निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा - निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह

 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020





निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा

- निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह

प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण

 

               अमरावती, दि. 26 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांनी आपापल्या जबाबदा-या समजून घेऊन नियोजनपूर्वक कामे करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.

                    शिक्षक मतदार संघाच्या 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने येथील नियोजनभवन येथे मतमोजणीचे प्रात्यक्षिक स्वरुपात दीडशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, सहायक निवडणूक अधिकारी तथा अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मास्टर ट्रेनर नरेंद्र फुलझेले व श्यामकांत मस्के यांनी यावेळी उपस्थितांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले.

               या प्रक्रियेसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, सुमारे 170 अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा महत्वाचा टप्पा असून सर्व प्रक्रिया नियोजनबध्दरीत्या पार पाडण्यासाठी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वांनी जबाबदारी ओळखून कामे करावीत, असे निर्देश श्री. सिंह यांनी दिले.

 

मतमोजणीची प्रक्रिया

 

विलासनगर येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता मतमोजणी केंद्रावर हजर राहावे. सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमोर मतपेट्या स्ट्राँग रुममधून आणून उघडण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबल राहणार असून त्यावर 14 चमू मतमोजणीचे काम पार पाडणार आहे.

 

                                     संशयित मत पत्रिकांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

 

                   संशयित बॅलेट पेपरसंदर्भात तत्काळ कार्यवाही होण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लवकर निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करतील. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी कुठलीही चूक होऊ नये म्हणून सर्वांनी जाणीवपूर्वक व खबरदारीपूर्वक काम करावे. मतमोजणीसंदर्भात कुठलाही चुकीचा संदेश प्रसारित होऊ नये म्हणून काळजीपूर्वक काम करावे, असेही निर्देश श्री. सिंह यांनी दिले.

                  या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ‘मतदारांनी मत कसे नोंदवावे’ याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा अवलंब करुन मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. याबाबत सातत्याने जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. 

 

                                   दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये

 

                   मास्टर ट्रेनर नरेंद्र फुलझेले व श्यामकांत म्हस्के यांनी प्रशिक्षण दिले.  मतमोजणीच्या प्रक्रियेत डोळ्यात तेल घालून काम करणे आवश्यक असते. कुठेही दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये. अन्यथा लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर सकाळी सहा वाजताच उपस्थित राहावे व सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. आधीच सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे श्री. फुलझेले व श्री. म्हस्के यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती