Monday, November 30, 2020

आज मतदान, यंत्रणा सुसज्ज मतदानासाठी पथके केंद्रावर रवाना

 












आज मतदान, यंत्रणा सुसज्ज

मतदानासाठी पथके केंद्रावर रवाना

अमरावती, दि. 30 :  शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान उद्या (दि. 1) होणार असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी पथके आज रवाना झाली. सर्व पथकांनी आपापली जबाबदारी नीट समजून घेऊन, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी दिले.शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 35 हजार 622 असून, त्यात 26 हजार 60 पुरूष आणि 9 हजार 562 महिलांचा समावेश आहे. मतदानासाठी जिल्ह्यातील नियुक्त पथकांना निवडणूक साहित्याचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बॅडमिंटन हॉल येथून करण्यात आले.  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते.

निवडणूक साहित्य संच अमरावती जिल्हाधिकारी स्तरावर तयार करण्यात आले. त्यांचे विकेंद्रीकृत पद्धतीने वितरण आज करण्यात आले. याचठिकाणी मतदान पथकाला मतदान प्रक्रियेविषयी पुन्हा माहिती देण्यात आली व त्यानंतर पोलीस बंदोबस्तात पथके मतदान केंद्रांवर रवाना झाली. जिल्ह्यात पंचवीस मतदान केंद्रे आहेत.

मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे : धारणी- तहसील कार्यालय, चिखलदरा- तहसील कार्यालय, दर्यापूर-तहसील कार्यालय, अंजनगाव सुर्जी- तहसील कार्यालय, अचलपूर- तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय, चांदूर बाजार- तहसील कार्यालय, भातकूली- उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय, अमरावती (ग्रामीण)- गणेशदास राठी हायस्कुल कक्ष क्रमांक 4, अमरावती (शहर)- जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 2, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 3, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 4, जि.प. मुलींची शाळा (कॅम्प) येथील कक्ष क्रमांक 2, 3 व 4, गोल्डन किड्स इंग्लीश स्कूल कक्ष क्रमांक 6, 7 व 8, मोर्शी- तहसील कार्यालय, वरुड- तहसील कार्यालय (2), तिवसा- तहसील कार्यालय, नांदगाव खंडेश्वर- तहसील कार्यालय, चांदूर रेल्वे- तहसील कार्यालय, धामणगाव रेल्वे- तहसील कार्यालय.

उद्या मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक साहित्याचे संकलनही विकेंद्रीकृत पद्धतीने होणार आहे. मतदान केंद्रावरील साहित्य सर्वप्रथम जिल्हास्तरावरील सुरक्षा कक्षामध्ये जमा केले जाईल. सर्व मतदान केंद्राकडून साहित्य जिल्हास्तरावर संकलित झाल्यानंतर ते साहित्य विलासनगर येथील शासकीय धान्य गोदामात सुरक्षा कक्षात ठेवण्यात येईल. त्यानुसार सर्व सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी करत आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व वेबकास्टिंग करण्यात येणार असून, तशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मतदारांच्या माहिती देण्यासाठी प्रत्येक केंद्रावर मतदार सहायता कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांना मतदान यादीत नाव शोधण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, कोरोना संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांच्यासाठी विलगीकरण कक्षही स्थापण्यात आला आहे.

00000

Sunday, November 29, 2020

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमेत्तिक रजा - निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह

 


मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमेत्तिक रजा

-         निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह

 

अमरावती, दि. 29 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी (एक डिसेंबर) शिक्षकांना विशेष नैमेत्तिक रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील यंत्रणांना दिले आहेत.

त्यानुसार शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिका-यांना जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ही रजा कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे.  

                                    मतमोजणी कक्षाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेशास प्रतिबंध

                        मतमोजणी कक्ष व सुरक्षा कक्षाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणी अधिकारी, कर्मचारी व निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील ओळखपत्र असणा-या व्यक्तींव्यतिरिक्त दि. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी आठपासून ते दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विलासनगर येथील शासकीय धान्य गोदाम येथील मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेशास प्रतिबंध  करण्यात आला आहे. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना अधिकृत पासआधारे प्रवेश मिळेल.

                                    मतमोजणीच्या ठिकाणी संपर्क साधनांवर प्रतिबंध

मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशिन, ई- मेल किंवा इतर संपर्क साधनांच्या गैरवापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मतमोजणी ठिकाणाच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, कॅल्क्युलेटर आदी साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. तथापि, वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार बांधवांना मतमोजणी स्थळाच्या परिसरात असलेल्या मीडिया कक्षातच मोबाईल वापरण्याची मुभा असेल.

विधानसभा मतदार संघाच्या यादीतील दुबार मतदारांची वगळणी

 विधानसभा मतदार संघाच्या यादीतील दुबार मतदारांची वगळणी

छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याच्या सूचना

छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी www.amravati.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध

मतदारांनी नमूना 8 अर्ज सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29 : विधानसभा मतदारसंघाच्या याद्यामधील दुबार मतदारांची वगळणी करणे व मतदार छायाचित्र ओळखपत्रासंबंधातील त्रुटी दूर करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेळापत्रक (Monthly Target Plan) तयार करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिले.  याअनुषंगाने नागरिकांना आपले नाव तसेच मतदार ओळखपत्रातील त्रुटी आदी जिल्हा प्रशासनाच्या www.amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उपरोक्तप्रमाणे त्रुटींचे निराकरण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत सर्वेक्षण करुन मतदारासोबत पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे. स्थंलातरीत व मय्यत मतदारांच्याबाबत पुरावे उपलब्ध होत नसल्यामुळे दस्तऐवजाअभावी अशा मतदारांची वगळणी करता येत नाही. यामुळे मतदार यादीत अनावश्यक नोंदीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मय्यत किंवा स्थलांतरीत मतदारांची वगळणी करणे आवश्यक झाल्याने मतदारांनी यासंदर्भात दखल घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, छायाचित्र नसणे किंवा इतर त्रुटी असलेल्या मतदारांची यादी मतदारांच्या सोयीसाठी www.amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर यादीत नाव असलेल्या उमेदवारांनी संबंधित तालुक्याच्या बीएलओ किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून रंगीत फोटोसह नमूना 8 अर्ज भरुन द्यावा. जे मतदार नमूना 8 भरुन अर्ज सादर करणार नाही, अशा मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहे.

0000

Saturday, November 28, 2020

मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण व इतर बाबी विहित वेळेत पूर्ण करा - निवडणूक निर्णय अधिका-यांचे निर्देश


मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण व इतर बाबी विहित वेळेत पूर्ण करा

-    निवडणूक निर्णय अधिका-यांचे निर्देश

अमरावती, दि. 28 :   मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण व इतर बाबींची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी दिले आहेत.मतदान केंद्रे निर्जंतुकीकरण करून घ्यावीत व तसा अहवाल सादर करावा. क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्राना दिलेल्या भेटी व इतर साहित्याबाबतचा अहवाल ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ पूर्वी सादर करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिका-यांना दिले आहेत.

मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतपत्रिकेच्या स्थळप्रतीवर केलेली स्वाक्षरी मतदार नोंदणी नमुना १९ समवेत पडताळणी करणे आवश्यक असते. त्यानुसार मतदान केंद्राध्यक्षांना नमुना १९ उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना दिले आहेत.

प्रिंट मीडियामधील जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक

            मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तास म्हणजेच रविवारी (29 नोव्हेंबर) सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल.  त्यानंतर उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना प्रचार करता येणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारेही प्रचार करता येणार नाही. मात्र, प्रिंट मीडिया त्याला अपवाद राहील. त्यानुसार  मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाचा प्रचार व जाहिराती उमेदवारांनी माध्यम  प्रमाणीकरण  आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून  घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

            प्रचारासाठी विविध माध्यमांत करावयाच्या जाहिरातींबाबत उमेदवारांकडून ‘एमसीएमसी’कडे मजकूर सादर केला जातो व समितीकडून प्रमाणीकरण करुन दिले जात आहे. मात्र, आता राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित घेणे आवश्यक आहे.

                                                             00000

 

 

Friday, November 27, 2020

मतदान व मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्था काटेकोर ठेवा निवडणूक निर्णय अधिकारी पियूष सिंह यांचे निर्देश

 





मतदान व मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्था काटेकोर ठेवा

निवडणूक निर्णय अधिकारी पियूष सिंह यांचे निर्देश

 

               अमरावती, दि. 27 : शिक्षक मतदारसंघाची निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान व मतमोजणी केंद्रावर काटेकोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज दिले.

                   अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार, उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर, पोलीस निरीक्षक निलीमा आरज यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

                 श्री. सिंह म्हणाले की, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. विलासनगर येथील शासकीय धान्य गोदाम येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. मतमोजणीच्या परिसरात कुठलीही अनुचित घटना घडणार यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज रहावे. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.

                  मतमोजणीच्या केंद्रावर अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी जवानांसाठी भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध ठेवावी. मतमोजणी केंद्रावर आरोग्य तपासणीसाठी आरोग्य पथक तैनात ठेवावे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाचा पास दिला जातो. तसेच त्यांना मतमोजणीच्या ठिकाणी माध्यम कक्ष उभारला जातो. माध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षातच मोबाईल वापरण्‍याची मुभा असते. मात्र, मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर सर्वांना बंदी राहील.

                 कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने मतमोजणी केंद्र तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्राँगरुम व संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा आदी सुविधा चोख ठेवावी. तसेच वीजपुरवठा अखंडित राहावा यासाठी अगोदरच जनरेटरची सुविधा व नियोजन करुन ठेवावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

                  मतमोजणीच्या ठिकाणी व परिसर चोख बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस बलची एक प्लॉटून तसेच जिल्हा पोलीस विभागाचे सुमारे शंभर अधिकारी कर्मचारी तैनात राहणार आहे. बॅरीकेटस, प्रवेश गेट व संपूर्ण परीसरात व भोवताल पोलीसांचा चोख बंदोबस्त नियोजित करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलीमा आरज यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केंद्र येथे सर्व शासकीय यंत्रणांसोबत पाहणी करणार आहेत. 

00000

मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सुसज्ज - निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह

 



अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2020

मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सुसज्ज

-          निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह

 

· 963 अधिकारी-कर्मचा-यांचे मनुष्यबळ

अमरावती, दि. 27 : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी एकूण 963 अधिकारी व कर्मचारी यांचे मनुष्यबळ सुसज्ज ठेवण्यात आले आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे सांगितले.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे आदी उपस्थित होते.

 शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 35 हजार 622 असून, त्यात 26 हजार 60 पुरूष आणि 9 हजार 562 महिलांचा समावेश आहे.  निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह म्हणाले की,  मतदानासाठी विभागात 77 मतदान पथकांबरोबरच प्रत्येक जिल्ह्यासाठी तीन याप्रमाणे 15 राखीव पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण 963 मनुष्यबळात 27 झोनल अधिकारी, 77 मतदान केंद्राध्यक्ष, 231 मतदान अधिकारी, 154 पोलीस कर्मचारी,  92 सूक्ष्म निरीक्षक, 231 आरोग्य कर्मचारी, 92 चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड-19 च्या सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक समुदाय आरोग्य अधिकारी व दोन सहायक असे आरोग्य पथक नेमण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदार किंवा मतदान पथकातील अधिकारी- कर्मचा-यात कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्याचे विलगीकरण करून उपचारासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू राहील.

 

 

 

मतपत्रिकांची छपाई पूर्ण

मतपत्रिका गुलाबी रंगाची आहे. एकूण 42 हजार 600 मतपत्रिका व 300 टपाली मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. त्यात दोन मतपत्रिका अनुक्रमांक मुद्रित न झाल्याने, तसेच तीन मतपत्रिका फाटलेल्या असल्याचे आढळल्या. अशा एकूण पाच मतपत्रिका रद्द करण्यात आल्या. त्याबाबतची माहिती सूचनाफलकावर प्रसिद्ध करून त्याची प्रत सर्व उमेदवार व मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आली आहे. मतदान साहित्याचे वाटप होईल, त्यावेळी मतदान केंद्रावरही प्रसिद्ध करण्यात येईल.

                                                 टपाली मतपत्रिका सुविधा

टपाली मतपत्रिकांसाठी 27 दिव्यांग मतदारांनी मागणी केली आहे. त्यांना मतपत्रिका टपालाने व विशेष पथक नेमून पुरविण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिका 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केंद्रावर सकाळी आठपूर्वी टपाल खात्यामार्फत किंवा वैयक्तिकरीत्या स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

निवडणूक साहित्याचे वितरण करताना पुनश्च प्रशिक्षण

निवडणूक साहित्याचे वितरण विकेंद्रीकृत पद्धतीने होईल. सर्व मतदान केंद्रांसाठीचे 77 साहित्य संच अमरावती जिल्हाधिकारी स्तरावर तयार करण्यात आले असून, संबंधित जिल्ह्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिका-यांकडे सोपविण्यात आले आहेत. मतदान पथकाला 30 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरावरून साहित्याचे वाटप होईल. त्याचठिकाणी मतदान पथकाला पुन्हा प्रशिक्षण देऊन पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांवर रवाना केले जाईल. 

            मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक साहित्याचे संकलनही विकेंद्रीकृत पद्धतीने होईल. मतदान केंद्रावरील साहित्य सर्वप्रथम जिल्हास्तरावरील सुरक्षा कक्षामध्ये जमा केले जाईल. सर्व मतदान केंद्राकडून साहित्य जिल्हास्तरावर संकलित झाल्यानंतर ते साहित्य विलासनगर येथील शासकीय धान्य गोदामात सुरक्षा कक्षात ठेवण्यात येईल. त्यानुसार सर्व सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी करत आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी प्रचार थांबेल

            मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तास म्हणजेच रविवारी (29 नोव्हेंबर) सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल.  त्यानंतर उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना प्रचार करता येणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारेही प्रचार करता येणार नाही. मात्र, प्रिंट मीडिया त्याला अपवाद राहील.

 

चौदा टेबलवर मतगणना

            निवडणुकीची मतमोजणी तीन डिसेंबरला सकाळी आठला सुरू होईल. मतमोजणी कक्षातील दोन हॉलमध्ये प्रत्येकी सात याप्रमाणे 14 टेबलवर मतगणना होईल. मतमोजणी कक्षातील पिजन होल, रिसेप्टिकल, मा. निवडणूक आयोगाला वेळोवेळी माहिती देणे आदी कामे लक्षात घेऊन सुमारे 186 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व वेबकास्टिंग

            प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदारांच्या माहिती देण्यासाठी प्रत्येक केंद्रावर मतदार सहायता कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांना मतदान यादीत नाव शोधण्यास मदत होईल. त्याशिवाय, मतदारांना नाव शोधण्यासाठी विभागीय कार्यालयाच्या (http://amravatidivision.gov.in/mlc_election.html), तसेच निवडणूक आयोगाच्या (https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/. ) या संकेतस्थळावरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

                  आचारसंहिता भंग प्रकरणी आठ गुन्हे दाखल

आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यावरून अद्यापपर्यंत आठ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात नीलेश ताराचंद विश्वकर्मा यांच्याविरुद्ध विनापरवानगी रॅलीचे आयोजन केल्याबद्दल, तसेच श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याबद्दल, डॉ. नितीन धांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अकोला जिल्ह्यात रामदासपेठ पोलीस ठाण्यात श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी सभेचे आयोजन केल्याबद्दल, तर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाण्यात डॉ. नितीन धांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यात किरणराव सरनाईक यांच्याविरुद्ध मतदारांना साड्या, पैसे यांचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल आहे.वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर पोलीस ठाण्यात चंद्रकांत पाकधाने व इतर सात यांच्याविरुद्ध शासकीय जागेचा वापर केल्याबद्दल, तर वाशिम पोलीस ठाण्यात किरण सरनाईक यांच्याविरुद्ध मतदारांना साड्या, पैसे यांचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

00000

 

Thursday, November 26, 2020

निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा - निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह

 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020





निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा

- निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह

प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण

 

               अमरावती, दि. 26 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांनी आपापल्या जबाबदा-या समजून घेऊन नियोजनपूर्वक कामे करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.

                    शिक्षक मतदार संघाच्या 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने येथील नियोजनभवन येथे मतमोजणीचे प्रात्यक्षिक स्वरुपात दीडशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, सहायक निवडणूक अधिकारी तथा अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मास्टर ट्रेनर नरेंद्र फुलझेले व श्यामकांत मस्के यांनी यावेळी उपस्थितांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले.

               या प्रक्रियेसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, सुमारे 170 अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा महत्वाचा टप्पा असून सर्व प्रक्रिया नियोजनबध्दरीत्या पार पाडण्यासाठी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वांनी जबाबदारी ओळखून कामे करावीत, असे निर्देश श्री. सिंह यांनी दिले.

 

मतमोजणीची प्रक्रिया

 

विलासनगर येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता मतमोजणी केंद्रावर हजर राहावे. सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमोर मतपेट्या स्ट्राँग रुममधून आणून उघडण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबल राहणार असून त्यावर 14 चमू मतमोजणीचे काम पार पाडणार आहे.

 

                                     संशयित मत पत्रिकांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

 

                   संशयित बॅलेट पेपरसंदर्भात तत्काळ कार्यवाही होण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लवकर निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करतील. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी कुठलीही चूक होऊ नये म्हणून सर्वांनी जाणीवपूर्वक व खबरदारीपूर्वक काम करावे. मतमोजणीसंदर्भात कुठलाही चुकीचा संदेश प्रसारित होऊ नये म्हणून काळजीपूर्वक काम करावे, असेही निर्देश श्री. सिंह यांनी दिले.

                  या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ‘मतदारांनी मत कसे नोंदवावे’ याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा अवलंब करुन मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. याबाबत सातत्याने जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. 

 

                                   दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये

 

                   मास्टर ट्रेनर नरेंद्र फुलझेले व श्यामकांत म्हस्के यांनी प्रशिक्षण दिले.  मतमोजणीच्या प्रक्रियेत डोळ्यात तेल घालून काम करणे आवश्यक असते. कुठेही दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये. अन्यथा लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर सकाळी सहा वाजताच उपस्थित राहावे व सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. आधीच सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे श्री. फुलझेले व श्री. म्हस्के यांनी सांगितले.

00000

Wednesday, November 25, 2020

 



निवडणूक तयारीला वेग, मतमोजणीचे आज प्रशिक्षण

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी वाहने नियुक्त विविध अधिकारी- कर्मचा-यांच्या पथकांच्या प्रशिक्षणासह आवश्यक सामग्री, वाहने अधिग्रहण, मतमोजणीस्थळी आवश्यक सुविधा आदी तयारीला वेग आला आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचारी यांचे उद्या (26) सकाळी अकराला नियोजनभवनात प्रशिक्षण होणार आहे.
मद्यविक्रीला प्रतिबंध
निवडणूक खुल्या, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई करणारा आदेश सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तासांच्या अगोदरपासून, तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री व कोरडा दिवस जाहीर करण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी श्री. नवाल यांनी आदेश पारित केले आहेत. त्यानुसार मतदानापूर्वीचा दिवस अर्थात 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजतापासून ते 30 नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस पुढे, मतदानाचा दिवस 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत व मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर रोजी मतमोजणी संपेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
अंध मतदारांना मदतनीस परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना
निवडणुकीत अंध मतदारांना मतदान सहायक देण्याची तरतूद आहे. त्यासाठी मतदाराने तीन दिवस आधी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. असा अर्ज प्राप्त झाल्यावर निवडणूक निर्णय अधिका-यांनी मदतनीस नेमण्याची परवानगी द्यावी व मतदानाच्या दिवशी अंध मतदाराने व मदतनीसाने घोषणापत्र मतदान केंद्राध्यक्षाला देणे आवश्यक आहे. मतदान केंद्राध्यक्ष अंध मतदाराला मदतनीसाच्या सहाय्याने मतदान करू देईल, अशी तरतूद आहे. मदतनीस नेमणुकीचा अर्ज सादर करणे व परवानगी मिळविणे आदी बाबींसाठी अंध मतदाराला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात येण्याची गरज पडू नये म्हणून अर्ज तपासणे व परवानगी अधिकार आता सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. तसा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह यांनी जारी केला.
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह पथक रवाना करण्याकरिता, तसेच मतदान प्रक्रिया संपल्यानंतर जिल्हास्तरावर नेमून दिलेल्या ठिकाणी मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी वाहतूक आराखड्यानुसार वाहने अधिग्रहित करण्याचे निर्देशही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जिल्हा निवडणूक अधिका-यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचा-यांना, तसेच इतर मनुष्यबळाला ओळखपत्रे देण्याची जबाबदारी लेखा अधिकारी रवींद्र जोगी यांना देण्यात आली आहे. मतमोजणी स्थळी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधींना भोजन व्यवस्थेकरिता स्वतंत्र मंडप, पाण्याचे टँकर आदी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व व्यवस्थेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, निरीक्षण अधिकारी संजय आवारे, निखील नलावडे, वैभव खैरकार यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
00000

प्रभागनिहाय मतदारयादी कार्यक्रमानुसार निर्धारित वेळेत कार्यवाही करा - जिल्हाधिका-यांचे तहसीलदारांना आदेश

 


                          


ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक

  प्रभागनिहाय मतदारयादी कार्यक्रमानुसार निर्धारित वेळेत कार्यवाही करा

-          जिल्हाधिका-यांचे तहसीलदारांना आदेश

 

अमरावती, दि. 25 :  जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाला असून, त्यानुसार निर्धारित वेळेत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत. 

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मतदार यादीतील सर्व मतदारांना मतदानाची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्ययावत मतदार यादीनुसारच कार्यक्रम आयोगाने निश्चित केला आहे. या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 1 डिसेंबर आहे. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 10 डिसेंबर आहे.

प्रभागनिहाय मतदारयादी करताना अद्ययावत यादीप्रमाणे सर्व नोंदी अचूक असाव्यात. ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील एकही मतदार समाविष्ट नसल्याची खातरजमा करावी. दुबार नावे, मयत, स्थलांतरित याबाबत आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही व्हावी. प्रारूप प्रभाग निहाय मतदार यादीला व्यापक प्रसिद्धी द्यावी. त्यावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांबाबत नियम लक्षात घेऊन मतदारयादी अंतिम करावी.  यादीबाबत लेखनिकांच्या काही चुका, दुस-या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, 25 सप्टेंबरच्या अद्ययावत यादीत नाव असूनही प्रारूप यादीत ते नसणे आदी बाबी आढळल्यास त्या दुरुस्त कराव्यात. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी. प्रारूप तसेच अंतिम मतदार यादी ग्रामपंचायत, तलाठी सजा, मंडळ अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व तहसील कार्यालयातील सूचना फलकांवर प्रसिद्ध करावी, तसेच विविध स्थानिक माध्यमांतूनही प्रसिद्धी द्यावी, आदी निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.  

प्रभागनिहाय मतदारयादीचा कार्यक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण होईल याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मतदार यादी कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 553 ग्रामपंचायती असून, प्रभाग 1 हजार 823 व सदस्य संख्या 4 हजार 896 आहे.

            अमरावती तालुक्यात 46 ग्रामपंचायती (154 प्रभाग व 416 सदस्य), भातकुली तालुक्यात 36 ग्रामपंचायती (116 प्रभाग व 312 सदस्य), तिवसा तालुक्यात 29 ग्रा. पं. (98 प्रभाग व 261 सदस्य), दर्यापूर तालुक्यात 50 ग्रा. पं. (163 प्रभाग व 444 सदस्य), मोर्शी तालुक्यात 39 ग्रा. पं. (131 प्रभाग व 349 सदस्य), वरूड तालुक्यात 41 ग्रा. पं. (139 प्रभाग व 279 सदस्य), अंजनगाव सुर्जी तालुक्यात 34 ग्रा. पं. (117 प्रभाग व 312 सदस्य), अचलपूर तालुक्यात  44 ग्रा. पं. ( 147 प्रभाग व 399 सदस्य), धारणी तालुक्यात 35  ग्रा. पं. (121 प्रभाग व 333 सदस्य), चिखलदरा तालुक्यात 23  ग्रा. पं. ( 71 प्रभाग व 199 सदस्य), नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 51  ग्रा. पं. ( 159 प्रभाग व 419 सदस्य), चांदूर रेल्वे तालुक्यात 29  ग्रा. पं. (93 प्रभाग व 235 सदस्य), चांदूर बाजार तालुक्यात 41 ग्रा. पं. (140 प्रभाग व 381 सदस्य) व धामणगाव रेल्वे तालुक्यात 55 ग्रा. पं. ( 174 प्रभाग व 457 सदस्य) यांचा समावेश आहे.

 

                                                000

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...