Tuesday, September 10, 2019

घातखेड येथील 'केव्हीके'मध्ये जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ जैविक शेतीला प्रोत्साहन, सूक्ष्म सिंचनाद्वारे शेतीचा विकास -कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे




अमरावती, दि. १० : जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी जैविक निविष्ठा निर्मितीला प्रोत्साहन व सूक्ष्म सिंचनावर भर याद्वारे शेतीचा विकास घडवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज घातखेडा येथे केले.
घातखेडा येथील कृषी विज्ञान केंद्रात जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. खासदार नवनीत राणा, संस्थेच्या अध्यक्ष वसुधाताई देशमुख, जि. प. सदस्य प्रकाश साबळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, डॉ. अर्चना बारब्दे आदी यावेळी उपस्थित होते.
कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ग्राम परिवर्तनासाठी विविध योजनांसह गट शेतीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी गट शेतीला अवजार बँक, बी बियाणे, सौर कुंपण आदी अनेक साह्य देण्यात येत आहे. मालावर प्रक्रिया करून तो विकल्यास त्याची किंमत वाढते. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग व विपणनाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.
शासनाने सूक्ष्म सिंचन वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ठिबकवर अनुदान ८० टक्के करण्यात आले. कालव्यात पाणी वाया जाते म्हणून पाईपलाइनने पाणी शेतीला पुरविण्यात येणार आहे. जैविक शेतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र हा कृषी विद्यापीठ व नागरिकातील दुवा आहे.  कृषी तज्ज्ञ व संशोधकांची नाळ शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली पाहिजे.  शेतीचे अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचविले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार श्रीमती राणा, श्रीमती देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. जलशक्ती अभियानात शेतकरी मेळावाही यावेळी झाला. डॉ. अतुल कळसकर यांनी प्रास्ताविक केले. परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...