कोरोना संकटकाळात ऑनलाईन मेळाव्यांतून बेरोजगारांना रोजगारऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य ठेवावे- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


कोरोना संकटकाळात ऑनलाईन मेळाव्यांतून बेरोजगारांना रोजगार
ऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य ठेवावे
-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

         कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने कोरोना संकटकाळात ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे लॉकडाऊनच्या काळात अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. यापुढेही या उपक्रमांत सातत्य राखणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सर्वदूर लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाधिक नोंदणीसाठी प्रभावी जनजागृती व ऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य राखण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
         कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाकडून लॉकडाऊन लक्षात घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोहीम सुरु करण्यात आली. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत  अमरावती विभागात एक हजाराहून अधिक व जिल्ह्यात सुमारे अडीचशे तरूणांना या माध्यमातून रोजगार मिळाला. तथापि, अधिकाधिक पात्र उमेदवारांना रोजगार, तसेच उद्योग- व्यवसायांना सक्षम मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हे उपक्रम सातत्याने राबवावेत, तसेच त्याची माहिती वेळोवेळी सर्वदूर पोहोचवावी जेणेकरून अधिकाधिक तरूण नोंदणी करून या मेळाव्याचा लाभ घेऊ शकतील, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
           बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलद्वारे नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. या वेबपोर्टलवर नोकरीइच्छूक उमेदवारांनी आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करावी. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.  यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
          नोकरी मिळविण्यासाठी इच्छूक तरुणांनी  या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती