यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला शिका - जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे विद्यार्थ्यांना आवाहन





* स्टार्टअप बिझनेस प्लॅन स्पर्धेचे भव्य उद्घाटन

अमरावती, दि. ४ : नवीन कल्पना आणि नवे कौशल्य प्रगतीला सहाय्यकारी असते.  त्यामुळे ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवा पिढीने शिकले पाहिजे,  असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.
           स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हा नाविन्यता परिषद, विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नवसंशोधन, नवोपक्रम आणि साहचर्य मंडळ आणि उन्नत भारत अभियानाच्या संयुक्त सहकार्याने आयोजित दोन दिवसीय अमरावती स्टार्टअप बिझनेस प्लॅन स्पर्धेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, राज्य नाविन्यता परिषदेचे सदस्य तसेच आयोजन सुकाणू समितीचे प्रमुख प्रा. दिनेश सूर्यवंशी, विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. डी.वी.जाधव, संगाबा अमरावती विद्यापीठाचे नवोपक्रम संचालक डॉ.डी.टी.इंगोले, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, कुलसचिव डॉ.तुषार देशमुख, तंत्र शिक्षण सहाय्यक संचालक डॉ.एम.ए. अली, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विनोद कलंत्री, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक नरेंद्र येते, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, प्राचार्य डॉ. आर.टी.मोगरे आदी उपस्थित होते. 
           जेव्हा विज्ञान व्यवहाराशी जुळते तेव्हा त्याची किंमत अधिक वाढते, असे सांगत जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी थ्री इडियट या चित्रपटाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक 'रँचो' लपलेला आहे. केवळ त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे.  कुठल्याही शॉर्ट कटचा आधार न घेता नेहमी प्रयत्नातून यश मिळवा. 
          कुलगुरू डॉ. चांदेकर म्हणाले की, समाज बदलायचा असेल तर विद्यार्थ्यांसहित उद्योजकांना देखील योगदान द्यावे लागेल. रोजगार देणारे उद्योजक बनण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. या दोन दिवसीय स्पर्धेत ३२५ हून अधिक युवकांनी आपल्या कल्पनांची मांडणी केली असून त्यातून निश्चितच चांगल्या कल्पना ब्रँड म्हणून पुढे येतील. त्यामुळे युवकांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून आणखी चांगल्या कल्पना येत राहाव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
         प्रा.दिनेश सूर्यवंशी प्रास्ताविकात म्हणाले की, युवकांमध्ये नवनवीन कल्पनांना साकार आणि आकार देण्याची क्षमता असून  केवळ त्यांच्या क्षमतांचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याचे कौशल्य ज्या दिवशी विद्यार्थ्यांना अवगत होईल त्या दिवशी हा देश एका वेगळ्या उंचीवर गेलेला असेल. या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअपच्या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी पुढाकार घेतला असून पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी देखील त्यासाठी पुढाकार घेऊन ही स्पर्धा युवकांसाठी आयोजित केली आहे. यावेळी शासनाच्या युवा पिढीला बळ देण्यासाठीच्या पुढाकाराची जाणीव सूर्यवंशी यांनी सर्वांना  करून दिली.

        या कार्यक्रमाचे संचालन वंदना पैकिजे यांनी केले. आभार डॉ. डी. टी. इंगोले यांनी मानले. या स्पर्धेत अमरावती विभागातील तीन विविध गटातून जवळपास ३२५ हून अधिक स्पर्धकांनी आपले मॉडेल्स सादर केले आहेत. या मॉडेल्सचे प्रदर्शन सांस्कृतिक भवनातील आर्ट गॅलरीत उद्यापर्यंत सुरू राहणार आहे.  स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उद्या दुपारी १ वाजता पालकमंत्र्यांच्या हस्त होईल.
                                                                        ०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती