Friday, September 6, 2019

पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींगचे कार्यक्रम राबवावे - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

पोलीसांच्या 208 निवासस्थान बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन








अमरावती, दि. 6 : अलिकडच्या काळात देश व जागतिक पातळीवर वेगाने होत असलेल्या शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमुळे सर्वसामान्य जनतेत सर्वत्र बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत. या सकारात्मक बदला बरोबरच गुन्हेगारीचे स्वरुप, दशतवाद, घातपाती कृत्य यामुळे नागरिकांच्या जिवीताचा व मालमत्तेच्या सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. हे धोके लक्षात घेऊन सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींग अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबवावे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले.
            पोलीस अधिक्षक ग्रामीण पोलीस विभागाव्दारे आयोजित बडनेरा जवळील मौजा कोंडेश्वर येथे 208 पोलीस निवासस्थानांच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारुन व कोनशिलेचे अणावरन करुन आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमीपूजन सोहळ्याला खासदार नवनीत रवि राणा, शिक्षक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. श्रीकांत देशपांडे, आमदार रवि राणा, उपमहापौर संध्याताई टिकले, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधिक्षक श्याम घुगे, पोलीस उपायुक्त प्रदीप सुर्यवंशी, शशिकांत सातव यांचेसह पोलीस अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
            डॉ. बोंडे म्हणाले की, ज्याप्रकारे सैनिक देशाच्या सीमेचे रक्षण करते त्याप्रमाणे पोलीस हे देशाच्या अंतर्गत घडणाऱ्या गुन्हेगारी, आंतकवाद, घातपात आणि जनसामान्यांच्या संरक्षणासाठी काम करते. पोलीस विभाग समाजाकडून एका विशिष्ट शिस्तिचे पालन करुन घेत असतात. पोलीसांच्या कथा आणि व्यथा संदर्भात पूर्णपणे जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. चोवीस तास काम करणाऱ्या पोलीसांना हक्काचे घर असावे असा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा व्यक्त केला असून त्यासाठी पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या अनुषंगाने धोरण आखण्यात आले आहे. पोलीस खाते अधिक सक्षम करण्यासाठी वरिष्ठ पदावर पदोन्नतीसह पोलीसांची रिक्त पदे भरण्यात येत आहे. पोलीसांना गुन्ह्यांचा तपास अधिक जलदगतीने होण्यासाठी अद्ययावत फॉरेन्सिक लॅब अमरावतीत स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीसांच्या भावना व समस्या जाणून घेऊन अनेक वर्षापासून रखडलेले प्रश्न सोडविले आहे. पोलीसांना सन्मानपूर्वक भत्तेवाढ, आरोग्य व कुटूंब कल्याण योजना, निवासासाठी क्वार्टर, पोलीस स्टेशनचे नविणीकरण आदी सुविधा पुरविल्या आहे.
            सर्व सामान्य जनतेत पोलीसांविषयी असलेली भिती घालवून आदर निर्माण करण्यासाठी कम्युनिटी पोलीसींग तसेच सोशल पोलीसींग होणे आवश्यक आहे. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या गरीब लोकांना गुन्हेगार न समजता सौहार्दपूवर्क वागणूक देऊन त्यांचे म्हणने ऐकून घेतले पाहिजे. लोकांमध्ये जावून त्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यातील भिती दूर केली पाहिजे. सलोख्याचे वातावरणात ठेवून कायदा व सुव्यवस्थेचे अमंलबाजवणी झाली पाहिजे. पोलीसांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सोशल रिलेशनशिप संबंधी सातत्याने प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांच्या घरात आनंददायी वातावरण राहण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग श्री. श्री. रविशंकर यांचे प्रशिक्षण पोलीसांना व त्यांच्या कुटूंबियांना सुध्दा दिले पाहिजे. ग्रामीण भागात होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाकडून चौकाचौकात तसेच संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे व त्याची देखभालीची जबाबदारी संबंधित पोलीस स्टेशनला सोपविण्यात यावी.
            पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी अकरा हेक्टर क्षेत्रफळावर निर्माण होणाऱ्या 208 शासकीय निवासस्थानांच्या बाधकाम हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावे. याठिकाणी सर्व सोयी- सुविधायुक्त इमारतींचे निर्माण करावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड सुध्दा करण्यात आली.
            खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहे. त्याठिकाणी इमारतींचे दुरुस्ती करुन सर्व सोयी-सुविधायुक्त दर्जेदार पध्दतीची पोलीस ठाणे उभारावे.
            सन 1998 मध्ये पोलीस अधिक्षक ग्रामीण क्षेत्र आणि पोलीस आयुक्तालयाची जिल्हयात स्वतंत्रपणे निर्मिती झाली आहे. तेव्हापासून दोन्ही महत्वाच्या पोलीस विभागांना स्वतंत्र इमारत, परेड ग्राउंड इत्यादी यंत्रणा उभारण्यात आली आहे. पंरतू सदर जागा ही अपूरी पडत असल्यामुळे मौजा कोंडेश्वर येथे 11 हेक्टर जमीनवर सुमारे 44 कोटीचा निधी खर्चून पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालय तसेच अधिकारी कर्मचारी यांचेसाठी शासकीय निवासस्थान बांधण्यात येणार आहे. पोलीस क्वार्टरचे बांधकाम कंत्राटदार धनुष्मृती बिल्डकॉन प्रा.लि. तसेच तांत्रिक सल्लागार आणि आर्किटेक्ट एम बी मालेवार डिझाईन्स प्रा. लिमिटेड यांचेकडून होणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन. यांनी प्रास्ताविकातून दिली.
            यावेळी आमदार रवि राणा, आमदार श्रीकांत देशपांडे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांचीही समायोचित भाषणे झाली. उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधिक्षक शाम घुगे यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...