कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार
-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
*मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार
*मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार
अमरावती, दि. 17 (जिमाका) : मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कोठा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत. येत्या काळात या ठिकाणी पाच कोटी रुपयांच्या कोसा साडी निर्मितीचा उद्योग उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
धारणी तालुक्यातील कोठा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आज कार्यक्रम पार पडला, यावेळी कांचन गडकरी, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष डॉ. निरुपमा देशपांडे, योगेश बापट आदी उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांचा विकास व्हावा, समाजात स्थान मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आदिवासींमध्ये कौशल्य असून त्यास प्रशिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबूच्या सुबक वस्तू तयार करण्यात येत असून जगभरातील 60 देशांमध्ये या वस्तू पोहोचल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आपल्यापर्यंत चालून आला पाहिजे, अशा वस्तू निर्मिती करण्यावर भर द्यावा. आज विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. याचा उपयोगही करून घेणे आवश्यक आहे. कोशाच्या साडीला जगभरात मागणी असून यासाठी पाच कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येईल. प्रकल्पासाठी आवश्यक असणारा दोन कोटी रुपयांचा स्वनिधी संस्थेसाठी देणगी देण्यात येणार आहे. तसेच तीन कोटी रुपयांचे केंद्राचे सहकार्य देण्यात येईल. साडी निर्मितीसाठी आवश्यक ते प्रशिक्षणही उपलब्ध करून देण्यात येईल.
मेळघाटातील रस्त्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाण आहे. रस्त्यांच्या विकासाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. देशातील महामार्गाचे काम एशियन बँक करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे काम कशा पद्धतीने करण्यात येईल, याची माहिती घेण्यात येईल. मेळघाटातील युवकांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय होईल. तसेच मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलनासाठी धारणी आणि अन्य एका ठिकाणी केंद्र उभारण्यात येईल. यातून दररोज नगदी पैसे मिळण्यास मदत होईल.
यावेळी श्री. गडकरी यांच्या हस्ते कारागीर हाटचे विमोचन करण्यात आले. डॉ. निरूपमा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. योगेश बापट यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गरजू कुटुंबांना गॅस शेगडीचे वितरण करण्यात आले.
000000
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी
आज अंतिम मुदत
इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 17 (जिमाका): अमरावती जिल्ह्याच्या युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन बुधवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी संस्था/मंडळे किंवा वैयक्तिक स्पर्धकांनी आपले विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज उद्या, दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक विद्यापीठ समोर, मार्डी रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
या युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, काव्यलेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा यांसारख्या विविध सांस्कृतिक आणि कौशल्य विकास स्पर्धांसह विज्ञान प्रदर्शन (नवोपक्रम ट्रॅक) चा समावेश आहे. महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड, तपोवन चौक येथे होणार असून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन श्री शिवाजी उद्यान विज्ञान महाविद्यालयात करण्यात येणार आहे. या महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील (दि. 12 जानेवारी 2026 रोजी वयाची गणना) महाराष्ट्रातील रहिवासी युवक-युवती सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी My Bharat Portal वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
कौशल्य विकास स्पर्धा जसे कथालेखन (60 मि.), काव्यलेखन (90 मि.) आणि चित्रकला (90 मि.) यासाठी 'नशा मुक्त युवा', 'तरुणाईची निरोगी जीवनशैली', 'नेतृत्वातील महिला', 'भारत @100: सर्वसमावेशक विकासासाठी रूपरेषा' यासारखे विषय देण्यात आले आहेत. कथालेखन व काव्यलेखनासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा निवडता येईल. विज्ञान प्रदर्शनात जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या अभिनव संकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर करता येतील.
या महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यांची निवड थेट विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी केली जाईल, ज्यातून पुढे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (जानेवारीमध्ये) संधी मिळेल. जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.
000000
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी 'युनिटी पदयात्रा' उत्साहात संपन्न
अमरावती, दि. 17 (जिमाका): भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 2025 हे वर्ष 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. 'मेरा युवा भारत' (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत या सोहळ्याचे औचित्य साधून, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त (31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 'सरदार@ 150 अभियान') देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज जिल्हास्तरीय 'युनिटी पदयात्रा'चे आयोजन मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथे करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, , महानगरपालिका अमरावतीचे उपआयुक्त नरेंद्र वानखेडे, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी, राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी पथनाट्ये आणि सांस्कृतिक नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली, तसेच उपस्थितांनी आत्मनिर्भर भारताची शपथ घेतली. त्यानंतर, मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथून सुरू झालेली ही 'सरदार@ 150' पदयात्रा इर्विन चौक मार्गे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहातून परत महाविद्यालयाकडे मार्गस्थ झाली.
मेरा युवा भारत अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, तसेच एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक, होमगार्ड, भारत स्काऊट गाईड आणि विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकवृंद, हजारो विद्यार्थी व स्वयंसेवक या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राष्ट्रीय एकात्मता आणि 'एक भारत, आत्मनिर्भर भारत' चा संदेश देणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment