पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सुसज्ज -जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 मोर्शी पूरपरिस्थितीची जिल्हाधिका-यांनी केली पाहणी
१५ सदस्यांचे बचाव पथक मोर्शीला रवाना

                              




अमरावती, दि. ५ : मोर्शी येथील पूरस्थितीत नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांच्या यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मोर्शी येथे  दिले . श्री. नवाल यांनी आज सायंकाळी मोर्शी येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. १५ सदस्यांचे बचाव पथकही मोर्शीला उपस्थित आहे. 
 जिल्हाधिका-यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यानुसार प्रशासनाला निर्देश दिले. मोर्शी शहरात मध्यवस्तीत पुराचे पाणी  शिरल्यामुळे तेथील काही कुटुंबांना नगरपरिषदेच्या शाळांत हलविण्यात आले आहे. त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीत घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमांतून संदेश प्रसारित करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी, पाटबंधारे अभियंता यांनी परस्पर समन्वय ठेवून  परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, तसेच अप्पर वर्धा धरणाचे गेट उघडण्याबाबत तेथील स्थिती पाहून व संपूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्यावा. मात्र, त्यापूर्वी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला कळविण्यात यावे. नागरिकांची कुठलीही गैरसोय होता कामा नये. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा , असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 15 सदस्यांचे शोध बचाव पथक मोर्शीला उपस्थित आहे. तसेच पूर स्थितीमुळे बाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश तहसीलदारांना जिल्हाधिका-यांनी दिले.  या काळात औषधे व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.  रस्ते नादुरुस्त झाल्यास तत्काळ दुरुस्तीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत.  पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महसूल प्रशासनाव्दारे आपत्ती व्यवस्थापन पथक व नियंत्रण कक्ष 24 तास सुसज्ज आहे.
                                                                        ०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती