मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळ येथे आगमन व स्वागत
अमरावती, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 11.45 वाजता अमरावती विमानतळावर विमानाने आगमन झाले. त्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार रवी राणा, नवनीत राणा, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा आदी उपस्थित होते. स्वागतानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने धारणीकडे प्रयाण झाले.
00000
अमली पदार्थाविरोधात व्यापक कार्यवाही करावी
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 25 (जिमाका) : युवकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत
जनजागृती करण्यात यावी, तसेच अमली पदार्थाचे वितरण होत असलेल्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यात
यावे. प्रामुख्याने परराज्यातून येणाऱ्या गांजा आणि इतर पदार्थांविरोधात व्यापक कारवाई
करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
नार्को को-ऑर्डिनेशन सेंटरची जिल्हास्तरीय समितीची मासिक सभा जिल्हाधिकारी
कार्यालयात पार पडली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी
व्याख्यान आयोजित करण्यात यावे. यात प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थी लक्षगट ठेवण्यात
यावे. अमली पदार्थाविरोधात व्याख्यान देणाऱ्या वक्त्यांना शाळा-महाविद्यालयांशी संपर्क
साधून त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. शहरातील मोठ्या शाळांमध्ये आठवड्यातून
एकदा व्याख्यान होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विद्यार्थ्यांना अमली पदार्थाविरोधात
माहिती देण्यात यावी. त्यासोबतच शासनाच्या पत्रव्यवहारावर ‘नशामुक्त भारत, खुशहाल भारत’
ही टॅगलाईन उपयोगात आणावी.
गांजा आणि इतर अमली पदार्थ इतर राज्यातून येत असल्याची माहिती आहे,
त्यामुळे यावर लक्ष ठेऊन व्यापक प्रमाणात कारवाई करण्यात यावी. तसेच शासकीय रूग्णालयात
ड्रग्स सेवन केलेले रूग्ण आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्यात यावी. अमली पदार्थ
विरोधात जनजागृती ही महत्वाची आहे. युवक केंद्रीत करून प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यापर्यंत
पोहोचावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
000000
आज संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन
*संविधान दिन अमृत महोत्सवात कार्यक्रमांचे आयोजन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : समाज कल्याण विभागातर्फे संविधान दिनाच्या अमृतमहोत्वसवी वर्षानिमित्त ‘घर घर संविधान’ उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमित्ताने बुधवारी, दि. 26 नोव्हेंबर 25 रोजी सकाळी 11 वाजता संविधान दिन जनजागृती अभियानाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या महर्षी रमण सभागृहात अभियानाचे उदघाटन, तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन, संविधान चित्ररथाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या उपक्रमात सर्व शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह, अनुदानित, विनाअनुदानित वसतिगृह, दिव्यांग संस्थांच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुषंगाने सहायक आयुक्त आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यामार्फत संविधानाची सर्वांना ओळख करून देण्यासाठी दरवर्षी दि. 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात उपक्रमात शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावण्यात येणार आहे.
शालेय परिपाठ, तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका, उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच भारतीय संविधानाबाबत माहिती देण्यासाठी व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहे. संविधान दिन कार्यक्रम आयोजित करून पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासोबतच संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संविधान संमेलनासह दि. 26 नोव्हेंबर 2025 ते दि. 26 जानेवारी 2026 दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त माया केदार आणि सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment