Thursday, September 5, 2019

शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी विज्ञानाचा वापर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे










स्पर्धेत क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार

अमरावती, दि. 5 : विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेत असतांना त्या शिक्षणाचा उपयोग शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात संशोधन करुन नवनवीन यंत्रसामुग्री तयार करावी. विज्ञानाच्या वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होईल यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करावे, असे आवाहन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज केले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हा नाविण्य परिषदेच्या तसेच विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, साहचार्य मंडळ व उन्नत भारत अभियानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय स्टार्टअप बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशनच्या बक्षीस वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिध्द युवा उद्योजक सुहाज गोपीनाथ, सुकाणू समितीचे प्रमुख दिनेश सुर्यवंशी, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातुरकर,  तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. वी. जाधव, नवोक्रम संचालक डॉ. डी.टी. इंगोले, चेंबर ऑफ कॉमर्सचे असोशिएशनचे अध्यक्ष विनोद कलंत्री आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांनी स्टार्टअप स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अविष्कार-प्रकल्पांची पाहणी केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयाच्या 287 स्पर्धकांचे पालकमंत्र्यांनी सहभागी झाल्यानिमित्त अभिनंदन करुन डॉ. बोंडे म्हणाले की, आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नवनव्या कल्पनांना आकार द्यायला युवा पीढीने शिकले पाहिजे.  आपल्या संकल्पनांना वाट देऊन त्या साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी धडपड करावी. भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाची 35 टक्के लोकसंख्या ही 30 वर्षाखालील आहे. तरुणांनी अध्यासित केलेल्या तंत्रशिक्षणाचा व प्रशिक्षणाचा उपयोग समान्य जनतेचे जीवन सोयीचे होण्यासाठी उपयोग करावा. रेन वॉटर हारवेस्टींग, सोलर पॉवर, शेतीशी निगडीत यंत्रसामुग्री आदी क्षेत्रात संशोधन करुन मानवजातीच्या उपयोगाच्या यंत्रसामुग्री, प्रकल्प निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांनी नोकरीच्या मागे न पळता, स्वत: प्रशिक्षीत होऊन इतरांना रोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने उद्योजक बनावे. बेरोजगार युवकांच्या हातांना काम देऊन त्यांना निर्भर करण्यासाठी वस्त्रोद्योग, स्टील प्रकल्प, दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तुंचा प्रकल्प निर्मिती इत्यादी क्षेत्रात कामगिरी करावी. आपल्या क्षेत्रात कापूस पीक खात्रीशीर पिक आहे. कापूस पीकावर प्रक्रीया करुन उत्तम दर्जाचे वस्त्र निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी येथील आयटीआय, पॉलीटेक्नीक, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना खूप वाव आहे. त्यासाठी शासन सुध्दा कर्ज व भाग भांडवल उपलब्ध करुन युवा उद्योजकांना मदत करते. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी केले.
राज्याच्या ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागातील मुलांपेक्षा मुलभूत व शेतीशी निगडीत चांगले ज्ञान असते. तंत्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना ओळखून कौशल्य विकासाचे व कृषी विषयाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन ग्रामीण मुलांना प्रशिक्षीत करावे. देशाचे भवितव्य घडविण्यात युवा पीढींचे महत्वपूर्ण योगदान आहे.
कार्यक्रमात शालेय संशोधक म्हणून विश्वभारती शाळेच्या भार्गवी, साची जैयस्वाल आणि आर्या या तीन मुलींचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या वेस्ट वॉटर व रेन वॉटर हारवेस्टींगच्या प्रकल्पाची निवड समितीव्दारे करण्यात आली.  
तसेच कार्यक्रमात यंग संशोधक, सीनीयर संशोधक आणि मास्टर संशोधक या तीन प्रवर्गामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शंतनु गावंडे, संदीप कुमार, मारुफ अहमद, रुपेश चौधरी यांचा यंग संशोधक या कॅटॅगिरीसाठी, रुपाली करुले रजनी चव्हाण, मनीष वालेचा यांचा सीनीयर संशोधक या कॅटॅगीरीसाठी तर सेवकराम कुंभारे यांचा मास्टर संशोधक कॅटॅगीरीसाठी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून स्पर्धेचे मॉमेन्टो, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला शाळा- अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रशिक्षण महाविद्यालय, आयटीआय महाविद्यालयातील तसेच सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...