नियोजनभवनात मतदान अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षण प्रत्येक बाबीचे गांभीर्य जाणून कार्यवाही करावी - मास्टर ट्रेनर नरेंद्र फुलझेले

 














नियोजनभवनात मतदान अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षण

प्रत्येक बाबीचे गांभीर्य जाणून कार्यवाही करावी

-          मास्टर ट्रेनर नरेंद्र फुलझेले

 

- प्रशिक्षणानंतर झाली अधिकारी-कर्मचा-यांची आरटीपीसीआर चाचणी

- प्रत्येक मतदान केंद्रावर असेल विलगीकरण कक्ष

अमरावती, दि. 20 :  कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया अधिक काळजीपूर्वक पार पाडावयाची असून, निवडणुकीचे पावित्र्यही जपणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिका-यांनी प्रत्येक बाबीचे गांभीर्य जाणून घेऊन कार्यवाही करण्याची सूचना विभागाच्या निवडणूक यंत्रणेचे मास्टर ट्रेनर तथा उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी आज येथे केली.  

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मायक्रो ऑब्झर्व्हर अशा एकूण 144 अधिकारी- कर्मचारी यांचे प्रशिक्षण नियोजनभवनात आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.  उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांच्यासह मतदान अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून यावेळी सर्व अधिकारी व कर्मचा-यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ही चाचणी करणे मतदान प्रतिनिधींनाही आवश्यक करण्यात आले आहे.

यावेळी मास्टर ट्रेनर श्री. फुलझेले व श्री. म्हस्के यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने विविध नियम व बाबींची माहिती सहभागींना दिली. मतपेटीची हाताळणी,  मतपत्रिकेचे स्वरूप, मतदान केंद्रांवरील सुविधा यासह मतदान प्रक्रियेतील प्रत्येक बाबींचे बारीकसारीक तपशीलासह प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.  

            मतदान प्रक्रिया पार पाडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची आहे. त्यामुळे प्रक्रियेबाबत सबंध तपशील समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व तालमींना हजर राहावे. प्रत्येक शंकेचे निरसन करून घ्यावे. मतपेट्या उघडणे, बंद करणे याचाही सराव करावा. मतदान साहित्य 30 नोव्हेंबरला रवाना होणार केंद्रावरही पोहोचणार आहे. केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी मुक्कामी राहावे. कोणीही घरी जाऊ नये. केंद्रावर पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र रांगा असाव्यात. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी  पुरेशी जागा असावी. मतदारांना आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावेत. केंद्रात पुरेसा उजेड असावा, आदी सूचना श्री. फुलझेले यांनी केल्या.

                                    मतदान केंद्रावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष

मास्क असल्याशिवाय कुणाला प्रवेश देऊ नये.           कोरोनाबाधित किंवा विलगीकरणात असलेल्या मतदारांना पोस्टल मतपत्रिकेची सुविधा देण्यात येणार आहे. मात्र, केंद्रावर आलेल्या एखाद्या मतदाराला ताप आदी लक्षणे आढळल्यास त्यांना टोकन देऊन दुपारी 4 वाजता मतदान केंद्रावर येण्याचे सूचित करावे. दरम्यान, त्याच दिवशी कुणी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना पीपीई कीट देण्यात यावी.  लक्षणे आढळलेल्या व बाधित असलेल्या मतदारांसाठी केंद्रावर स्वतंत्रपणे बसण्यासाठी विलगीकरण कक्षाची सुविधा असावी.

मतदाराची ओळख पटावी यासाठी त्याला मास्क थोडावेळ हटवता येईल. मात्र, हा कालावधी अत्यंत कमी म्हणजेच पाच सेकंदाइतका असावा.  संपूर्ण खबरदारी घेऊन ही प्रक्रिया पार पाडावी. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आदी सुविधा ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

                        मतपत्रिकेचा रंग गुलाबी, जांभळ्या पेनाने नोंद

मतपत्रिकेचा रंग गुलाबी असेल, तसेच ती इंग्रजी व मराठी भाषेत असेल. केंद्रासाठी मतदार यादी तीन प्रतीत असेल. त्यातील एक चिन्हांकित असेल. जांभळ्या शाईचा विशेष पेन पुरवला जाईल. त्यानेच नोंदी होणे आवश्यक आहे. चुकूनही कुणीही इतर पेन वापरू नये. तसे झाल्यास फेरमतदानाची व कर्मचा-यावर निलंबनाची वेळ येऊ शकते. अशी एक घटना यापूर्वी घडल्याची माहिती मास्टर ट्रेनर म्हस्के यांनी दिली.

                                    डमीवर कॅन्सलचा शिक्का मारू नका   

डमी मतपत्रिकेवर डमी असल्याचा स्पष्ट उल्लेख असतो. त्यामुळे या पत्रिकेवर कॅन्सलचा शिक्का मारण्याची गरज नाही. त्यामुळे आक्षेप येऊ शकतात. याबाबत खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

मतदान पथकातील सर्व अधिकारी कर्मचा-यांनी केंद्रापर्यंत जाण्या-येण्याचा रस्ता, पथकातील सदस्यांचे मोबाईल नंबर, आपल्या मतदान केंद्राचे विभेदक चिन्ह आदींबाबत सुस्पष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. लाख कांडी, कापडी पिशवी, लोखंडी पट्टी,  फॉर्म 19 चा गठ्ठा, उमेदवार व त्यांचे मतदान प्रतिनिधी यांची नमुना स्वाक्षरी,  जांभळ्या शाईचा विशेष पेन आदी साहित्य काळजीपूर्वक केंद्रावर नेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती