वनकर्मचा-यांनी ई- 1 वाघिणीला केले जेरबंद वाघिणीची रवानगी गोरेवाडी प्राणीसंग्रहालयात






अमरावती, दि. 2 : मानवी जिवितास असलेला धोका लक्षात घेऊन वनअधिकारी- कर्मचा-यांनी शर्थीने प्रयत्न करून ई-1 या वाघिणीला जेरबंद केले आहे. आता तिची रवानगी गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात केली जाणार आहे. 
यापूर्वी ही वाघिण ब्रम्हपुरी विभागातील वनक्षेत्रात वावरत होती. तिला मेअखेरीस जेरबंद करण्यात आले होते. तिच्या पुनर्वसनासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डोलार या गाभा क्षेत्रात मुक्त करण्यात आले. मात्र, मेळघाटातही तिचा लोकवस्तीनजिकच वावर राहिल्याने व तिच्यापासून धोका असल्याने या वाघिणीला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या आदेशानुसार काल रविवारी सायंकाळी बंदिस्त करण्यात आले.
गाभा क्षेत्रात ही वाघिण दोन महिने मुक्तपणे वावरत होती. गाभा क्षेत्रात असतानाही या वाघिणीने लोकवस्तीनजिकच्या जंगलात राहणे पसंत केले. या वाघिणीने 30 ऑगस्ट रोजी दादरा येथील रहिवाशी शोभाराम चव्हाण यांच्यावर हल्ला केला. दुर्देवाने त्यात त्यांचे निधन झाले. त्यानंतर मृतकाच्या शोधार्थ गेलेल्या दिलीप चव्हाण यांच्यावरही वाघिणीने हल्ला करून जखमी केले. वनविभागाद्वारे शासकीय रुग्णालयाद्वारे दिलीप चव्हाण यांच्यावर उपचार होत आहेत.
केकदाखेडा येथील सात वर्षांच्या बालिकेवरही या वाघिणीने 2 जुलैला हल्ला केला होता. वाघिणीकडून झालेली मनुष्यहानी व संभाव्य जिवितहानी लक्षात घेऊन तिला जेरबंद करण्याची परवानगी वन्यजीव कार्यालयाकडून मिळाली. त्यानुसार वनविभागाने तत्काळ हालचाली करून पथक नियुक्त केले. हे पथक उपग्रह संकेत व प्रत्यक्ष अँटेनाकडून मिळणा-या माहितीनुसार तिचा मागोवा घेत होते. 31 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता गोलाई गावाजवळ हे श्वापद वावरत असल्याची माहिती मिळाली. 
त्यानुसार 1 सप्टेंबरला सकाळपासून पशुवैद्यकीय अधिकारी, जलद बचाव कृती दल, ळघाट व गुगामल अभयारण्याचे पथक जंगलात तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. जंगलात सुरक्षितपणे शोध घेण्यासाठी हत्तीही तैनात करण्यात आले. जनावर बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन व आवश्यक उपकरणे घेऊन निघालेल्या या पथकाला दुपारपर्यंत तिचे अचूक स्थान कळले. त्यानुसार सर्वांनी तातडीने हालचाली करून वाघिणीला गाठले व तिला बेशुद्ध करण्यात आले. ही बेशुद्ध वाघिण तत्काळ पिंज-यात बंद करण्यात आली. जेरबंद झालेली ही वाघिण आता सुखरूप आहे. आज तिला गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाकडे पाठविण्यात येत आहे.
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी,  विभागीय वनाधिकारी एच. एस. वाघमोडे, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी मोहिमेसाठी मार्गदर्शन केले. हिरालाल चौधरी, एस. बी. मोरे, डॉ. रश्मी गोखले,  डॉ. सुबोध नंदगवळी, डॉ. चेतन पातोंडे, डॉ. शरद पलखाडे, संतोष कासदेकर, अमोल गावनेर, राजेश धिकार, मंगेश मावस्कर, मनीराम चतुरकर, तुलसीराम कासदेकर, जीवन दहिकर, संजय धिकार, श्रीकांत गवई, वैभव गुरव, फिरोज खान, आसिफ पठाण, मुकेश जावरकर, अनिल चिमोटे आदींनी मोहिम यशस्वी केली.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती