Wednesday, September 4, 2019

प्लास्टिक निर्मूलनासाठी शासकीय कार्यालयांनी पाऊल उचलावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

दैनंदिन वापरातून प्लास्टिक हटविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
         

अमरावती, दि. 3 : प्लास्टिक निर्मूलन ही काळाची गरज असून, त्यासाठी विविध शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी  कार्यालयातील आपल्या दैनंदिन वापरातून प्लास्टिक हटवावे व पर्यायी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
            प्लास्टिक कच-याच्या निर्मूलनासाठी व प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.  प्लास्टिक कच-यापासून उपयुक्त विविध वस्तू तयार करून त्याचा शहर सौंदर्यीकरणासाठी किंवा इतर सुविधांसाठी वापर करता येणे शक्य आहे. त्यासाठी अभ्यास करून अंदाजित खर्चासह प्रकल्प अहवाल सादर आदेशही जिल्हाधिका-यांनी अभियांत्रिकी तज्ज्ञांना नुकतेच दिले आहेत. त्याचप्रमाणे, शासकीय, निमशासकीय कार्यालयांनीही दैनंदिन वापरातून प्लास्टिक हटविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 विविध कार्यालयांत कार्यक्रम, सभा, बैठकांसाठी प्लास्टिक बाटलीबंद पाणी मागवले जाते. त्यानंतर या बाटल्यांचा प्लास्टिक कचरा निर्माण होतो. अशा वेळी पाणी जार किंवा पर्यायी वस्तूंच्या माध्यमातून वापरता येणे शक्य आहे. चहा, नाश्ता, जेवणासाठी चिनीमाती, स्टील किंवा पर्यायी कप, कागदी प्लेटस् वापरता येणे शक्य आहे. अनेक वर्षांची सवय एकदम थांबणार नसली तरी त्याची सुरुवात आपल्या सर्व कार्यालयांनी करणे आवश्यक आहे. कार्यालयाप्रमुखाने आपल्या अधिकारी- कर्मचा-यांना प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत सांगावे, त्यांना प्रोत्साहित करावे. आपण सर्वांनी प्लास्टिकला नकार दिला तरच हळूहळू का होईना इतरत्रही प्लास्टिकचा वापर कमी- कमी होत जाईल. यामुळे प्लास्टिक कच-याची समस्या काही प्रमाणात निश्चित दूर होईल व त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
 महापालिकेकडून प्लास्टिक कचरा गोळा केला जातो. त्या कच-यापासून पेव्हिंग ब्लॉक, व्हर्टिकल गार्डनसाठी उपयुक्त बाबींच्या निर्मितीसह रस्ता बांधकामातही वापर शक्य आहे. यासाठी अभियांत्रिकी तज्ज्ञ, प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून नव्या संकल्पनांवर आधारित प्रकल्प अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यापूर्वी बैठकीत दिले आहेत. 
                                                                        000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...