मेळघाटातील दुर्गम मतदान केंद्रांसाठी सक्षम संपर्कयंत्रणा उभारावी - विभागीय आयुक्त पीयूष सिंह




विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या उपस्थितीत बैठक


अमरावती, दि. 25 : मेळघाटातील  अतिदुर्गम परिसरातील 133 मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अशा मतदान केंद्रावर वनविभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे त्यांची वायरलेस यंत्रणा वापरुन सक्षम  संपर्क यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज येथे दिले.
मेळघाट क्षेत्रातील दुर्गम भागात निवडणूक कार्यासाठी आवश्यक बाबीसंदर्भात वनविभाग, पोलीस विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल,   अतिरिक्त पोलीस अधिक्षक शाम घुगे, उपवनसंरक्षक शिवा बाला, वायरलेस पोलीस अधिक्षक आय.डी. कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी (वायरलेस) एस. टी. हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, निवडणूक नायब तहसीलदार श्री. चंदनशिवे तसेच महावितरणचे अधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते.
मेळघाटातील दुर्गम भागातील गावामध्ये वॉकी टॉकी कनेक्ट होत आहेत किंवा कसे, हे सर्वप्रथम तपासून घ्यावे व त्यातील त्रुटी दूर कराव्यात. वनविभागाने ही कार्यवाही करावी. त्यानंतर पोलीस विभागाने त्यांची वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करावी. ही यंत्रणा योग्य पद्धतीने संपर्क राखते किंवा कसे, याबाबत तपासणी घ्यावी. सेक्टर अधिकारी, वनविभागाचे व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने संपर्क सुविधाची तपासणी करावी. ही सगळी कामे 11 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी दिले.
                                     दीडशे कर्मचा-यांकडून 11 ऑक्टोबरला संयुक्त तपासणी
वनविभाग, पोलीस व निवडणूक कार्यासाठी नेमलेल्या सुमारे दीडशे कर्मचा-यांकडून 11 ऑक्टोबर रोजी संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे, त्याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने सोपविलेली कामे पूर्ण होण्यासाठी आजपासूनच कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिले. ते म्हणाले की, निवडणूकीच्या राष्ट्रीय कार्यात कुठलीही बाधा येणार नाही, यादृष्टीने वनविभागाने त्यांच्या अधिनस्त असणारे सर्व टॉवर व आवश्यक यंत्रणा संपर्कासाठी उपलब्ध करुन द्यावे.
क्षेत्राधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व वनपाल यांच्यात समन्वय असण्यासाठी ट्रायल रन घेण्यात येईल. मतदान केंद्राशी संपर्कासाठी पोलीस व वनविभागाच्या वॉकी टॉकीचा वापर करावा. त्याशिवाय, या परिसरात उंचावरील ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळते. अशी ठिकाणे हेरून त्याचा संपर्क यंत्रणेत समावेश करता येतो किंवा कसे, याचाही पडताळा करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती