Thursday, September 5, 2019

मोर्शीतील पुरग्रस्त भागांची पालकमंत्र्याकडून पाहणी








नुकसानग्रस्त कुटूंबांना पंधरा हजार रुपये तातडीची मदत
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करावे
अमरावती, दि. 5 : बुधवारी (4 सप्टेंबर रोजी) मोर्शी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नलदमयंती नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मोईमपुरा, मालवीयपुरा, आठवडी बाजार, मेन मार्केट, आंबेडकर चौक, खोलगटपुरा या भागात आठ ते नऊ फुट पर्यंत पुराचे पाणी शिरले होते. आज राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पुरग्रस्त भागांना तातडीने भेट देऊन क्षतीग्रस्त भागांची, घरांची व परिसराची पाहणी केली. नुकसानग्रस्त कुटूंबांना पंधरा हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी येथे सांगितले.
            यावेळी मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे मुख्याधिकारी तसेच महसूल विभगाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून पंधरा हजार रुपये प्रती कुटूंब याप्रमाणे सहायता निधी त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. पुराचे पाणी आता ओसरले असून नुकसानग्रस्त भागातील कुटूंबांचे, शेतीचे आणि क्षतीग्रस्त घरांचे, जनावरांचे सर्वेक्षण करुन पंचनाम्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. बाधितांना तातडीने प्रशासनाकडून मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ले.
            पुराच्या पाणी घरात शिरल्यामुळे कुटूंबांचे घरातील साहित्य व जनावरांची हाणी झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या कुटूंबांची प्रशासनाव्दारे नगर परिषदेच्या शाळेत निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल रात्रीच पुरग्रस्त भागांची पाहणी करुन बांधीत कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे महसूल यंत्रणाला आदेश दिलेत. तसेच त्यांच्या जेवणाची व निवासाची सुविधा नगर परिषदेच्या शाळेत केली.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात ज्याठिकाणी पुराच्या पाण्यात शेतजमिन खरडून गेली त्याठिकाणी 38 हजार रुपये प्रती हेक्टर मदतनिधी देण्यात येते. बागायती-फळबागांच्या नुकसानीसाठी 18 हजार रुपये, ओलीताच्या पिकांसाठी 13 हजार रुपये तर कोरडवाहूसाठी 6 हजार 800 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. अशाच पध्दतीने नियमानुसार मतदनिधी शेतीच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला जाईल. मोर्शी तालुक्यातील नल दमयंतीच्या काठावर असलेले खेडे चिखलसावंगी, चिंचोली गवळी, आष्टेगाव व इतर गावांत शेतीचे व शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्याक्षेत्राचे कृषी सहायकांकडून पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली असून शेतकऱ्यांना शासनाकडून मदतनिधी दिला जाणार आहे. सर्व लोकांनी शांततेने व सयंमाने राहून मदत घ्यावी प्रशासन व शासन संपूर्णत: त्यांच्या पाठीशी आहे. कुठलीही आपत्ती आली तर प्रशासनाला कळवावे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...