Wednesday, November 26, 2025

DIO NEWS AMRAVATI 26-11-2025




                                    




                                     जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

अमरावती, दि. 26 (जिमाका) : संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधीक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त इर्विन चौकात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, भारताचे संविधान हा एक देशाचा मजबूत पाया आहे. संविधानातील तरतुदींमुळे देशात शांतता नांदत आहे. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांला मुलभूत हक्क दिले आहे. त्यासोबतच कर्तव्येही दिली आहेत. नागरिकांना दिलेल्या अधिकारामुळे देशाने आज प्रगती केली आहे. समातनेमुळे देश विकसित राष्ट्र होत असल्याचे सांगितले.

सुरवातीला श्री. येरेकर यांनी इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केले. यावेळी श्री. येरेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिकरित्या वाचन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे, नायब तहसिलदार टिना चव्हाण आदी उपस्थित होते.

00000


रिटेल कर्ज मेळावा येत्या शुक्रवारी

गृह आणि वाहन कर्जावर विशेष मार्गदर्शन

अमरावती, दि. 26 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती यांच्या पुढाकाराने अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती येथे रिटेल आऊटरीच प्रोग्राम अर्थात रिटेल कर्ज मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नागरिकांना गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि मोर्टगेज लोन यांसारख्या विविध रिटेल कर्ज योजनांची तसेच सध्या उपलब्ध असलेल्या व्याजदर सवलतींची सविस्तर माहिती देणे हा आहे.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिष येरेकर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, विविध शाखा व्यवस्थापक तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी, शहरातील प्रमुख कार डीलर आणि बिल्डर उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना यावेळी बँक अधिकाऱ्यांकडून कर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांसंबंधी ऑन-द-स्पॉट मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे, ज्यामुळे कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेतील अनेक शंकांचे त्वरित निरसन होऊ शकेल.

 सर्वसामान्य नागरिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून, इच्छुकांनी आपली उपस्थिती नोंदविणे आवश्यक आहे. अमरावती शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कर्ज योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.

000000

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल;

22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार परीक्षा

अमरावती, दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) च्या तारखेत बदल करण्यात आला असून ही परीक्षा आता दि. 22 फेब्रुवारी 2026   रोजी घेण्यात येणार आहे.

या परीक्षा पूर्वी दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित केल्या होत्या. परंतु, याच दिवशी, 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झाले असल्याने, शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी)  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) आता दि. 22 फेब्रुवारी 2026   रोजी घेण्यात येणार आहेत. या बदलाची सर्व संबंधित विद्यार्थी, पालक आणि शाळांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

000000

संविधान प्रास्ताविका वाचनात विद्यार्थ्यांच्या लक्षवेधी सहभाग

अमरावती, दि. 26 (जिमाका) : समाज कल्याण विभागातर्फे ‘घर घर संविधान’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने बुधवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या महर्षी रमण सभागृहात अभियानाचे उद्घाटन, तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, तहसीलदार विजय लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, व्याख्याते प्रा. डॉ. राजेश मिरगे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राचार्य डॉ. विनय राऊत, माजी प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संगीता भुयार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, समाज कल्याण अधिकारी एस. एस. बोबडे, विशेष अधिकारी सचिन मोरे उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी श्री. भटकर यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस फक्त एका पुस्तकाचा स्विकारण्याचा दिवस नाही. हा दिवस देशाच्या आत्म्याची, विचारांची आणि मूल्यांची पुनःस्थापना करणारा दिवस आहे. भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्याचा ग्रंथ नव्हे, तर लाखो वंचिताच्या आशेचा दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाचे निर्माता हे डॉ. आंबेडकर असल्याचे सांगितले.

प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी भारतीय संविधानकर्त्यांना देशातील पारंपारिक विषमता मुलक मानसिकतेचे चांगलेच ज्ञान व भान होते. म्हणूनच त्यांनी संविधानामध्ये मूलभूत हक्काची तरतूद केली असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. राजेश मिरगे यांनी संविधान दिन हा केवळ घटनादिनाचा स्मरण दिन नाही. लोकशाहीचे आत्मपरीक्षण आणि वचनबद्ध होण्याचा दिवस असल्याचे सांगितले.

सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. जनजागृती अभियानाच्या संविधान चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. समाज कल्याण अधकिारी सरिता बोबडे यांनी आभार मानले.

00000



नगरपालिकांच्या निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी

अमरावती, दि. 26 (जिमाका) : येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चांदूरबाजार येथे भेट दिली. दरम्यान त्यांनी नगरपालिकेच्या शाळांना भेट दिली.

नगर परिषद चांदूर बाजार सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सोनल सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गीता ठाकरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार मनोज सोनारकर, श्री. गवई, यश अग्रवाल, श्री. थोरात आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी चांदूरबाजार येथील स्ट्राँग रूमची पाहणी केली. त्यानंतर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना साहित्य वाटप होणाऱ्या ठिकाणची पाहणी केली. दरम्यान श्री. येरेकर यांनी नगर परिषद विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाला भेट दिली. विद्यालयातील खोली क्र. 1 मधील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी सहावीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याच शाळेत सुरू असलेल्या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

00000



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...