी सहकारी संस्था नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे, तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त आणि मच्छिमार महिलांना संस्थेच्या माध्यमातून या तलावाचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.
यासाठी, बोर्डीनाला मध्यम प्रकल्पावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिलांनी बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत संस्था नोंदणीसाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, (सहकारी संस्था), अमरावती यांच्या कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त एम. एम. मेश्राम यांनी केले आहे.
0000000
शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नों
अमरावती, दि. 20 (जिमाका): अमरावती जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या 5 लाख 69 हजार शेतकऱ्यांच्या मदतीचा महत्त्वपूर्ण डेटा ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केला आहे. या नुकसानीपोटी आतापर्यंत 542 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. या निधीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचवण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या भविष्यातील सर्व योजनांसाठी पात्र होण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ई-केवायसी सुविधा पूर्ववत सुरू झाली असल्यामुळे, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तात्काळ आधार कार्डसह आपल्या जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रा'वर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
तसेच, ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला गाव नमुना नं. 7/12 उतारा व आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जावून नोंदणी करून 'फार्मर आयडी' प्राप्त करून घ्यावा. जिल्हा प्रशासनाच्या या आवाहनानुसार, सर्व शेतकऱ्यांनी तातडीने या प्रक्रिया पूर्ण करून पुढील शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र व्हावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविण्यात आले आहे.
000000

No comments:
Post a Comment