जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन
अमरावती, दि. 14 (जिमाका) : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, तहसिलदार विजय लोखंडे, अधीक्षक निलेश खटके उपस्थित होते. उपस्थितांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0000
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेळाव्यात 12 कोटींचे कृषिकर्ज वितरण
अमरावती, दि. 14(जिमाका) : सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे आज पथरोट येथे कृषि कर्ज वितरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 12 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
पथरोटचे उपसरपंच अतुल वाठ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते, तर सेंट्रल बँकेच्या सेंट्रल ऑफिसचे महाप्रबंधक डॉ. भास्कर, तसेच अमरावती क्षेत्रिय प्रमुख सुनील पाण्डेय, अचलपूरचे गटविकास अधिकारी सुधीर अरबाट उपस्थित होते.
डॉ. भास्कर यांच्या उपस्थितीत ग्राहकांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कृषि कर्ज वितरीत करण्यात आले. त्यांनी उपस्थित ग्राहक, नागरिकांना सेंट्रल बँकेच्या विविध कर्ज योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मेळाव्यात सेंट्रल बँक क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य प्रबंधक दीपक दाबोले, राजकुमार तरते यांनी कृषि कर्जाच्या विविध योजना, तसेच कोल्ड स्टोरेज, पोल्ट्री फार्म योजना, फूड प्रोसेसिंग, किसान व्हीकल, पीएम कुसुम योजना, कृषि इंफ्रास्ट्रक्चर फंड, बचतगट कर्ज योजनांची माहिती दिली.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडे यांनी प्रास्ताविक केले. निलेश मुंडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.
0000
विदर्भ-मराठवाड्यात 'दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2' सुरु; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर
अमरावती, दि. 14 ( जिमाका) : विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि दुग्ध व्यवसायाला गती मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सुरुवात केली आहे.
उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी-म्हशींचे 50 टक्के अनुदानावर वाटप, तसेच आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गाभण कालवडींचे 75 टक्के अनुदानावर वाटप ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, कडबा कुट्टी यंत्रांसाठी 50 टक्के अनुदान, पशुखाद्य आणि फॅटवर्धक खाद्यासाठी 25 टक्के अनुदान तसेच 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे पुरविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मुरघास निर्मितीसाठी प्रतिकिलो 3 रुपये अनुदान मिळणार असून, दुधाच्या विक्रीसाठी मराठवाडा दूध उत्पादक कंपनीशी करार करण्यात आला आहे. पशुपालकांनी या सर्व योजनांसाठी vmddp.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. संजय कावरे यांनी केले आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत प्रति व्यक्ती 4 हजार रुपयांचे वैरण बियाणे 100 टक्के अनुदानावर प्राप्त होत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून पशुपालकांनी पशुवैद्यकीय चिकित्सालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000000
राज्यस्तरीय शालेय फुटबॉल
क्रीडा स्पर्धेला सुरवात
अमरावती, दि. 14 (जिमाका): राज्यस्तरीय शालेय फुटबॉल (वयोगट 14 वर्ष मुले/मुली) क्रीडा स्पर्धा सन 2025-26 चे आयोजन जिला क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्यातर्फे करण्यात येत आहे. या स्पर्धेला सुरवात झाली असून ही स्पर्धा 15 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
राज्यस्तरीय शालेय फुटबॉल (वयोगट 14 वर्ष मुले/ मुली) क्रीडा स्पर्धा सन 2025-26 महाराष्ट्रातील आठही विभागातील 16 मुले व मुलीचे संघ असे एकूण 300 मुले व मुली, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धाचे मुले या वयोगटातील सर्व सामने सायन्सकोर मैदान, अमरावती व मुली वयोगटातील सर्व सामने पोलीस फुटबॉल क्रीडांगण, अमरावती येथे सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये सुरु झालेले आहेत.
राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन सायन्सकोर क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी नितीन चव्हाळ, जिल्हा फुटबॉल संघटना अध्यक्ष अरुण जयस्वाल, उपाध्यक्ष रविभाऊ कर्वे, अमरावती फुटबॉल संघटनेचे सचिव सुशिल सुर्वे, सेवा निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी हरिहर मिश्रा यावेळी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच ऑलिम्पीक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व्दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू दिपाली आरोळे यांनी सर्व खेळाडूंना क्रीडाशपथ दिली. त्यानंतर जोएल बांगर या राष्ट्रीय खेळाडूने आणलेल्या क्रीडा ज्योतीने मशालचे प्रज्वलन करण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भाकरे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संदिप इंगोले यांनी तर आभार सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी संजय कथळकर यांनी केले.
000000
ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू
अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 14 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी अनिल भटकर यांनी कळविले आहे.
0000
मेळघाटातील दोन माता मृत्यूंच्या अनुषंगाने
आरोग्य विभागाने दिले स्पष्टीकरण
अमरावती, दि. 14 (जिमाका): मेळघाट क्षेत्रात सात दिवसांत झालेल्या दोन माता मृत्यूच्या घटनांवरून आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर उठलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सविस्तर स्पष्टीकरण जारी केले आहे. या स्पष्टीकरणातून, आरोग्य विभागाने माता वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र अति जोखमीच्या मातांना वाचवण्याच्या प्रयत्नात नातेवाईकांचा असहकार आणि संदर्भ सेवा नाकारण्याची वृत्ती मोठी अडचण ठरल्याचे सांगितले आहे.
सिकलसेल ग्रस्त मातेच्या बाबतीत नातेवाईकांचा असहकार: पहिली घटना वनिता गाजा धिक्कार (वय 24) या सिकलसेलग्रस्त मातेची आहे, जी अति जोखमीची म्हणून नोंदवलेली होती. संपूर्ण गरोदरकाळात तिला वारंवार समुपदेशन करण्यात आले. एकूण पाच वेळा आरोग्य तपासणी केली गेली आणि तिला जुलै 2025 मध्ये रक्त संक्रमणाकरिता उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर येथे संदर्भही देण्यात आला. मात्र, ती जुलैमध्ये कोणालाही न सांगता घरी निघून गेली. आरोग्य विभागाने तत्परता दाखवून तिला शोधले आणि भरती होण्याचा सल्ला दिला, पण तिने नकार दिला. प्रसूती कळा सुरू झाल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र हतरू येथे आणले गेले. ती ॲनिमिक असल्याने पुन्हा अचलपूर येथे संदर्भ दिला गेला, परंतु नातेवाईकांनी त्यावेळीही परत जाण्यास नकार दिला. प्रसूतीनंतरही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याविरुद्ध माता घरी गेली आणि अखेर दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी घरी मृत पावली.
दुसरी घटना राणी प्रेम सावरकर या एच बी एस एजी रिएक्टिव अति जोखमीच्या मातेची आहे. 15 मे 2025 पासून नोंदणी झाल्यानंतर तिच्या एकूण पाच तपासण्या झाल्या आणि तिला सर्व सेवा तसेच सोनोग्राफीसाठी संदर्भ देण्यात आलेला होता. 17 सप्टेंबर 2025 रोजी प्रसव कळा सुरु झाल्यावर आरोग्य विभागाने तातडीने 108 ॲम्बुलन्सची व्यवस्था केली आणि तिला प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात संदर्भित केले. तिथे तिने एका मुलीला जन्म दिला. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी पोट दुखत असताना, उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे तिचा मृत्यू झाला.
मेळघाट क्षेत्रामध्ये प्रत्येक माता मृत्यूचा सखोल अभ्यास केला जातो. मेळघाट क्षेत्रात 11 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक उपजिल्हा रुग्णालय व दोन ग्रामीण रुग्णालये असूनही, अति जोखमीच्या मातांना जिल्हा रुग्णालय किंवा त्याहून वरिष्ठ स्तरावर संदर्भ सेवा देणे आवश्यक असते. अशावेळी बरेचदा गरोदर मातेचे नातेवाईक संदर्भ स्वीकारण्यास नकार देतात, भरती झाल्यानंतर अर्धवट औषधोपचार घेऊन घरी जातात किंवा अगदी शेवटच्या क्षणाला दवाखान्यात येण्यास तयार होतात. या अडचणींवर मात करूनही आरोग्य यंत्रणा काम करत आहे. या दोन्ही घटनांमध्ये जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या निदर्शनास आलेल्या त्रुटींबाबत संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
0000000
आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत
आरोग्य सेविकांचा पुढाकार
अमरावती, दि. 14 (जिमाका): प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभूरसोंडा येथे राबविण्यात येत असलेल्या माहेरघर योजना तसेच जे.एस.एस.के. (जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम) योजनेअंतर्गत प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात मातांना आहार पुरविण्यात येतो.
टेंभूरसोंडा येथील मूळ माहेरघर नादुरुस्त असल्यामुळे, पर्यायी व्यवस्था म्हणून प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात मातांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वॉर्डातच भरती केले जात आहे. भरती झालेल्या मातांना श्री विशाल गावंडे, वैदेही भोजनालय, टेंभूरसोंडा यांच्यामार्फत दोन वेळचे जेवण पुरवले जात होते. परंतु, संबंधित पुरवठाधारक यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्यामुळे माहे ऑक्टोबरपासून जेवणाचा पुरवठा होऊ शकला नाही. या कारणामुळे श्री वायकर भोजनालय, टेंभूरसोंडा यांच्याकडे तात्पुरती व्यवस्था सोपवण्यात आली होती, परंतु त्यांच्याकडूनही भरती झालेल्या मातांना जेवणाचा पुरवठा करण्यात आला नाही.
जेवण पुरवठा खंडित झाला असताना, आरोग्य सेविका यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात मातांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. आरोग्य विभागाने आता जेवण पुरवठा नियमित चालू केला आहे.तसेच, भविष्यात जेवणात खंड पडू नये म्हणून पुरवठा आदेश धारकांना ताकीदही देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत असल्याचे स्पष्ट केले असून, केवळ पुरवठाधारकांच्या वैयक्तिक अडचणीमुळे तात्पुरता खंड पडला होता, असे नमूद केले आहे.
0000000
जलजन्य आजार नियंत्रणात: अमरावती जिल्ह्याचा 'शून्य उद्रेक' उद्देश यशस्वीपणे साध्य
अमरावती, दि. 14 (जिमाका): अमरावती जिल्ह्याने सन 2025 मध्ये जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवत 'शून्य उद्रेक' चा महत्त्वाकांक्षी उद्देश यशस्वीपणे साध्य केला आहे.
सन 2020 मध्ये याच जिल्ह्यात, विशेषतः मेळघाट क्षेत्रात, 521 रुग्ण बाधित आणि काही मृत्यूंसह जलजन्य आजारांचा मोठा उद्रेक झाला होता. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने आगामी काळात अशा आपत्ती टाळण्यासाठी. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयित आरोग्य कृती आराखडा तयार केला.
या आराखड्यानुसार, 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 पर्यंत जिल्ह्यातील 836 ग्रामपंचायतींमध्ये पाणी गुणवत्ता व स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली, ज्यात 600 हून अधिक ग्रामपंचायतींना 'हिरवे कार्ड' देण्यात आले. जिल्हा स्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करून प्रत्येक तालुक्याच्या साथरोग स्थितीचा मागोवा 24 तास दूरध्वनीद्वारे घेण्यात आला. तसेच, जिल्हा व तालुका स्तरावर त्वरित प्रतिसाद पथके आणि 7 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, ज्यांना दोन-दोन तालुक्यांच्या देखरेखीची जबाबदारी दिली गेली. मेळघाटासाठी 'एक दिवस मेळघाटकरिता' उपक्रम राबवून स्थानिक समस्या त्वरित निवारण करण्याचे आदेश देण्यात आले.
पूर आणि अतिवृष्टीमुळे संपर्क तुटणाऱ्या 16 गावांमध्ये एक महिना पुरेल इतका औषधांचा साठा ठेवण्यात आला. त्याचबरोबर, या भागातील गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून 24 तास पर्यायी आरोग्य सेवा पुरविण्यात आली. 'स्टॉप डायरिया कॅम्पेन’ आणि व्यापक आरोग्य जनजागृती कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षित पाणी पिणे आणि स्वच्छतेचे महत्त्व रुजविण्यात यश आले. या सर्व समन्वित प्रयत्नांमुळे 2025 मध्ये जिल्ह्यात पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा एकही उद्रेक झाला नाही, ज्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थापनाची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
00000000





No comments:
Post a Comment