आधारभूत खरेदी योजनेत मेळघाटात भरड धान्य खरेदी केंद्रेटिटंबा येथेही भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश


आधारभूत खरेदी योजनेत मेळघाटात भरड धान्य खरेदी केंद्रे
टिटंबा येथेही भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

       आधारभूत खरेदी योजनेंतर्गत 2020-21 च्या खरीप पणन हंगामासाठी आदिवासी क्षेत्रात भरडधान्य खरेदीसाठी नऊ केंद्रांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे, स्थानिक शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन धारणी तालुक्यातील टिटंबा येथेही भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी येथील प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले आहेत.
      आधारभूत खरेदी योजनेत मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात या केंद्रांवर ज्वारी, मका आदी भरडधान्याची खरेदी होत आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत ही केंद्रे चालविण्यात येत आहेत. धारणी तालुक्यात बैरागड, हरिसाल, सावलीखेडा, धारणी, चाकर्दा, साद्राबाडी येथे, तर चिखलदरा तालुक्यात चुरणी, राहू, गोलखेडा बाजार येथे केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. तथापि, टिटंबा हे धारणी तालुक्यातील गाव हे साप्ताहिक बाजाराचे ठिकाण असून, परिसरातील शेतक-यांना सोयीचे आहे. या ठिकाणी महामंडळाचे गोदामाची क्षमता 1200 क्विंटल व समाजमंदिराचा वापर केल्यास 1300 क्विंटल असे मिळून अडीच हजार क्विंटल धान्याची साठवणूक होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन हे केंद्र तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
       खरेदी प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत शासकीय कामाच्या दिवशी सुरू राहणार आहे.  एफएक्यू दर्जाचे भरडधान्य प्रशिक्षित ग्रेडर्सकडून तपासणी करून खरेदी करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. टिटंबा येथील गोदामात खरेदी करून साठवणूक करण्यात येणा-या भरडधान्याची तपासणी करून ताब्यात घेण्याकरिता तहसील स्तरावरून कर्मचा-याची नेमणूक करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी धारणी तहसीलदारांना दिले आहेत.
          योजनेत तांदूळ (धान) (एफएक्यू) पिकासाठी साधारण दर्जा असल्यास आधारभूत किंमत व शेतक-यांना द्यायचा प्रत्यक्ष दर 1 हजार 868 रूपये आहे. धानाचा अ दर्जा असल्यास हा दर 1 हजार 888 रूपये आहे.
         ज्वारी संकरित असल्यास आधारभूत किंमत व शेतक-यांना द्यायचा प्रत्यक्ष दर 2 हजार 620 रू., तर मालदांडी ज्वारीसाठी 2 हजार 640 आहे. बाजरीचा दर 2 हजार 150 रू., मक्याचा 1 हजार 850 रू., रागीचा 3 हजार 295 रूपये आहे.  

                                                000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती